Saturday, February 1, 2014

संशोधनातील योगदान व दर्जात्माक मनुष्यबळ निर्मिती हेच कोणत्याही विद्यापीठाची खरी ओळख असते ....... नुतन कुलगूरू मा डॉ बी वेंकटेश्वरलु


कोणत्‍याही विद्यापीठाचे संशोधनातील योगदान व त्‍याचा समाज जीवनावरील परिणाम तसेच विद्यापीठातुन निर्माण झालेले दर्जात्‍मक मनुष्‍यबळ हेच कोणत्‍याही विद्यापीठाची खरी ओळख असते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांनी केले.
दि 1 फेब्रुवारी रोजी मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन पदभार स्‍वीकारला, त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍काराच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी औरंगाबाद येथील जल व भुमी व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे माजी उपसंचालक तथा जेष्‍ठ मृद विज्ञान शास्‍त्रज्ञ मा डॉ एस बी वराडे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री काशीनाथ पागीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु सत्‍काराला उत्‍तर देतांना पुढे म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा आहेत, पंरतु आपणास प्राधान्‍यक्रम ठरवावे लागतील व त्‍या दिशेने काम करावे लागेल. विद्यापीठाकडील मर्यादीत संसाधनाचा कार्यकुशलतेने वापर करावा लागणार आहे. विद्यापीठातील विदयार्थी हे देशाचे भविष्‍य असुन युवकांना शेतीकडे आकर्षित करण्‍यासाठी धोरणे ठरवावे लागतील. विद्यापीठाची बलस्‍थाने व कमतरता याचा विचार करून, आपल्‍या बलस्‍थानाच्‍या जोरावर येणा-या काळात कार्याची एक-एक वीट रचुन विद्यापीठास देशातील उत्‍कृ‍ष्‍ट विद्यापीठाचा मान मिळविण्‍यासाठी आपण सर्व प्रयत्‍न करू, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात मा डॉ एस बी वराडे म्‍हणाले की, आपणाकडे अनेक कल्‍पना असतात परंतु त्‍यातील एकाच गोष्‍टीवर पुर्णपणे लक्ष देऊन कार्य करावे लागेल. अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतक-यांना त्‍यांच्‍या परिस्थितीशी निगडीत तंत्रज्ञानाची गरज असुन काटेकोर शेती संशोधनावर विद्यापीठास भर दयावा लागेल. मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु हयांनी जिरायती शेती व हवामान बदल यावर मोठे कार्य केले आहे, याचा मराठवाडयातील शेतक-यांना निश्चितच मोठा फायदा होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात सर्व संचालकांसह अनेक प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व कर्मचा-यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशा आर्या यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थितीत होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांचा सत्‍कार करतांना जेष्‍ठ मृद विज्ञान शास्‍त्रज्ञ मा डॉ एस बी वराडे