Tuesday, August 13, 2013

चला करूया सामुदायीक गाजरगवतचे निर्मुलन * साजरा करू गाजर गवत जागृती सप्ताह

गाजर गवत हे एक परदेशी तण असुन ह्याला शास्‍त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्‍टोरियोफोरस असे म्‍हणतात. तसेच पांढरुफुली या स्‍थानिक नावाने सुध्‍दा आपण ओळखतो. गाजर गवताचे मुळस्‍थान उत्‍तर अमेरिकेतील मेक्सिको असून जगातील इतर देशात ह्या तणाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम गाजरगवत पुणे येथे 1955 मध्‍ये आढळून आले. त्‍यानंतर ह्या तणाचा झपाटयाने सर्वदूर प्रसार झाला.
गाजर गवतामुळे होणारे दुष्‍परिणाम
गाजर गवत हे विषारी, आक्रमक आणि अलर्जी उत्‍पन्‍न करणारे तण आहे. याच्या सानिध्यात आल्यास त्वचा रोग, दमा, श्‍वसनाचा त्रास, शिका, सर्दी, डोळे सुजणे, खाज सुटणे, गुदी येणे, श्‍वसनेंद्रीयाचे विकार इत्यादी व्याधि उत्‍पन्‍न होउ शकतात. जनावरामधे चक्कर येणे, अंर्धागवायु, दुधास कडवट वास यासारख्‍या समस्या निर्माण होतात. शेतातील पिकाबरोबर अन्‍नाद्रव्‍यासाठी स्‍पर्धा केल्‍यामुळे उत्‍पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्‍या चराई क्षेत्रात घट होते. परागकणामुळे तेलबिया, भाजीपाला, फळे इ. पिकांच्‍या उत्‍पादनात घट होते तसेच मुळाद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्‍यामुळे पिकाच्‍या उत्‍पादनात घट होते.
गाजर गवताचा प्रसार
      गाजर गवत हे बहुतेक पडीक जमिनीत शहरातील मोकळ्या जागेत, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्‍वे मार्ग, राज्‍य रस्‍ते आणि महामार्गाच्‍या दुतर्फा, नदी, नाले, तलाव, डबके इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच शेतातील जवळपास सर्वच पिकांमध्‍ये जसे की, कापूस, तूर, ज्‍वारी, भुईमूग, उस, भाजीपाला पिके आणि फळ पिकांमध्‍ये सुध्‍दा आढळून येते.
      गाजर गवताची विशेषत: भरपूर बियाणे तयार करण्‍याची अद् भूत क्षमता यामुळे एक चौरस मीटर क्षेत्रात 33 लक्ष परागकणापासून 15000-22500 बी तयार होतात. या बियांचा प्रसार मुख्‍यत: शेणखताद्वारे, हवे द्वारे, नदीनाले यातील पाण्‍याद्वारे, सांडपाण्‍याद्वारे, वाहनाच्‍या टायरद्वारे, शेतातील अवजारे, अप्रत्‍यक्षरित्‍या माणसाद्वारे इत्‍यादी कारणांमुळे होतो.
गाजर गवताचे बी सुक्ष्म असल्यामूळे व हवेद्वारे / पाण्याद्वारे सह्ज एका ठिकाणाउन दुसरीकडे प्रसार होत असल्याने ते सर्वत्र पसरते. एका झाडापासून ५००० ते २५००० बिया तयार होतात. गाजरगवताचा जीवनक्रम ३ ते ४ महिण्यात पुर्ण होतो.

गाजरगवतचे सामुदायीक निर्मुलनाची गरज
देशात सर्वत्र गाजर गवत जागृती सप्ताह दि. १६ ते २२ आगस्त २०१३ दरम्यान साजरा करण्यात येणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तणविज्ञान संशोधन केंद्रातर्फे शिवार फेरी, व्याख्याने गटचर्चा, पोष्टर्स लावणे, घडी पत्रिका वाटणे तसेच राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्वंयसेवक, ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत यांच्‍या मार्फत गाजर गवत उपटणे, भुंगे सोडणे इत्यादि उपक्रम विविध ठिकाणी घेण्य़ात येणार आहेत. गाजर गवताच्या निर्मुलनासाठी सामुहीक चळवळ राबविणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक संस्‍था, शेतकरी गट, धर्मादाय संस्‍था यांनी एकाच वेळी म्‍हणजेच सप्ताहाच्या दरम्यान निर्मुलनाचे विविध कार्यक्रम राबविल्यास गाजरगवत निर्मुलन सह्जरित्या होईल. असा कार्यक्रम २ ते ३ वर्ष सतत राबविल्यास गाजर गवताचे प्रमाण कमी होईल. वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २ वर्षापासुन विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रम / उपक्रम राबविल्याने तसेच मॅक्सिकन भुंगे सोडल्याने विद्यापीठ परिसर गाजर गवत मुक्त झाला आहे. तरी सर्व नागरीकांना विद्यापीठाच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येते गाजरगवत निर्मुलन सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन सहभाग नोंदवावा.

गाजर गावत निर्मुलनाचे अनेक उपाय आहेत, जे एकाचवेळी वापरले तर त्याचे निर्मुलन करणे शक्य आहे.
प्रतिंबधक उपाय : पडिक जमिनी, शेतावरचे बांध, कंपोस्ट खड्डे रस्ते, रेल्वे रूळ, इमारती लगतच्या जागा अशा ठिकाणी हे तण फुलावर येण्यापुर्वी मुळासह उपटून काढावे व नष्ट करावे. त्यामुळे गाजर गवताच्या बियांचे उत्पादन थांबते व प्रसार रोखण्यास मदत होते.
निवारणात्मक उपाय : लागवड क्षेत्रात वांरवार आंतंरमशागत करून तसेच शिफारशीप्रमाणे तणनाशकाचा वापर करून  गाजर गवतचे नियंत्रण करता येईल. तर बिगर लागवड क्षेत्रामध्ये उगवणा-या गाजर गवतासाठी २,४ डी हे तणनाशक ३ कीलो ५०० ली पाण्यात मिसळून तण फुलावर येण्यापुर्वी फवारावे.
जैविक उपाय : सन 1986 मध्‍ये गाजर गवताच्‍या नियंत्रणासाठी वसवंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभागाने मेक्सिकन भूंगे आणून ह्या भूंग्‍याचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर गुणन करुन शेतात सोडले असता ह्या भूंग्‍यानी मोठ्या प्रमाणावर गाजर गवताचा नाश केल्‍याचे आढळून आले

गाजर गवताच्‍या जैविक नियंत्रणाची निकड
·    गाजर गवत हे विषारी असल्‍यामुळे गाजर गवत उपलटण्‍यासाठी मजूर वर्ग सहज तयार होत नाही.
·  रासायनिक तणनाशके ही महागडी असल्‍यामुळे वारंवार त्‍यांचा वापर करणे आर्थिकदृष्‍टया  न परवडणारे आहे.
·    सार्वजनिक क्षेत्रातील गाजर गवत नियंत्रित करणे खर्चिक असल्‍यामुळे शासनाला न परवडणारे आहे.
·    रासायनिक तणनाशकांचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
·    रासायनिक नियंत्रण हे प्रभावी नाही, त्‍यामुळे जैविक नियंत्रण महत्‍वाचे आहे.
 या सर्व बाबींमुळे गाजर गवताचे झायगोग्रामाद्वारे जैविक नियंत्रण करणे आर्थिकदृष्‍ट्या व पर्यावरणीयदृष्‍ट्या फायद्याचे आहे.
ओळख झायगोग्रामा भुंग्‍याची
      मेक्सिकोस्‍थीत गाजर गवतावर उपजिविका करणारा झायगोग्रामा भुंगेरा मेक्सिकोतून आयात करण्‍यात आला. म्‍हणुनच या भुंग्‍याला मेक्सिकन भुंगा असे म्‍हणतात. या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असून त्‍यावर काळसर रंगाच्‍या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. हृया रेषा त्रिशुलाकार असल्‍यामुळे काही ठिकाणी यांना त्रिशुल भुंगे असेही म्‍हणतात. प्रौढ भुंगे आकाराने मध्‍यम, सहा मि.मि. लांब असून मादी भुंगे नरापेक्षा आकाराने मोठे असतात.
झायगोग्रामा भुंग्‍याचा जीवनक्रम
मादी भुंगे अलग-अलग अथवा गुच्‍छात पानाच्‍या खालील बाजूवर साधारणपणे 2000 अंडी घालतात.  अंड्यांचा रंग फिकट पिवळा असून अंड्यातून अळ्या बाहेर पडण्‍याच्‍या वेळी लालसर होतो. अंडी अवस्‍थेचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असून, अळ्यांचा चार अवस्‍था दहा ते अकरा दिवसात पूर्ण होतात तर कोषावस्‍था 9 ते 10 दिवसांची असते. या भुंग्‍याचा एकूण कालावधी दोन ते तीन महिन्‍याचा असून ते गाजर गवताच्‍या पानांवर उपजिविका करतात.
झायगोग्रामाद्वारे गाजर गवत नियंत्रण
      अंड्यातून बाहेर निघालेल्‍या अळ्या गाजर गवतावरील शेंड्याची पाने खातात. प्रथम अळ्या शेवट्या कळ्या, सहकळ्या आणि नंतर पानाच्‍या कडेने खातात. तरुण अळ्या झाडाची वाढ आणि फुले येण्‍याचे थांबवितात. पुर्ण वाढलेल्‍या अळ्या रंगाने पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सुक्ष्‍म होवून जमिनीवर कोषावस्‍थेत जाण्‍यासाठी पडतात. कोषांमधून 9 ते 10 दिवसांनी भुंगे जमिनीतून निघतात. पावसाळ्यात जून ते ऑक्‍टोंबरपर्यंत भुंगे गाजर गवत फस्‍त करतात. भुंगे  आणि अळ्या फक्‍त गाजर गवतावरच जगतात. भुंगे व अळ्यांची गाजर गवत खाण्‍याची गती कमी असल्‍यामुळे आणि गाजर गवताची वाढ लवकर होत असल्‍यामुळे गाजर गवताचे ताबडतोब नियंत्रण दिसून येत नाही. परंतु अन्‍न साखळीतील घटक असल्‍यामुळे हे भुंगे महत्‍वाचे आहेत.
गाजर गवत उपलब्‍ध नसल्‍यास भुंगे जमिनीत सुप्‍तावस्‍थेत जातात. नोव्‍हेंबर नंतर भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्‍या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्‍यास सुरूवात करतात.
हे भुंगे एखाद्या वातावरणात, एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्‍यावर्षी पुन/पुन्‍हा भुंगे सोडण्‍याची गरज पडत नाही. गाजर गवताच्‍या उच्‍चाटनासाठी शेतात प्रति हेक्‍टरी 500 भुंगे सोडल्‍यास हे भुंगे स्थिर होवून गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. शक्‍यतोवर मनुष्‍यप्राण्‍याचा अडथळा होणार नाही अशी जागा भुंगे सोडण्‍यासाठी निवडावी. झायगोग्रामामुळे मनुष्‍य प्राण्‍याला कोणताही त्रास होत नाही उलट उपद्रवी गाजर गवतावर झायगोग्रामा आपली उपजिविका करुन मनुष्‍य प्राण्‍यावर एक प्रकारे उपकारच करतात. प्रतिकुल परिस्थितीत सुध्‍दा झायगोग्रामामुळे गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण पहावयास मिळते. झायगोग्रामा/ मेक्सिकन भुंगे हे परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ऑगष्‍ट ते ऑक्‍टोंबर पर्यंत विक्रीस उपलब्‍ध आहेत आणि याचा दर 1 रुपया प्रति भुंगा असा नाममात्र आहे.

सौजन्‍य
डॉ.अशोक जाधव 9821392192
डॉ.संजय पवार 
तण विज्ञान संशोधन केंद्र, परभणी
डॉ. धीरज कदम 9421621910
परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्‍त्र विभाग, परभणी