Monday, March 24, 2014

गारपिटग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वगभुमीवर औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन


औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 23 मार्च रोजी गारपिटग्रस्‍त परिस्थितीच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. संवाद कार्यक्रमाचे उद् घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु याच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. श्री. एच. एम. देसरडा, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यापीठाचे माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोविंद जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी उदय देवळाणकर व आत्‍माचे श्री. सतिष शिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, देशात गतवर्षी पाऊस ब-यापैकी पडला, परंतु पडणारे पाणी अडविण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. राजस्‍थानसारख्‍या राज्‍यात काही भागात खुप कमी पाऊस पडतो, परंतु तेथील शेतकरी कधीच खचुन जात नाही, तंत्रज्ञानाच्‍या जोडीने सुधारीत शेतीची कास त्‍यांनी धरली आहे. गारपीटग्रस्‍तांना दिलासा देण्‍याचा कार्य विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञांमार्फत सुरू असुन गार‍पीटग्रस्‍त शेतक-यांनी खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे. नैसर्गिक आपत्‍तीचा अंदाज करणे शक्‍य नाही, शेतकरी जोखीम घेऊन शेती करतात, त्‍याप्रमाणे अधिक उत्‍पादनाची रास्‍त अपेक्षा त्‍यांची असते. परंतु काही नैसर्गिक आपत्‍तीमुळे उत्‍पादनात घट झाल्‍यास आत्‍महत्‍यासारख्‍या मार्गांचा अवलंब करू नये. कोणतीही आपत्‍तीही नवीन काही शिकवित असते, संध्‍याकाळ नंतर पहाट उगवतेच. विद्यापीठ हवामान बदलाचा विचार करून पीक पध्‍दतीवर व तंत्रज्ञान संशोधनावर अधिक भर देणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा म्‍हणाले की, सकळ राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतक-यांचा लाभाचा हिस्‍सा केवळ 10 टक्‍केच असुन शेतक-यांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. शेती विकासात अधिक गुंतवणुक करणे गरजेचे आहे.
माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोंविद जाधव म्‍हणाले की, आजच्‍या परिस्थितीत शेती संबंधी मिळणा-या सुविधांचा व योजनांचा शेतक-यांना त्‍वरीत लाभ मिळवुन देणे अत्‍यंत गरजेचे आहे. शेतकरी कुटुंब प्रामुख्‍याने अशा वेगळया मार्गाने जाऊन जीवन संपविणे हे कुटुंबाच्‍या दृष्‍टीने खुप घातक असुन अशा संकटाच्‍या वेळी कुटुंबातील सर्व सदस्‍याने एकमेकांशी सूसंवाद केला पाहिजे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गार‍पीटीमुळे मराठवाडयातील शेतक-यांचे भरून न काढता येणारे अतोनात नुकसान झाले असुन शेतक-यांनी या संकटाला न घाबरता मोठया धैर्याने तोंड दयावे. या आपत्‍कालीन परिस्थितीत सर्वांनी एकत्र येवुन मुकाबला केला पाहीजे.
कार्यक्रमात सध्‍याच्‍या परिस्थितीत मोसंबी, आंबा, डाळींब, द्राक्ष आदी फळपिकांच्‍या संगोपनाविषयी बदनापुर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील व औरंगाबाद फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ टी बी तांबे यांनी उपस्थितीत शेतक-यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस बी पवार यांनी केले. यावेळी उपस्थित शेतक-यांनी कुलगुरू व शास्‍त्रज्ञांनी संवाद साधला. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.