Friday, February 21, 2014

जिरायती भागात सघन कापूस लागवडीसाठी एनएच-615 या वाणाचे क्षेत्र वाढविणे गरजेचे.......कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेश्वरलु

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावरील प्रात्‍याक्षिकांची पाहणी करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील प्रकल्‍प संचालक डॉ यु. एम. व्‍ही. रावकापुस विशेषज्ञ डॉ के. एस. बेग आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर डॉ यु. एम. व्‍ही. रावडॉ के एस बेग आदी
**********************************
नांदेड - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि 20 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील अखिल भारतीय कृषि हवामानशास्‍त्र योजनेचे प्रकल्‍प संचालक डॉ यु. एम. व्‍ही. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रकल्‍पांतर्गत विद्यापीठातर्फे किनवड व माहुर तालुक्‍यातील 105 शेतक-यांच्‍या शेतावर एनएच-615 हा वाण लागवडीसाठी देण्‍यात आला होता. 
      मेळाव्‍या प्रसंगी कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी भागातील शेतक-यांना कपाशीचे अधिक उत्‍पादनाचे तंत्रज्ञानाचा विस्‍तार करणे गरज असुन जिरायती भागात सघन कापुस लागवडीसाठी एनएच-615 या वाणाच्‍या क्षेत्रात वाढ करावी लागेल, यासाठी विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने येत्‍या हंगामात प्रयत्‍न करावेत. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या भाषणात येत्‍या हंगामात कपाशीच्‍या बीजोत्‍पादन कार्यक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्याने विद्यापीठाने राबविण्‍याचे सुचविले.
तालूका कृषि अधिकारी श्री विजय चन्‍ना व (कुपटी) माहुर येथील प्रगतीशील शेतकरी श्री रामचंद्र डुकरे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापुस विशेषज्ञ डॉ के. एस. बेग यांनी तर सुत्रसंचालन डॉ पी आर झंवर यांनी केले. प्रा ए डी पांडागळे यांनी उपस्थित शेतक-यांना कपाशी लागवडीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी डॉ विजयकुमार भरगंडे, श्री पी एस मोरे, कृषि उपसंचालक श्री लाडके तसेच जिल्‍हयातील कृषि अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. माहुर तालुक्‍यातील आदिवासी शेतक-यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नांगर, सायकल कोळपे, खत कोळपे आदी औचारांचे वाटप करण्‍यात आले. तत्‍पुर्वी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व मान्‍यवरांनी प्रक्षेत्रावरील विविध कापुस प्रयोगांना भेट देऊन आढावा घेतला.
काय आहे सघन कापुस लागवड तंत्रज्ञान ?
राज्‍यातील कपाशीची लागवड मुख्‍यत: जिरायती असुन कापुस पिकाला बोंडे धरणे व पक्‍व होणे हा काळ साधारणता ऑक्‍टोबरमध्‍ये सुरू होतो. अशा वेळी पाऊस कमी झालास जमिनीतील ओल कमी पडुन हलक्‍या ते मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीवर उत्‍पादन फार मोठी घट होते. अशा परिस्थितीत सघन कापुस लागवड पध्‍दतीमुळे आशा पल्‍ल्‍वीत झाल्‍या आहेत, असे मत डॉ के एस बेग व डॉ अरविंद पांडागळे यांनी व्‍यक्‍त केले. या तंत्राज्ञानाचे प्रात्‍यक्षिक नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगांव प्रक्षेत्रावर घेण्‍यात आले असुन यात सरासरी 60 बाय 10 सें.मी. अंतरावर कपाशीच्‍या सरळवाणांची लागवड करून हेक्‍टरी झाडांची संख्‍या वाढविण्‍यात येऊन हेक्‍टरी 1 ते 2 लाख झाडे ठेवण्‍यात येते. हलक्‍या जमीनीवर बीटी कपाशी ऐवढेच उत्‍पादन मिळत असल्‍याचे आढळुन येत आहे. लागवडीसाठी नागपुर येथुन केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेने एनएच 615, पीकेव्‍ही 081 व सुरज या वाणांची निवड केली असुन एनएच 615 हा वाण नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राव्‍दारे प्रसारीत करण्‍यात आला आहे. यापध्‍दतीत शिफारस करण्‍यात आलेले वाण बिगर बीटी असल्‍याने बोंड अळयांचे नियंत्रण करणे आवश्‍यक आहे.

बी टी कपाशीच्‍या तुलनेत सघन लागवड पध्‍दतीचे फायदे
सघन लागवडीसाठी हलक्‍या ते मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीवर कपाशीची लागवड करता येऊन कापसाच्‍या सरळ वाणांचा वापर केल्‍यामुळे बियाणे खर्चात कपात होते. तसेच बियाण्‍यांची किंमत कमी असल्‍यामुळे धुळ पेरणी करणे शक्‍य आहे. निवडण्‍यात आलेल्‍या सरळ वाण रसशोषण करणा-या किडींना कमी बळी पडणा-या असुन रसशोषक किडीच्‍या नियंत्रण खर्चात बचत होते. मात्र, बीटी तंत्रज्ञानाने युक्‍त नसल्‍याने बोंडअळया नियंत्रणासाठी उपाय करणे गरजेचे असते. या तंत्रज्ञानाने कपाशीच्‍या उत्‍पादनात स्‍थैर्य येऊन बीटी कपाशीच्‍या तुलनेत समतुल्‍य निव्‍वळ नफा मिळु शकते, असे डॉ के एस बेग व प्रा. अरविंद पांडागळे यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या धनेगाव प्रक्षेत्रावर अखिल भारतीय समन्‍वयीत कापुस सुधार प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन आदिवासी उपयोजनांतर्गत औचारांचे वाटप करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ यु. एम. व्‍ही. रावडॉ के एस बेग आदी.