Monday, February 24, 2014

हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय संस्था इक्रीसॅटच्या शास्त्रज्ञांची रब्बी ज्वारी प्रक्षेत्रास भेट

होप प्रकल्‍पांर्तगत मानवत तालुक्‍यातील मानोली येथे शेतक-यांच्‍या शेतावरील रब्‍बी ज्‍वारी प्रात्‍यक्षिकांची पाहणी करतांना हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅटचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार, डॉ. रविंद्र रेड्डी, डॉ. संतोष देशपांडे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रकल्‍पाचे सल्‍लागार डॉ. सुभाष बोरीकर, डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, प्रगतिशील शेतकरी श्री. मदन शिंंदे आदी
************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येणा-या होप प्रकल्‍पांर्तगत मानवत तालुक्‍यातील मानोली येथे विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या रब्‍बी ज्‍वारीच्‍या विविध वाणांच्‍या शेतक-यांच्‍या शेतावरील प्रात्‍यक्षिकांची पाहणी दि. 23 फेब्रवारी रोजी हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅटचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार, डॉ. रविंद्र रेड्डी, डॉ. संतोष देशपांडे तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रकल्‍पाचे सल्‍लागार डॉ. सुभाष बोरीकर यांनी केली. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळाच्‍या (महाबिज) सहकार्याने सिआरपी प्रकल्‍पांर्तगत परभणी जिल्‍हयात घेण्‍यात आलेल्‍या 250 एकर शेतक-यांच्‍या शेतावरील रव्‍बी ज्‍वारी बीजोत्‍पादन कार्यक्रमाची सनपुरी येथील प्रक्षेत्राची देखील शास्‍त्रज्ञांनी पाहणी केली.
भेटी दरम्‍यान प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. ए. अशोककुमार म्‍हणाले की, ज्‍वारी काढणीसाठी शेतक-यांना भेडसवणारा मजुरांच्‍या अभावाची समस्‍यावर संशोधन चालु असुन लवकरच इ‍ॅक्रीसॅट होप प्रकल्‍पांर्तगत ज्‍वारी काढणी यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध देण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत. तसेच संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी रब्‍बी ज्‍वारीच्‍या काढणी पश्‍चात प्रक्रियेची आवश्‍यकता असल्‍याचे मत प्रतिपादीत केली. मानोली परिसरातील शेतक-यांना होप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन भरघोस उत्‍पादन देणारे रब्‍बी ज्‍वारीचे वाण व लागवड तंत्रज्ञान उपलब्‍ध होऊ शकले, अशी प्रतिक्रीया प्रगतिशील शेतकरी श्री. मदन महाराज शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.
होप प्रकल्‍पांर्तगत परभणी, बीड व जालना जिल्‍हयातील 4000 एकरवर शेतक-यांना प्रती एकरी सुधारीत वाणांचे बियाणे देण्‍यात येऊन वेळोवेळी पुर्वमशागत, बीजप्रक्रीया, पीक व्‍यवस्‍थापन, पिकांची काढणी व विक्रीपर्यंतच्‍या तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्‍यात आले. यावेळी मोनाली येथील प्रकल्‍पाच्‍या लाभार्थी शेतक-यांनी यंदा भरघोस उत्‍पादन मिळण्‍याची आशा व्‍यक्‍त केली आहे.  
मानोली येथील शेतक-यांनी यशस्‍वीरित्‍या प्रात्‍यक्षिक राबविलेल्‍या बद्दल शास्‍त्रज्ञांनी समाधान व्‍यक्‍त केले. तसेच परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने शेतक-यांच्‍या शेतावरील रब्‍बी ज्‍वारीची उत्‍पादकता व सुधारीत वाणांच्‍या बियाण्‍याची उपलब्‍धता वाढविण्‍यासाठी करण्‍यात येणा-या प्रयत्‍नाबाबत व केंद्रात सुरू असलेल्‍या संशोधनाबाबत शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने समाधान व्‍यक्‍त केले.
प्रक्षेत्र भेटीच्‍या यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, प्रा. अंबिका मोरे, श्री. नलावडे, श्री. सोरेकर, श्री. औढेंकर, श्री. मुंढे, श्री. अबु बकर, श्री शिंदे, श्री. जाधव आदींनी परिश्रम घेतले.