Friday, April 25, 2014

राज्‍याच्‍या कृषि विभागाचा कोरडवाहू शेती अभियानातंर्गत खरिप २०१४ चा कृती आराखडा तयार

वनामकृवित आयोजीत कोरडवाहू शेती अभियांनातर्गत दोन दिवसीय कार्यशाळेची सांगता
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल, व्‍यासपीठावर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगटवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख आदी. 
****************************************
महाराष्‍ट्र शासनाच्‍या कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाची सांगता दि २५ एप्रिल रोजी झाली. या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल हे होते तर कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपीया भाषणात मा. डॉ सुधीरकुमार गोयल म्‍हणाले की, दोन दिवसीय कार्यशाळेत कृषि शास्‍त्रज्ञांनी कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानाबाबत चांगले मार्गदर्शन केले असुन उपस्थित कृषि विभागाच्‍या अधिका-यांनी या आधारे तयार केलेल्‍या कृति आराखडा प्रभावीपणे राबवावा. तालुका व गावपातळीवरील कृषि कर्मचा-यांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या मदतीने याबाबत प्रशिक्षीत करावे. खरिप हंगामात सोयाबीन बियाणाची कमतरता लक्षात घेता, गाव पातळीवर सोयाबीन बियाणे उपलब्‍धतेबाबत त्‍वरित सर्व्‍हेक्षण करून नियोजन करावे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाच्‍या प्रसाराकरिता घडी‍पत्रिका, पोस्‍टर तसेच प्रसारमाध्‍यमातुन त्‍याला प्रसिध्‍दी देऊन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी त्‍वरित पावले उचलण्‍यात यावीत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरडवाहू शेती अभियानामध्‍ये मुलस्‍थानी जलसंधारण, पडणा-या पाऊसाचे संकलन व साठवण (वॉटर हार्वेस्‍टींग), विहीर पुनर्भरण, चारा पिकांची लागवड, आंतरमशागत आदी बाबींवर भर दयावा तसेच कोरडवाहू शेतीच्‍या यांत्रिकीकरण्‍याच्‍या दृष्‍टीने गावात अभियानातंर्गत एखादे शेती औचारे सेंटर उभारून तेथे भाडेतत्‍वावर किंमती शेती अवचारे व मशिन शेतक-यांना उपलब्‍ध करून देण्‍याची कल्‍पना त्‍यांनी मांडली.
कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या बांधावर पोहचविण्‍यासाठी खरिप हंगामात कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी सच्‍च राहाण्‍याचे आवाहन यावेळी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट यांनी केले. तसेच मातीची सुपिकता वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज असुन प्रत्‍येक शेतक-यांनी माती परिक्षण केल्‍यास योग्‍य प्रमाणात खतांचा वापर केला जाऊन अतिरिक्‍त खतांचा वापर टाळता येईल, असे मत अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख यांनी व्‍यक्‍त केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व शास्‍त्रज्ञ, हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहू संशोधन संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ, महाबीजचे अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याआधारे कार्यशाळेत बियाणे उगवणक्षमता परिक्षण, माती परिक्षण, बीज प्रक्रिया, रूंद सरी व वंरबा पध्‍दत, सुक्ष्‍म अन्नद्रव्‍यांचा वापर, आंतरपिक पध्‍दती, बाष्‍परोधकाचा वापर, एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापन, मुलस्‍थानी जलसंधारण, सघन कापुस लागवड, मल्जिंग आदी तंत्रज्ञानाचा समावेश खरिप २०१४ च्‍या कृ‍ती आराखडात करून कृषि विस्‍तार करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. यावेळी राज्‍यातील कृषि विभागातील विविध विभागाचे संचालक, सहसंचालक, सर्व जिल्‍हा अ‍धीक्षक कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.  

Thursday, April 24, 2014

कोरडवाहू शेतीतील बिन खर्चाचे तंत्रज्ञानाचा प्रसार करावा....अतिरिक्त मुख्यसचिव (कृषि व पणन) मा. डॉ. सुधीरकुमार गोयल

वनामकृवि मध्‍ये कोरडवाहू शेती अभियानाच्‍या दोन दिवशीय कार्यशाळेचे उदघाटन  
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु 
मार्गदर्शन करतांना मा. डॉ. सुधीरकुमार गोयल
कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी
 ************************************
देशाच्‍या अन्‍नधान्‍य उत्‍पादन वाढीचा दराच्‍या तुलनेत राज्‍याचा दर कमी असण्‍याचे कारण राज्‍यातील 83 टक्‍के शेती ही जिरायती असुन त्‍यासाठी राज्‍य शासनाकडुन कोरडवाहू शेती अभियान राबविण्‍यात येत आहे. शेतीतील बिन खर्चाचे तंत्रज्ञान जसे की उताराला आडवी पेरणी, सरी व वरंबा पध्‍दत, आंतर पिक व मिश्र पिक पध्‍दती आदींचा कृषि विस्‍तार कार्यक्रमात समावेश करावा, असे प्रतिपादन अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (कृषि व पणन)  मा. डॉ सुधीरकुमार गोयल यांनी केले. ते महाराष्‍ट्र शासनाच्‍या कोरडवाहू शेती अभियांनातर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. राजाराम देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे व जिल्‍हाधिकारी मा. श्री. एस. पी. सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ सुधीरकुमार गोयल पुढे म्‍हणाले की, या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयावर चर्चा करून येणा-या खरिप हंगामासाठी ठोस असा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यात यावा. कृषि विभागाने विविध योजना 100 टक्‍के कार्यन्‍वीत करण्‍याचा प्रयत्‍न करावा तसेच मॉनिटरींग यंत्रणा बळकट करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महाराष्‍ट्र राज्‍य इतर राज्‍याच्‍या तुलनेत कोरडवाहू शेती अभियानासाठी मोठया प्रमाणात खर्च करित असुन या कार्यशाळातील चर्चाअंती जिरायती शेतीसाठीचे उपयुक्‍त तंत्रज्ञान देण्‍यात यावे. कोरडवाहू भागात शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण जास्‍त आहे. आंध्रप्रदेशात असे आढळून आले आहे की, ज्‍या भागात शेतीसोबतच पशुपालनाचा व्‍यवसाय शेतकरी करतात, त्‍या ठिकाणी आत्‍महत्‍या जवळपास होत नाहीत. त्‍यामुळे कोरडवाहू शेती अभियानात शेती जोडधंद्यावर देखिल भर दयावा. राज्‍यात काही भागात चांगल्‍या प्रमाणे शेततळे, जलसंधारण, पाणी पुनर्भरणाचे उदाहरणे आहेत त्‍यांची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात यावी.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले. दोन दिवस होणा-या या कार्यशाळेत महाराष्‍ट्रातील कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची सद्य:स्थिती, सरंक्षीत लागवड व मुल्‍यवर्धन, हवामान बदल, आपत्‍कालीन पीक नियोजन व एकात्मिक शेती पध्‍दती, शेतीतील पाणी व्‍यवस्‍थापनाचे यांत्रिकीकरण तसेच खरिप २०१४ हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्‍धता व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान आदी विषयांवर राज्‍यातील विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्‍यानुसार कोरडवाहु शेती अभियानातंर्गत राबविण्‍यात येणारे तंत्रज्ञान निश्चित करून ते राज्‍य शासनास हस्‍तां‍तरित करण्‍यात येणार आहे. यावेळी राज्‍यातील कृषि विभागातील विविध विभागाचे संचालक, सहसंचालक, सर्व जिल्‍हा अ‍धीक्षक कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

Wednesday, April 23, 2014

कोरडवाहु शेती अभियानाच्‍या दोन दिवशीय कार्यशाळेचे वनामकृवि मध्‍ये आयोजन

महाराष्‍ट्र शासनाच्‍या कोरडवाहु शेती अभियांनातर्गत कृ‍षि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व शासनाच्‍या कृषि विभागातील अधिकारी यांची दोन दिवशीय कार्यशाळा दि. २४ व २५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात होणार असुन या कार्यशाळेचे उदघाटन दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता महा‍राष्‍ट्र राज्‍याचे अपर मुख्‍यसचिव (कृषि व पणनमा. डॉ सुधीरकुमार गोयल यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या बैठकीस कृषि आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू तथा अभियानाचे मार्गदर्शक मा. डॉ. आर. बी. देशमुख व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा. डॉ. वेंकटेश्‍वरलु यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवस होणा-या या कार्यशाळेत महाराष्‍ट्रातील कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची सध्‍य:स्थिती, सरंक्षीत लागवड व मुल्‍यवर्धन, हवामान बदल, आपत्‍कालीन पीक नियोजन व एकात्मिक शेती पध्‍दती, शेतीतील पाणी व्‍यवस्‍थापनाचे यांत्रिकीकरण तसेच खरिप २०१४ हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्‍धता व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान आदी विषयांवर राज्‍यातील विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्‍यानुसार कोरडवाहु शेती अभियानातंर्गत राबविण्‍यात येणारे तंत्रज्ञान निश्चित करून ते राज्‍य शासनास हस्‍तां‍तरित करण्‍यात येणार असल्‍याचे कार्यशाळेचे आयोजक तथा विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले आहे.

Monday, April 14, 2014

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी


भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दि. 14-04-2014 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन प्रभारी कुलगुरू तथा शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी कुलसचिव श्री का. वि. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बी. बी. भोसले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, गृह विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. रोहीदास, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश आहिरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक उत्‍साहात काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री थोरात यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी जयंत इंगळे, गुंजाळ, गजानन भोकर, राहुल मोरे, बालाजी वहिवाळ, इंगोले, शारदा चोपडे, कवडीकर यांनी परिश्रम घेतले.

Saturday, April 12, 2014

वनामकृविचे डॉ. प्रा. राजेश कदम यांना इंदिरा गांधी सद् भावना पुरस्कार



नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद यांचा तर्फे दिला जाणारा इंदिरा गांधी सदभावना पुरस्कार यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. राजेश परभतराव कदम यांना दि ०३.०४.२०१४ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्कारांचे स्वरूप असुन कृषी शिक्षण व विस्तार कार्यात भरीव कामगिरीबाबत तसेच ग्रामीण विकासात युवकांच्या योगदानाबाबतचे मार्गदर्शनाबाबत डॉ राजेश कदम यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला. त्‍यांनी विविध शेतकरी मेळावे, गटचर्चा, प्रदर्शन, प्रक्षेत्र भेटी इत्यादी माध्यमातून नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतक-यांचा विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन करून त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा व शेतक-यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी त्‍यांनी प्रयत्न केले. सदरील कामाचे दखल घेऊन नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ श्री तुली, महासचिव डॉ. एन. एस. एन. बाबू आदीचा समावेश  असलेल्‍या समितीने डॉ. प्रा. राजेश कदम यांची इंदिरा गांधी सदभावना पुरस्कारासाठी निवड केली. नवी दिल्ली येथे एका भव्य कार्यक्रमात तामिळनाडूचे माजी राज्यपाल तथा पूर्वोत्तर राज्य मा. श्री. भिष्मनारायण सिंग यांच्‍या हस्ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला, त्याप्रसंगी माजी मुख्य निवडणूक आयुक्त मा. श्री. जी. व्ही. जी. कृष्णामूर्ती, पंजाबचे माजी राज्यपाल तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश मा. श्री. ओ. पी. वर्मा, जेष्ठ विधिज्ञ मा. श्री. ओ. पी. सक्सेना, आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधिज्ञ श्री तुली, महासचिव डॉ. एन. एस. एन. बाबू आदींच्‍या प्रमुख उपस्थित होती. या पुरस्काराबाबत डॉ. प्रा. राजेश कदम यांचे विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले आहे.

Monday, April 7, 2014

जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वता:तील उणिवांची होळी

गृह विज्ञान महाविद्यालयातील अनोखा उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास विभाग व अन्‍न आणि पोषण विभागातर्फे दिनांक 7 मार्च रोजी जागतिक आरोग्‍य दिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍त कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:तील शारीरिक व मानसिक उणिवां गुप्‍तता राखुन कागदावर मांडल्‍या व त्‍या उणिवांची होळी करण्‍यात आली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचा-यांच्‍या वजनाची नोंद घेऊन आदर्श शारीरिक वजनासाठी योग्‍य ती काळजी घेण्‍याचा दृढ संकल्‍प करण्‍यात आला. हा कार्यक्रम प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला. याप्रसंगी धारवाड (कर्नाटक) येथील अन्‍न व पोषण विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ पुष्‍पा भारती, डॉ विजया नलवडे व महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

Friday, April 4, 2014

वनामकृवि निर्मित संकरित कपाशीचा नांदेड-४४ हा वाण होणार बीजी-२ मध्ये परावर्तीत

वनामकृवि आणि महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार
वनामकृवि निर्मित संकरित कपाशीचा नांदेड-४४ हा वाण बीजी-२ मध्ये जनुकीय परावर्तीत करण्‍यासाठी वनामकृवि आणि महाबीज यांच्‍यामध्‍ये सामंजस्‍य करार झाला, त्‍याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडेसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण,  श्री. एस एम पुंडकर, श्री आर जी नाके, डॉ के एस बेग आदी
****************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत कापुस संशोधन केंद्र, नांदेड येथुन विकसित झालेला कपाशीचा एनएचएच-४४ (नांदेड-४४) हा संकरित वाण बीजी-२ स्‍वरूपात जनुकीय परावर्तीत करण्‍यासाठी वनामकृवि आणि महाबीज यांच्‍यामध्‍ये दि २५ मार्च रोजी सामंजस्‍य करार झाला. या करारावर विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी तर महाबीजच्‍या वतीने उत्‍पादन महाव्‍यवस्‍थापक श्री. एस. एम. पुंडकर यांनी स्‍वाक्ष-या केल्‍या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मा. डॉ. शालीग्राम वानखेडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, एनएचएच-४४ (नांदेड-४४) हा कपाशीचा संकरित वाण विद्यापीठाने १९८४ साली विकसित केला असुन बीटी कपाशीचे वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा असल्‍यामुळे देशात या वाणाचा सर्वाधिक पेरा होता. हा वाण रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असुन यामध्‍येत पुनर्बहाराची क्षमता आहे. हा वाण बीजी-२ मध्‍ये परावर्तीत केल्‍यास बोंडअळयासाठी प्रतिकारक्षम होईल, हा सामंजस्‍य करार विद्यापीठाच्‍या दृष्टिने एैतिहासीक ठरू शकतो. महाबीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे म्‍हणाले की, कपाशीचे एनएचएच-४४ (नांदेड-४४) या वाणात बीजी-२ मध्‍ये जनुकीय परावर्तीत झाल्‍यास हा वाण सार्वजनिक क्षेत्रातील जनुकीय परावर्तीत महत्‍वाचे वाण ठरेल.   
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ए. डी. पांडागळे यांनी केले तर आभारप्रदर्शन कापुस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग यांनी केले. कार्यक्रमास सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ. डी. बी. देवसरकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, गृहविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. रोहीदास, महाबीजचे श्री आर. जी. नाके, श्री. एम. सरदेसाई, श्री एस पी गायकवाड तसेच विभाग प्रमुख व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. पी आर झंवर, डॉ पवन ढोके, डॉ. डि जी दळवी आदींनी परिश्रम घेतले. 




वनामकृविच्‍या कु. अनुराधा पाटेखेडे हिला राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार

वनामकृविच्‍या कु. अनुराधा पाटेखेडे हिला राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहिर झाल्‍याबद्दल सत्‍कार करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेशवरलू, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ. विलास पाटील आदी 
.........................................................................
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजनेची कु.अनुराधा रामकृष्ण पाटेखेडे हिला सन २०१२-१३ या वर्षाचा उत्कृष्ट स्वयंसेवक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१०-१२ या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमात जसे श्रमदान, रक्तदान शिबीर, अंधश्रद्धा निर्मुलन, ग्रामीण आरोग्य, व्यसनमुक्ती, महिला मेळावा, कृषी मोहोत्सव आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव यामध्ये उत्कुष्ट कार्य केल्याबद्दल तीला हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.
या पुरस्‍कारबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेशवरलू, शिक्षण संचालक तथा अधिष्ठता डॉ. विश्‍वास शिंदे, सहयोगी अधिष्ठता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ. विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ उदय खोडके, रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.कांबळे व प्रा.व्ही.बी.जाधव यांनी अभिनंदन केले.