Tuesday, September 2, 2014

विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहोचवा....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटन
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत ‘विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ बी एस गोखले, डॉ. डि एन गोखले, डॉ विलास पाटील, प्रा विशाला पटणम आदी
राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत ‘विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ कार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटनाप्रसंगी शास्‍त्रज्ञाच्‍या वाहनास हिरवा झेंडा दाखवतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरकुलसचिव डॉ डि एल जाधव, डॉ बी एस गोखले, डॉ. डि एन गोखले, डॉ विलास पाटील, प्रा विशाला पटणम, डॉ आनंद गोरे आदी 

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विशेष पिक संरक्षण मोहिमेमुळे त्‍यांना योग्‍य वेळी योग्‍य तंत्रज्ञान मिळणार आहे. या मोहिमेतंर्गत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शास्‍त्रज्ञांनी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय व विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र यांच्‍या वतीने दि. २ सप्‍टेबर रोजी आयोजित राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरीकार्यक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिमेचे उदघाटना प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि विकास अधिकारी श्री बी एस कच्‍छवे, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा विशाला पटणम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रोहिदास, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ पी एन सत्‍वधर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, शेतक-यांची तंत्रज्ञानाची गरज परिस्थितीनुसार वेळो‍वेळी बदलत असते, मराठवाडयातील शेतकरी काही दिवसांपुर्वी कमी पाऊसामुळे चिंतेत होता, आता पिकांवरील किड व रोगांचा प्रार्दभाव होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना किड व रोग व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यापीठाच्‍या या मोहिमेतंर्गत महिला शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍याची आवश्‍यकता असुन शेती कसण्‍यात त्‍याचा मोठा वाटा आहे. तसेच या कार्यक्रमातुन शेतक-यांच्‍या प्रतिक्रियामुळे विद्यापीठाच्‍या संशोधनास दिशा प्राप्‍त होर्इल.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना केंद्रबिंदु मानुन विस्तार कार्य करावे. शेतक-यांनी गटश्‍ोती मार्फत यांत्रिकीकरणावर भर दयावा. शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या समस्‍या आधी पुर्णपणे समजुन घेऊन आपला सल्‍ला दयावा. सध्‍याच्‍या हवामान परिस्थितीत पिकांवर किड व रोगांचा मोठा उद्रेक होऊ शकतो, त्‍यामुळे पिकांचा योग्‍य काळजी कशी घ्‍यावी याबाबतचे मार्गदर्शन या मोहिमेतंर्गत शेतक-यांपर्यंत जाईल, ही अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. तसेच कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमामुळे शेतक-यांमध्‍ये विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या मोहिमेतंर्गत पिकांवरील अतिरिक्‍त किडनाशकांचा वापर टाळण्‍यासाठी मार्गदर्शन करावे.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री नरेश देशमुख, श्री गिरीश पारधे, तालुका कृषि अधिकारी श्री डि बी काळे, आत्‍माचे उपसंचालक श्री अशोक काळे, डॉ एस डि जेठुरे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ ए के गोरे यांनी विशेष पिक संरक्षण मोहि‍मेबाबत सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. या मोहिमेतंर्गत शास्‍त्रज्ञांच्‍या वाहनास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन शास्‍त्रज्ञाची टीम रवाना करण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.   
विशेष पिक संरक्षण मोहिमेचे वैशिष्‍टे
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचलनालयांतंर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, कृषि विज्ञान केंद्रे यांच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा अभिनव विस्‍तार उपक्रम संपूर्ण मराठवाड्यात गेली तीन वर्षे यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. कार्यक्रमाचे यश लक्षात घेऊन यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र व कृषि विज्ञान केंद्राच्‍या माध्‍यमातुन तसेच सर्व महाविद्यालये व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीम हा उपक्रम पहिल्‍यांदाच दि. २० ऑगस्‍ट ते १५ सप्‍टेंबर दरम्‍यान राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंदाजे १० ते १२ हजार किमीच्‍या प्रवासात मराठवाड्याच्‍या साधारणपणे ३०० गांवात विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ व कृषि विभागाचे प्रतिनिधी शेतक-यांच्‍या शेतावर भेटी देऊन शेतक-यांना सद्य परिस्थितीत पीक संरक्षण व आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन करणार आहेत. सदरील कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍ह्यात दि. २ ते १२ सप्‍टेबर दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रश्‍न–उत्‍तरे अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन पीक संरक्षण, आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, एकात्मिक शेती पध्‍दती, मृद व जलसंधारण इ. विषयांवर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्‍त्रज्ञांकडुन मार्गदर्शन केले जाणार आहे. मागणी आधारीत काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे.  हा कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍ह्यांत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तथा परभणी येथील विभागीय कृषि विस्‍तार केंद्राच्‍या मार्फत राबविला जाणार असुन शास्‍त्रज्ञांचे एकूण चार चमू तयार करण्‍यात आले आहेत. यात कृषि विद्यावेत्‍ता, किटकशास्‍त्रज्ञ, वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ व उद्यानविद्या तज्ञ अशा चार ते पाच विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे.


मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव