Wednesday, December 31, 2014

आधुनिक तंत्रज्ञानापासुन आदिवासी शेतकरी वंचित राहु नयेत ........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गांवात शेतकरी मेळावा संपन्‍न
वनामकृविच्‍या पाणी व्‍यवस्‍थापन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत मौजे वाई (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) आयोजीत शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, कळमनुरीचे आमदार मा ना डॉ संतोष टारफे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरतालुका कृषि अधिकारी डी बी काळे, आदीवासी प्रकल्‍प विकास अधिकारी ए यु धाबे, सरपंच कविताताई दुधाळकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे, अजित मगर आदी
शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
शेतकरी मेळाव्‍यास उपस्थित आदिवासी शेतकरी व महिला शेतकरी
***********************
मनुष्‍य आपल्‍या दैनंदिन गरजाच्‍या वस्‍तु बाजारामधुन उपलब्‍ध करून घेऊ शकतो परंतु पाण्‍यासाठी आपणास निसर्गावरच अवलंबुन राहावे लागते. त्‍यामुळे पाण्‍याचा प्रत्‍येक थेंब काटेकोरपणे व कार्यक्षमरित्‍या वापरणे गरजेचे असुन शेतीसाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानापासुन आदिवासी शेतकरी वंचित राहु नये, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गांवातील निवडक ४७ आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्‍यात आले होते. या योजनेतंर्गत शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि ३० डिसेंबर रोजी मौजे वाई येथे आयोजीत करण्‍यात आला होता, या मेळाव्‍याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कळमनुरीचे आमदार मा ना डॉ संतोष टारफे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कळमनुरी तालुका कृषि अधिकारी डी बी काळे, आदीवासी प्रकल्‍प विकास अधिकारी श्री ए यु धाबे, सरपंच कविताताई दुधाळकर व प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे, श्री अजित मगर, श्री जटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, यावर्षी पर्जन्‍यमान कमी असतांना वाई गावातील आदीवासी शेतक-यांनी सोयाबीन पिकास संरक्षीत पाणी देऊन ब-यापैकी उत्‍पादन काढले आहे तसेच रब्‍बी पिकांना तुषार सिंचनामुळे संर‍क्षील पाणी देणे शक्‍य झाले, हे या योजनेची खरी उपलब्‍धी आहे. या पध्‍दतीने आदिवासी शेतक-यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतीमध्‍ये आर्थिक प्रगती साधता येईल. शासकीय अनुदानातुन मिळालेल्‍या निविष्‍ठांचा वापर कार्यक्षमपणे व योग्‍य पध्‍दतीने होतांना दिसत नाही तथापी वाई गावातील १०० टक्‍के लाभार्थ्‍यांनी तुषार संचाचा वापर योग्‍य पध्‍दतीने केल्‍याबाबत त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
आमदार मा ना डॉ संतोष टारफे आपल्‍या भाषणात विद्यापीठाने राबविलेल्‍या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून म्‍हणाले की, ब-याचवेळा शासकीय योजनांची माहिती नसल्‍याने सामान्‍य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचतच नाहीत, शेतक-यांनी अधिक जागरूक राहुन विविध योजनांची माहिती घ्‍यावी. कोरडवाहु शेती किफायतीशीर होण्‍यासाठी सुक्ष्‍मसिंचन व तुषार सिंचनाशिवाय पर्याय नाही. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदिवासी भागात होत आहे हे नक्‍कीच प्रगतीचे घोतक आहे. आदिवासी शेतक-यासाठी कृषि विद्यापीठाने राबविलेल्‍या योजनेप्रमाणे विविध योजना राबविल्‍यास आदिवासी भागातुन होणारे शेतक-यांचे स्‍थलांतर थांबण्‍यास मदत होऊन गावातच रोजगाराच्‍या संधी मिळतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कृषि विद्यापीठ, आदिवासी विकास योजना व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने आदिवासी शेतकरी जीवनात आमुलाग्र बदल होऊ शकतो.
तालुका कृषि अधिकारी डी बी काळे व आदीवासी प्रकल्‍प विकास अधिकारी श्री ए यु धाबे यांनी विविध आदिवासी योजनांची माहिती दिली तर वाई गांवचे ग्रामस्‍थ नंदकुमार वाईकर, सतीश पाचपुते, हरिभाऊ दुधाळकर, अजित मगर आदींनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा पारडकर व आभार प्रदर्शन डॉ के टी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी वाई ग्रामस्‍थ व पाणी व्‍यवस्‍‍थापन योजनेच्‍या अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. सदरिल कार्यक्रमास वाई गांवाच्‍या परिसरातील आदिवासी शेतकरी व महीला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना आमदार मा ना डॉ संतोष टारफे
शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर
शेतकरी मेळाव्‍यात प्रास्‍ताविक करतांना मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे

वनामकृवित महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ करणार विविध विषयावर मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय, गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दि 3 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्‍या पुणे येथील प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले यांच्‍या हस्‍ते होणार असुन परभणी महानगरपालिकाच्‍या महापौर मा सौ संगीता वडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍यास महिला शेतक-यांनी व शेतकरी बांधवानी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शि‍क्षण संचालक डॉ बी बी भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटनम व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले आहे.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात डॉ बी एम ठोंबरे हे कुक्‍कुटपालन व दुग्‍धव्‍यवसाय व्‍यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार असुन महिलांसाठी खाद्यपदार्थ निर्मितीशी निगडीत गृहउद्योग यावर डॉ विजया नलावडे, शेतीतील टाकाऊ पदार्थापासुन उपयुक्‍त वस्‍तुची निर्मितीबाबत डॉ जयश्री झेंड, भाज्‍या व फळांचे संरक्षण व साठवणुक यावर प्रा दिलीप मोरे, कौटुंबिक ताण-तणाव व्‍यवस्‍थापनात गृहिणीची भुमिका यावर डॉ जया बंगाळे व कपडयांचे नुतनीकरण यावर डॉ सुनिता काळे यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

Monday, December 29, 2014

शेतक-यांनी दुग्‍धव्‍यवसाय गट उदयोगाच्‍या माध्‍यमातुन करावा......जिल्‍हाधिकारी मा. सचिंन्‍द्र प्रताप सिंह

पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

मराठवाडयातील कोरडवाहु क्षेत्रात शेतीशी निगडीत पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय, रेशीम उदयोग, कुक्‍कुटपालन आदी उदयोगांची उभारणी करणे श्‍क्‍य असुन शेतक-यांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी या उदयोगांची सांगड घालणे आवश्यक आहे. शेतक-यांनी दुग्‍धव्‍यवसाय हा गट उदयोगाच्‍या माध्‍यमातुन केल्‍यास निश्चितच यश प्राप्‍त होईल, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी मा. सचिंन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले.
महा‍राष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी आयोजित जिल्‍हा उद्योग केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि 29 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण हे होते तर परभणीचे प्रसिध्‍द उद्योजक श्री ओमप्रकाश डागा, एमसीईडीचे  विभागीय अधिकारी श्री विलास आहेर, गोळेगाव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्‍हाधिकारी मा. सचिंन्‍द्र प्रताप सिंह पुढे म्‍हणाले की, परभणी जिल्‍हयात दुग्‍ध उत्‍पादनास मोठा वाव असुन जिल्‍हा दुग्‍ध उत्‍पादनात स्‍वयंपुर्ण होऊ शकतो. दुग्‍ध व्‍यवसाय हा शेतक-यांच्‍या आर्थिक स्‍थैर्यतेसाठी महत्‍वाचा दुवा ठरु शकतो. यासाठी दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ निर्मिती, दुधाचे मुल्‍यवर्धन, टिकवण क्षमता व दुधाची बाजारपेठ या क्षेत्रात कार्य करणे आवश्‍यक आहे. मराठवाडयातील पशुधन जसे देवणी व लाल कंधारी गोवंश, होलदेव संकरित गोवंश, मराठवाडी म्‍हैस व उस्‍मानाबादी शेळी यांचे सवंर्धन, संशोधन व विकासाचे कार्य होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठवाडयातील टंचाईग्रस्‍त भागात कमी पाण्‍यावर येणारी चारा पिके शेतक-यांनी घ्‍यावीत. शेतक-यांनी दुग्‍धव्‍यवसाय शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने करुन रोजगार निर्मिती करावी. मानवाच्‍या समतोल आहारासाठी पशुधन संगापेपणचा व्‍यवसाय महत्‍वाचा असुन मानवाची पेाषण समस्‍या सोडविण्‍यास दुग्‍धव्‍यवसाय हा मैलाचा दगड ठरेल.
या प्रसंगी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी आपल्‍या भाषणात कृषि पर्यटनावर भर दिला तर एमसीईडीचे विभागीय अधिकारी विलास आहेर यांनी बंदिस्‍त शेळीपालन करण्‍याचा सल्‍ला आपल्‍या भाषणात शेतक-यांना दिला. उदयोजक श्री ओमप्रकाश डागा आपल्‍या मार्गदर्शनात यशस्‍वी उदयोजक होण्‍यासाठी धाडस ठेवणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण समन्‍वयक डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर सुत्रसंचालन उदय वाईकर व आभार प्रदर्शन प्रकल्‍प अधिकारी शंकर पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. आनंद शिंदे डॉ. शंकर नरवाडे प्रा. दत्‍ता बैनवाड व श्री. प्रभाकर भोसले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी, विदयापीठ अधिकरी व कर्मचारी शेतकरी पशुपालक व विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सहा दिवस चालण-या या प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्हयातील 45 शेतकरी पशुपालकांचा सहभाग असुन टंचाईग्रस्‍त परिस्थिातीत चारा पिकांचे व्‍यवस्‍थापन, अपारंपारिक पशुखादयाचा वापर, देशी गोवंश संवर्धन, पशुंचे पैदास, आहार, व्‍यवस्‍थापन व आरोग्‍य, दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ निर्मिती, पशुधनाचे लसिकरण, बंदिस्‍त शेळीपालन व कुक्‍कुट पालन आदी विषयांवर विदयापीठातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.




महसुल व कृषि मंत्री मा ना श्री एकनाथराव खडसे यांची विद्यापीठाच्‍या दालनास भेट

अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात स्‍व डॉ पंजाबराव देशमुख यांच्‍या ११६ व्‍या जंयतीनिमित्‍त अॅग्रोटेक २०१४ राज्‍यस्‍तरीय भव्‍य कृषि प्रदर्शनाचे आयोजन दि २७ ते २९ डिसेबर दरम्‍यान करण्‍यात आले होते. या प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठयाच्‍या दालनाचा समावेश कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आला होता. या दालनास दि २७ डिसेबर रोजी महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल व कृषि मंत्री मा ना श्री एकनाथराव खडसे, खासदार श्री संजय धोत्रे, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ रविप्रकाश दाणी आदींनी भेट देऊन विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे एमएयुएस-१६२ वाणासह वि‍विध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी विद्यापीठाचे वैजनाथ सातपुते यांनी माहिती दिली.

Thursday, December 25, 2014

दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर वनामकृवि अतंर्गत असलेल्‍या सर्व शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांच्‍या वसतीगृह शुल्‍कात 50 टक्‍के माफी

दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या सर्व शासकीय महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2014-15 च्‍या चौथ्‍या, सहाव्‍या व आठव्‍या सत्रातील विद्यार्थ्‍यांनी प्रवेश शुल्‍क माफीची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्‍या अनुषांगाने महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडुन जिल्‍हयातील 50 टक्‍के पेक्षा कमी महसुल आणेवारी जाहिर केलेल्‍या गावांची यादी प्राप्‍त झाल्‍यानंतर नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्‍यांची गांवे 50 टक्‍के पेक्षा कमी आणेवारी असलेल्‍या यादीत समाविष्‍ठ असल्‍यास संबंधीत विद्यार्थ्‍यांचे 50 टक्‍के वसतीगृह शुल्‍क माफ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात असुन ज्‍या विद्यार्थ्‍यांनी वसतीगृह शुल्‍क पुर्ण भरले आहे, त्‍या विद्यार्थ्‍यांना 50 टक्‍के वसतीगृह शुल्‍क परत करण्‍यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी कळविले आहे.

Tuesday, December 23, 2014

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या हायड्रोपोनिक्‍स प्रकल्‍पास विभागीय आयुक्‍तांची भेट

मातीशिवाय कमी पाण्‍यात पौष्टिक मक्‍याचा हिरवा चारा उत्‍पादनाचे प्रात्‍यक्षिक
सध्‍याची पीक परिस्थिती व कमी झालेले पर्जन्‍यमान लक्षात घेता येत्‍या काळात जनावरांसाठी चा-याची कमतरता भासणार आहे, ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गंत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान वापरून कमी पाण्‍यात, कमी जागेत व कमी खर्चात अधिक पौष्‍टीक मक्‍याचा हिरवा चारा उत्‍पादनाचे प्रात्‍यक्षिक प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. सदरील प्रकल्‍पास विभागीय आयुक्‍त संजीवकुमार जैस्‍वाल व जिल्‍हाधिकारी विक्रमकुमार यांनी नुकतीच भेट दिली. प्रकल्‍पाबाबत कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार व पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय विषय विशेषज्ञ प्रा विजय जाधव यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी किशनराव लवांडे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी पी बी चव्‍हाण, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक शामराव सोळुंके, उपसंचालक सतीश शिरडकर, राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे तांत्रिक सल्‍लागार बबनराव कापसे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रा दिप्‍ती पाटगांवकर, डॉ के के झाडे, डॉ एन डी देशमुख व आत्‍मा औरंगाबादचे कर्मचारी उपस्थित होते. सदरील शेतक-यांना हिरवा चारा तयार करण्‍यास लागणार खर्चात अधिक कपात कशी करता येईल यावर संशोधन करून आवश्यकते बदल या तंत्रज्ञानात करण्‍याचे विभागीय आयुक्‍त संजीवकुमार जैस्‍वाल यांनी सुचविले. 

हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान प्रकल्‍पाबाबत कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार म्‍हणाले की, 10 ते 11 दिवसांत केवळ मक्‍याचे बियाणे, ट्रे, पाणी योग्‍य व्‍यवस्‍थापनाचा वापर करून एक किलो बियाण्‍यापासुन 4 ते 5 किलोग्रॅम हिरवा पौष्टिक चारा मिळु शकतो. अशाप्रकारे चारा तयार करण्‍यासाठी गहु, मका, बार्ली, मोट या तृणधान्‍याचा वापर करता येतो. हा चारा जनावरांच्‍या दररोजच्‍या आहारासोबत वापरून काही प्रमाणात हिरव्‍या चा-याची गरज भागविल्‍या जाऊ शकते. हिरवा चारा विकत घेण्‍यापेक्षा तुलनात्‍मकदृष्‍टया या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्‍पादित केलेला चारा कमी खर्चात उपलब्‍ध होणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय विषय विशेषज्ञ प्रा विजय जाधव हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान प्रकल्‍पाबाबत म्‍हणाले की, हायड्रोपोनिक्‍स म्‍हणजे मातीशिवाय किंवा जमिनीशिवाय वनस्‍पती वाढविणे, बियाणास आर्द्रता, पाणी, अन्‍नद्रव्‍ये देऊन मातीशिवाय वाढ केली जाते. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी पाण्‍यात, कमी कालावधीत अधिक पौष्टिक हिरवा चारा उपलब्‍ध होतो. प्रथम तृणधान्‍य 12 तास मोड आणण्‍यासाठी पाण्‍यात भिजत ठेऊन पाणी काढुन ते धान्‍य गोणीत 24 ते 36 तास दाबुन ठेवावे.  या कालावधीत मोड येण्‍यास सुरूवात होते. मोड आलेले बियाणे, प्‍लॉस्टिक ट्रे मध्‍ये पसरून लाकडी मांडणीवर ठेवावे. त्‍यावर दर दोन तासांनी पाणी फवारावे. यामुळे पीक वाढीसाठी आवश्यक आर्द्रता, ओलावा ठेवला जातो. प्‍लॉस्टिक रॅकमध्‍ये 8 ते 10 दिवसात 20 ते 30 सेमी उंचीचे हिरवे पिक तयार होते. हे तयार झालेले पिक जनावरांना मुळांसकट खाऊ घालावे. एक किलो धान्‍यापासुन 5 ते 6 किलो हिरवा चारा 8 ते 10 दिवसात उपलब्‍ध होतो. तसेच या चा-यात धान्‍याच्‍या तुलनेत 2 ते 2.5 पट अधिक प्रथिने व इत्‍र पौष्‍टीक घटक असतात. या पध्‍दतीने वर्षभर हिरवा पौष्‍टीक चारा जनावरांसाठी तयार करता येतो. हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे म्‍हणजे दुष्‍काळी परिस्थितीत किंवा उन्‍हाळयात हिरव्‍या चा-याची उपलब्‍धता होते. कमी कालावधीत अधिक पोषणमुल्‍य असलेल्‍या चारा उपलब्‍ध होतो. या पध्‍दतीने वर्षभर हिरव्‍या चा-याचे उत्‍पादन घेता येते. दुष्‍काळी परिस्थितीत शेतक-यांना भेडसावणारा वैरणाचा प्रश्‍न गंभीर बनत असुन हायड्रोपोनिक्‍स तसेच शेतातील पिकांच्‍या टाकाऊ पदार्थापासुन (सोयाबीन, मका, ज्‍वारी व बाजरीचे कुटार आदीं) प्रक्रिया करून पौष्‍टीक खाद्य बनविण्‍याचे प्रात्‍यक्षिक कृषि विज्ञान केंद्रामार्फत देण्‍यात येणार आहे.

सौजन्‍य 
कार्यक्रम समन्‍वयक, कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद

Monday, December 22, 2014

अन्नतंत्र पदवीधरांनी ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्या शेतमालाच्या मुल्यंवर्धनासाठी करावा......विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

अन्‍नतंत्र महाविद्यालयात आयएसओ-२२०००० व एचएसीसीपी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, व्‍यासपीठावर प्रा पी एन सत्‍वधर, प्रा संजय इंदाणी, प्रा हेमंत देशपांडे, प्रा आर बी क्षीरसागर आदी
**************************
योग्‍य पाऊसमान असतांना शेतकरी मोठया प्रमाणात शेतीत उत्‍पादन काढीत आहे, शेतकरी आत्‍महत्‍यामागील अनेक कारणांपैकी शेतमालास अपेक्षीत भाव न मिळणे हे असुन शेतीमालाचे मुल्‍यवर्धनासाठी प्रक्रियाउदयोग उभारणे गरजेचे आहे, याकरिता अन्‍नतंत्र पदवीधरांनी कार्य करावे, असे प्रतिपादन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविदयालयात अन्‍नसुरक्षा व्‍यवस्‍थापन प्रणाली अंतर्गत आयएसओ-२२०००० व एचएसीसीपी याबाबतचे पदवी, पदव्‍युत्‍तर आणि आचार्य स्‍नातकांसाठी तीन दिवशीय प्रशिक्षण दिनांक १९ ते २१ डिसेंबर दरम्‍याण आयोजित करण्‍यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोप दि २१ डिसेंबर रोजी झाला, त्‍याप्रसंगी ते अध्‍यक्षस्‍थानावरून बोलत होते. याप्रसंगी अन्‍नतंत्र महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.पी.एन.सत्‍वधर, विभागप्रमुख प्रा. हेमंत देशपांडे व प्रा. आर. बी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.बी.बी. भोसले पुढे म्‍हणाले की, देशातील वाढत्‍या संख्‍येला पुरेसे व पोषक अन्‍न मिळाले पाहिजे, हया अन्‍नसुरक्षेसाठी शेतमालाचे मुल्‍यवर्धन करण्‍याची गरज आहे. सदरिल प्रशिक्षणात अवगत केलेले कौशल्‍य अन्‍न तंत्र पदवीधरांना निश्चितच उपयोगी पडेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या प्रशिक्षणाकरीता आंतरराष्‍ट्रीयस्‍तरावरील मान्‍यता प्राप्‍त प्रशिक्षक तथा विषयतज्ञ श्री संजय इंदाणी यांनी अन्‍न प्रक्रिया उदयोगांतर्गत उपभोक्‍त्‍याची अन्‍नसुरक्षेसाठीच्‍या विविध पैलुंवर मार्गदर्शन केले. सदरील समारोपात सहभागी विदयार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. प्रशिक्षण यशस्‍वीतेसाठी डॉ. अे.आर. सावते, प्रा. आर.बी. क्षिरसागर, प्रा.के.एस. गाडे, प्रा.बी.एम. पाटील, प्रा. इम्राण हाश्‍मी आदींनी परिश्रम घेतले.

Friday, December 19, 2014

वनामकृविचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचेकडे दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार

दापोली (जि रत्‍नागिरी) येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे सध्‍याचे कुलगुरू मा डॉ किशनराव लवांडे हे दि २० डिसेंबर रोजी वयाची ६५ वर्ष पुर्ण झाल्‍यामुळे सेवानिवृत्‍त होत असुन या विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदाचा अतिरिक्‍त कार्यभार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना स्‍वीकारण्‍याचे आदेश महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा कुलपती मा श्री चेन्‍नमनेनी विद्यासागर राव यांच्‍याकडुन  प्राप्‍त झाले आहे. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे दि २१ डिसेंबर  पासुन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार स्‍वीकारणार असुन पुढील आदेश प्राप्‍त होईपर्यंत किंवा नवीन कुलगुरू नियुक्‍त होईपर्यंत यांच्‍याकडे हा कार्यभार राहणार आहे. 

शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्‍यासाठी एकात्मिक शेतीपध्‍दती उपयुक्‍त ........ कुलगुरू मा डॉ.बी.व्यं‍कटेश्‍वरलू

        विविध पीक लागवडीसह शेळीपालन, दुग्‍ध व्‍यवसाय, कुक्कूटपालन, रेशीम उद्योग आदी पुरक जोडधंद्यांचा अवलंब केल्‍यास शेतक-यांच्‍या उत्‍पादनात भर पडुन आर्थिक शाश्‍वतता व सुरक्षितता प्राप्‍त होर्इल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍प व कृषि विद्या विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेद्वारे प्रायोजित उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर दहा दिवसीय राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर  प्राचार्य डॉ डी एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती.     
या प्रशिक्षणात देशातील विविध कृषि विद्यापीठे व कृषि सलग्‍न संस्‍था मधुन आलेल्‍या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, एकात्मिक शेती पध्‍दतीची मुलतत्‍वे अंगीकरुन जिरायत व अल्‍पभुधारक शेतक-यांसाठी तयार करण्‍यात आलेली प्रारुपे शेतक-यांमध्‍ये पोहचविणे गरजचे आहे. कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृह विज्ञान व अन्‍नतंत्र महाविद्यालयातील तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
    शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या एकात्मिक शेती पध्‍दतीच्‍या विविध पैलुचा उपयोग करुन सहभागी शास्‍त्रज्ञांनी संशोधनात करावे असे सुचित केले तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी शेतक-यांना येणा-या मुलभूत अडचणी लक्षात घेवुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञानी संशोधनाची दिशा ठरवावी  प्रतिपादन केले.
       याप्रसंगी प्रशिक्षणार्थी आसाम ये‍थील ज्‍योति रेखा, कर्नाटक मधील रुपश्रेणी व सोलापुर येथील श्री दडगे यांनी आपल्‍या मनोगतात सदरील प्रशिक्षण पुढील संशोधन तथा कृषि शिक्षणात फायदेशीर असल्‍याचे सांगीतले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ए.एस.कारले तर आभार प्रदर्शन डॉ. डब्‍ल्‍यू. एन. नारखेडे यांनी केले. प्रशिक्षण यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम समन्‍वयक डॉ.डब्‍यू.एन.नारखेडे, डॉ. बी. व्‍ही.आसेवार, डॉ.आर. बी चांगुले, डॉ. ए. एस. कारले, डॉ. के. टी. जाधव, डॉ. ए. एस.जाधव, डॉ. एन. जी. कु-हाडे, डॉ. ए. के. गारे, सुनिता पवार, डॉ. मिर्झा व एकात्मिक शेती पध्‍दती आणि कृषिविद्या विभागामधील प्राघ्‍यापक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

Wednesday, December 17, 2014

वनामकृवि रब्बी ज्वारीच्या होप प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

वनामकृवि रब्‍बी ज्‍वारीच्‍या होप प्रकल्‍पाला आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कारासह इक्रिसॅट हैद्राबादचे महासंचालक डॉ विल्‍यम डर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे
***************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राबविण्‍यात आलेल्‍या रब्‍बी ज्‍वारीच्‍या उत्‍पादनवाढीच्‍या प्रकल्‍प अर्थात होप प्रकल्‍पाला आऊट स्‍टॅडींग पार्टनरशिप अवार्ड – आशिया या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. हैद्राबाद येथे दि १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्‍या इक्रिसॅट या आंतरराष्‍ट्रीय संस्‍थेच्‍या वार्षिक दिनाच्‍या कार्यक्रमात हा पुरस्‍कार विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे यांनी स्‍वीकारला. या वेळी इक्रिसॅट हैद्राबादचे महासंचालक डॉ विल्‍यम डर, संचालक डॉ स्‍टेफानिया ग्रॅन्‍डो, डॉ अशोक कुमार, डॉ रविंद्र रेड्डी यांच्‍यासह आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे शास्‍त्रज्ञ उपस्थित हेाते.
आगामी काळातील अन्‍नसुरक्षा, जनावरांसाठी पौष्टिक चा-याचा प्रश्‍न लक्षात घेता ज्‍वारीची उत्‍पादकता वाढविणे आवश्‍यक आहे. यासाठी सन २००९ पासुन मराठवाडयातील परभणी, बीड, जालना जिल्‍हयांत बिल मिलींडा गेट फाऊंडेशनच्‍या आर्थिक साहयाने इक्रिसॅट, हैद्राबाद मार्फत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत होप प्रकल्‍प (रब्‍बी ज्‍वारी उत्‍पाकता वाढीचा प्रकल्‍प) राबविला जात आहे.
मागील पाच वर्षात या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील सुमारे २११९० शेतक-यांमार्फत रब्‍बी ज्‍वारीच्‍या सुधारित जाती व लागवड तंत्रज्ञान पोचविण्‍यात आले. मागील पाच वर्षातील रब्‍बी ज्‍वारी धान्‍य व कडबा उत्‍पादनाची सरासरी पाहता सुधारित जातीपासुन स्‍थानिक जातीपेक्षा सरासरी ४० टक्‍के जास्‍त धान्‍य उत्‍पादन तर २३ टक्‍के जास्‍त कडब्‍याचे उत्‍पादन वाढले तसेच चा-याची गुणवत्‍ता वाढली. त्‍याचा जनावरांचे आरोग्‍य व दुग्‍धोत्‍पादन वाढीसाठी फायदा झाला असुन प्रकल्‍पामार्फत देण्‍यात येणा-या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अनेक शेतक-यांनी रब्‍बी ज्‍वारीचे दर्जेदार उत्‍पादन मिळविले.
हा प्रकल्‍प राबविण्‍यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्‍पाच्‍या पाच वर्षाच्‍या कालावधीत माजी संशोधन संचालक डॉ एस टी बोरीकर यांनी इक्रिसॅटचे सल्‍लागार या नात्‍याने वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रकल्‍पाच्‍या यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी डॉ एस एस अंबेकर, डॉ एस पी म्‍हेत्रे, सध्‍याचे प्रभारी अधि‍कारी डॉ एच व्हि काळपांडे, उपसमन्‍वयक प्रा अंबिका मोरे, प्रा सचिन मोरे, प्रा रणजित चव्‍हाण, आर एल औढेंकर व प्रकल्‍पातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, December 11, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ देणार शेतक-यांना - ‘उमेद’

मराठवाडयातील निवडक गावांत करणार उपक्रमाव्‍दारे प्रबोधन
परभणी, ता. ११ : मराठवाडा विभागातील दुष्‍काळी परिस्थितीमुळे खचलेल्‍या शेतक-यांना धीर, जगण्‍याचं बळ देण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे उमेद हा उपक्रम राबविला जाणार असुन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेतुन कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी करण्‍यात आली आहे. येत्‍या दोन महिन्‍यात मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात प्रत्‍येक तालुक्‍यातील किमान दोन गावांत उपक्रम राबविला जाणार असुन साधारणत: दिडशे पेक्षा जास्‍त गावात पोहचण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न राहणार आहे. मराठवाडा विभागात उदभवलेल्‍या दुष्‍काळी परिस्थितीमुळे काही शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. शेतक-यांमध्‍ये आलेली नैराश्‍याची भावना दुर करून त्‍यांना जगण्‍याचे बळ देण्‍यासाठी गावात जाऊन जागृतीचा प्रयत्‍न होणार आहे. दुष्‍काळामुळे आलेले नैराश्‍य दूर करण्‍यासाठी प्रयत्‍नांचा भाग म्‍हणुन उमेद हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. कृषि विद्यापीठातंर्गत विभागीय विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता, कृषि विज्ञान केंद्र, सर्व घटक महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक, विविध संशोधन केंद्रे, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
सदरिल गावात शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या फेरीव्‍दारे शास्‍त्रज्ञ व राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे प्रबोधन केले जाणार असुन चर्चासत्रात सद्यपरिस्थितीत काही भागात उभी असलेली रब्‍बी पीकांचे व्‍यवस्‍थापन,  दुष्‍काळी परिस्थितीत चारा व्‍यवस्‍थापन, काळानुरूप बदलावी लागणारी पीक पध्‍दती, जनावरांची निगा व देखभाल, मृद व जलसंधारणाचे उपाय, आधुनिक सिंचन पध्‍दती, शाश्‍वत उत्‍पन्‍नासाठी शेतीपूरक उद्योग तसेच स्‍थानीक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने विकसित केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान आदी विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कोणतीही औपचारीकता न पाळता अतिशय साधेपणाने हा उपक्रम पार पाडण्‍यात यावा, असे निर्देश कुलगुरू यांनी दिले असुन विस्‍तार शिक्षण संचालकनालयातर्फे या उपक्रमाची आखाणी करण्‍यात आली आहे. लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्‍याचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सांगितले.

Wednesday, December 10, 2014

कृषि शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावरील संशोधन प्रात्‍यक्षिकावर भर दयावा...... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
वनामकृवितील राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलुव्‍यासपीठावर यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेप्राचार्य डॉ डी एन गोखले आदी. 
********************************
देशात राजस्‍थान मध्ये सर्वात कमी पाऊस पडतो पंरतु त्‍या राज्‍यात एकाही शेतक-यांनी आत्‍महत्‍या केली नाही, कारण तेथे शेतीसोबत पशुपालनावर जास्‍त भर आहे. त्‍यामुळे मराठवाडयातील शेतीला पशुपालन, दुग्‍ध व्‍यवसाय, रेशीम उद्योग, शेळी-मेंढी पालन आदी शेती संलग्‍न व्‍यवसायाची जोड देणे अत्‍यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍प व कृषि विद्या विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १० ते १९ डिसेंबर दरम्‍यान उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर दहा दिवसीय राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला असुन या प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते, व्‍यासपीठावर यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डी एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती. 
    कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु उदघाटनपर भाषणात पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील कोरडवाहु शेती पदध्‍तीत फक्‍त कापुस व सोयाबीन या दोनच पिकांची मुख्‍यता लागवड होत आहे, यामुळे ही दोन पिके हातची गेली कि शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडत आहे तसेच दुष्‍काळ परिस्थित जनावरांच्‍या चाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे, यासाठी पिक पध्‍दतीत बदल करणे आवश्‍यक आहे. एकात्मिक शेती पध्‍दतीचा मुळ हेतु शेतीत कमीत कमी खर्च करून शेतीतील जोखिम कमी करणे व शाश्‍वत उत्‍पादन काढणे हा असुन त्‍यांची आजच्‍या परिस्थिती जास्‍त गरज आहे. विद्यापीठाने एकात्मिक पीक पध्‍दतीच्‍या विविध मोडयुलचे शेतक-यांच्‍या शेतावर संशोधन करावे. अल्‍पभुधारक जिरायत शेतक-यांच्‍या वर्षभराचा पिक लागवड पध्‍दती, रोजगार उपलब्‍धतता व जमाखर्च यांचासह संपुर्ण जीवनामानाचा अभ्‍यास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी उपस्थित शास्‍त्रज्ञांना दिला.
   शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, राज्‍यातील कोरडवाहु शेतीच्‍या परिस्थितीला एकात्मिक शेती पध्‍दतीत हेच उत्‍तर असुन याचा विस्‍तार होणे आवश्‍यक आहे. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी प्रशिक्षणात सहभागी शास्‍त्रज्ञांनी एकात्मिक शेती पध्‍दतीतील विविध पैलुवर वि‍चारांची देवाण घेवाण करून शेतक-यांन पर्यंत योग्‍य संदेश घेऊन जाण्‍याचा सल्‍ला आपल्‍या भाषणात दिला तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतक-यांना जास्‍त उत्‍पन्‍न काढणा-या तंत्रज्ञानापेक्षा शाश्‍वत उत्‍पन्‍न देणा-या तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन केले.
    कार्यक्रमात स्‍वागतपर भाषण प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी तर प्रास्‍ताविक प्रमुख शास्‍त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्‍वयक डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ के टि जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्‍वयक प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, वि‍भाग प्रमुख, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
   या दहा दिवसीय प्रशिक्षणात कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आदींसह राज्‍यातील कृषि विद्यापीठे व कृषि संबंधीत संस्‍थामधील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक सहभागी झाले असुन एकात्मिक शेती पध्‍दती, शेतीसंलग्‍न व्‍यवसायांची योग्‍य सांगड, शेतीतील उपलब्‍ध संसाधनाचा योग्‍य वापर, शेतकरी कुटुंबास वर्षभर रोजगार उपलब्‍धतता, शाश्‍वत उत्‍पादन आदी बाबीसंबंधी विविध विषयावर शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Tuesday, December 9, 2014

डॉ आशा आर्या यांच्‍या संशोधनपर भित्‍तीपत्रकास राष्‍ट्रीय पारितोषीक

लुधियाना येथे न्‍युट्रीशन सोसायटी ऑफ इंडियाची ४५ वी राष्‍ट्रीय वार्षिक परिषद दि ६ ते ८ नोब्‍हेंबर दरम्‍यान पार पडली. या परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या अन्‍न व पोषण विभागाच्‍या सहयोगी प्राध्‍यापिका डॉ आशा आर्या यांनी डेव्‍हलपमेंट ऑफ चंक्‍स युटीलायझींग इडिबल फुड डिस्‍कार्डस् टू इंम्‍प्रुव्‍ह न्‍युट्रीएंट सेक्‍युरिटी या विषयावरील भित्‍तीपत्रक सादर केले. या संशोधनामध्‍ये अन्‍न पदार्थांचे खाण्‍यायोग्‍य टाकाऊ भाग जसे की फुलकोबीची व शेवग्‍याची पाने यांचा अन्‍नपदार्थांचे मुल्‍यवर्धन करण्‍यासाठी यशस्‍वीपणे वापर करता येतो, असे दर्शविण्‍यात आलेले आहे. सदरिल भित्‍तीपत्रक स्‍वरूपात मांडण्‍यात आलेल्‍या संशोधनास या राष्‍ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषीक राष्‍ट्रीय पोषण परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ अनुरा कुरपद यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. 

उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍प व कृषि विद्या विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १० ते १९ डिसेंबर दरम्‍यान उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर दहा दिवसाचा राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला असुन या प्रशिक्षणाचे उदघाटन दि. १० डिसेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या निम्‍नस्‍तर शिक्षण सभागृहात सकाळी १०.०० वाजता कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर  व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षणात देशातील विविध कृषि विद्यापीठे व कृषि संबंधीत संस्‍थामधील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक सहभागी होणार आहेत. देशातील सरासरी जमीनधारणा क्षेत्र केवळ ०.१५ हेक्टर इतकी अत्‍यल्‍प असुन शेतीवर अवलंबुन असलेल्‍या कुटुंबाची अन्‍नधान्‍य व इतर उपजीवीकेसाठी आवश्‍यक बाबींची पुर्तता होत नसल्‍याने एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करून शेती व शेतीसंलग्‍न व्‍यवसायांची योग्‍य सांगड घालणे आवश्‍यक आहे. यामुळे शेतीतील उपलब्‍ध संसाधनाचा योग्‍य वापर होऊन शेतकरी कुटुंबास वर्षभर रोजगार उपलब्‍ध होईल व शाश्‍वत उत्‍पादन घेणे शक्‍य होईल. या बाबीसंबंधी विविध विषयावर सदरील प्रशिक्षणात विविध शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन प्रमुख शास्‍त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्‍वयक डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, प्राचार्य तथा विभाग प्रमुख डॉ डी एन गोखलेप्रशिक्षण सहसमन्‍वयक प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले आहे.