Tuesday, January 13, 2015

रासायनिक तणनाशकांचा वापर काळजीपुर्वक व्‍हावा..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु


प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ अशोक जाधव आदी. 
**********************************************************************
     शेतक-यांचा पिकातील तण व्‍यवस्थापनासाठी मोठा खर्च होते त्‍यावर पर्याय म्‍हणुन रासायनिक तणनाशकांचा वापर आज देशात व राज्‍यात वाढत आहे, परंतु त्‍याचा अमर्यादित वापर होऊ नये. ब-याच वेळा शेतकरी तणनाशकांचा वापर खत व बियाणे विक्रीत्‍यांचा सल्‍लाने करतात, परंतु खत व बियाणे विक्रीत्‍यांना त्‍याचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्‍यामुळे त्‍यांना देखिल याबाबत प्रशिक्षीत करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
     केंद्रीय कृषि मंत्रालयाच्‍या सौजन्‍याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी वि़द्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्‍या विद्यमाने ‘पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावर राज्‍याच्‍या कृषी विभागातील कृ‍षी पदवीधारक कर्मचारीकृषि विद्यापीठातीलकृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांसाठी दि ६ ते १३ जानेवारी दरम्‍यान आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रशिक्षणाच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले व प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणालेकी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या संपर्कात असणारे कृषि विस्‍तारकांचे अनुभव हे विद्यापीठाच्‍या संशोधनासाठी उपयुक्‍त असुन यासाठी याप्रकारच्‍या प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले, की आज बाजारात अनेक नवनवीन तणनाशके उपलब्‍ध होत असुन त्‍याच्‍या वापराबाबत शेतक-यांना अनेक अडचणी येतात, त्‍या सोडविण्‍याचे महत्‍वाचे कार्य कृषि विभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांना करावे लागते, त्‍यांनाच  शेतक-यांचा सल्‍लागार म्‍हणुन भुमिका बजवावी लागते. यासाठी अशाप्रकाराच्‍या प्रशिक्षणातील ज्ञान उपयुक्‍त आहे.
     कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थी कृषि अधिकारी सय्यद रहिम यांनी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग प्रत्‍यक्ष शेतक-यांना मार्गदर्शन करतांना निश्चित होईल असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्‍वयक डॉ अशोक जाधव यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमास सहभागी प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.