Wednesday, March 5, 2014

विद्यापीठातील शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे वनामकृवि चे कुलगुरू मा. डॉ. व्यंकटेश्वरलु यांचे निर्देश

बीड जिल्‍हयातील अंबाजोगाईतील गारपिटीसह वादळी वा-याने नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी करतांना महसुल विभाग, कृषि विभाग व विद्यापीठातील अधिकारी व शास्‍त्रज्ञांनाचे पथक 


परभणी - राज्‍यात गेल्‍या काही दिवसांत गारपिटीसह वादळी वा-याने गहु, हरभरा, रब्‍बी ज्‍वारी आदी रब्‍बी पिकांसह आंबा, डाळींब, द्राक्ष व मोसंबी फळबागांचे मोठे नुकसान झाले असुन अवेळी झालेल्‍या पावसानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्‍ये शेतावर उभ्‍या असलेल्‍या पिकांमध्‍ये शेतक-यांनी कोणत्‍या प्रकारजी काळजी घेतली पाहिजे याबाबतचा कृषि सल्‍ला विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन देण्‍याचे निर्देश वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिले आहेत. त्‍यानुसार विस्‍तार शि‍क्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील आठही जिल्‍हयात शास्‍त्रज्ञांचे पथक तयार करण्‍यात आले असुन संबंधीत जिल्‍हयांतील कृषि विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रातील शास्‍त्रज्ञांचा त्‍यात समावेश आहे. हे पथक शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. 
गारपीट व अवकाळी पाऊसामुळे फळपिकावर होणारे दुष्‍परिणाम व उपाय
फळपिकांमध्‍ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्‍यामुळे फळे सडण्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच गार‍पीटीमुळे मोठया प्रमाणावर फुलगळ व फळगळ होत आहे. अशा परिस्थितीमध्‍ये शेतक-यांनी फळांची सडण्‍याची स्थिती ओळखुन प्रती लिटर पाण्‍यात 1.5 ग्रॅम कार्बन्‍डेन्‍झीम किंवा 2.5 ग्रॅम रिडोमील ची फवारणी करण्‍याचा सल्‍ला बदनापुर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला आहे. तसेच मोठया प्रमाणात फळगळ व फुलगळ होत असेल तर 100 लिटर पाण्‍यात 1.5 ग्रॅम एनएए या संजीवकाची फवारणी करावी. आंबा व मोसंबीच्‍या प्रत्‍येक झाडास 500 ग्रॅम युरिया दयावा व आंब्‍याच्‍या भुरी रोगासाठी 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम पाण्‍यात विळघणारे गंधकाची फवारणी कराबी.
द्राक्षे पिकामध्‍ये फळे तडकण्‍याचे प्रमाण वाढत असुन फळातील पाणी घडावर साठुन घड सडण्‍याची प्रक्रिया सुरू होते, त्‍यावर रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्‍यासाठी प्रती लिटर पाण्‍यात 1 ग्रॅम बेनोमील अधिक 1.5 ग्रॅम नुवान ची फवारणी करावी. द्राक्षाच्‍या नवीन वाढीवर करपा व अॅ‍थ्रेकनोजचा प्रार्दुर्भाव अशा वातावरणात येतो. त्‍यासाठी ब्‍ल्‍यु कॉपर 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात अधिक स्‍ट्रेप्‍टोसायकलीन 6 ग्रॅम प्रती 30‍ लिटर पाण्‍यात एकत्र फवारणी कराण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. अशाच प्रकारची फवारणी डाळीब व लिंबु फळपिकावर सुध्‍दा करावी.