Monday, February 9, 2015

शेतीत यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही ......... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

मौजे मानोली (ता. मानवत,जि. परभणी) येथील शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद
विद्यापीठाने विकसित केलेली ज्‍वारीचे परभणी मोती वाणांच्‍या पथदर्शी प्रात्‍यक्षिकाची पाहणी करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रगतशील शेतकरी मदनमहाराज शिंदे, डॉ एच व्‍ही काळपांडे आदी
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
परभणी: शेतीतील वाढता निविष्‍ठा व मजुरीचा खर्च, त्‍या तुलनेत पीकांना मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकरी अडजणीत येत आहे. पीक काढणीच्‍या वेळी मजुरांची टंचाई यावर शेतीचे यांत्रिकीकरण करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व हैद्राबाद येथील ज्‍वार संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि १ फेब्रुवारी रोजी मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली (ता.मानवत, जि.परभणी) येथे शेतकरी मेळावाचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, अवधुत शिंदे, कृषी अधिकारी श्री तोष्‍णीवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की देशापातळीवरील केलेल्‍या एका सर्व्‍हेक्षणात असे निर्देशानात आले की दुसरा पर्याय उपलब्‍ध झाल्‍यास ४० टक्‍के शेतकरी शेती व्‍यवसाय सोडण्‍यास तयार आहेत. दुष्‍काळस्थित शेती टिकवायची असेल तर शेती पुरक जोडधंद्याशिवाय गत्‍यंतर नाही. जोडधंद्यामध्‍ये पशुपालन हा मुख्‍य व्‍यवसाय असुन त्‍यासाठी चारापिके घ्‍यावी लागणार आहेत. परंतु दुष्‍काळस्थित चा-याचा प्रश्‍न गंभीर होत असुन मराठवाडयातील चा-याचे क्षेत्र कमी होत आहे. यासाठी ज्‍वारीचे महत्‍व वाढत असुन ज्‍वारी काढणीसाठी मजुरांचा मोठा खर्च होतो, त्‍याकरिता कृषि विद्यापीठाने हैद्राबाद येथील इक्रीसॅट व क्रीडा यांच्‍याकडुन ज्‍वारीच्‍या काढणी व मळणी यंत्राची मागणी केली असुन त्‍याचे शेतक-यांच्‍या शेतावर लवकरच प्रात्‍यक्षिके घेण्‍यात येतील. मानोली गावातील शेतकरी कृषी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी सतत संपर्कात राहुन प्रगत तंत्रज्ञानाच्‍या जोरावर पीक उत्‍पादनात वाढीचा आदर्श इतर शेतक-यांपुढे ठेवला आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर भाषणात म्‍हणाले, की हैद्राबाद येथील ज्‍वार संशोधन संचालनालयाच्‍या मार्फत वनामकृविने परभणी जिल्‍हयातील मौजे मानोली, रामेटाकळी व इंदेवाडी या गावांमध्‍ये रब्‍बी ज्‍वारीचे परभणी मोती व परभणी ज्‍योती वाणाची पथदर्शी पीक प्रात्‍यक्षिके ७५ एकरावर घेण्‍यात आली असुन त्‍यांची परिस्थिती समाधानकारक आहे. आज ज्‍वारीचे मुल्‍यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज असुन शेतक-यांना शेतमालाच्‍या बाचारपेठेचे तंत्र शिकावे लागेल. कमी खर्चात उत्‍पादन वाढविण्‍याचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडे असुन शेतक-यांनी त्‍याचा अवलंब करावा, असे मत प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी मनोगतात व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी रब्‍बी ज्‍वार पथदर्शी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. मेळाव्‍यात ज्‍वार कृषीविद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, ज्‍वार कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. मो. इलियास, ज्‍वार पैदासकर प्रा अंबिका मोरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आर एल औढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ यु एन आळसे यांनी केले.
याप्रसंगी रबी ज्‍वार पथदर्शी पीक प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास शेतक-यांनी व मान्‍यवरांनी भेट देऊन विद्यापीठाच्‍या विविध वाणाची पा‍हणी केली. मेळाव्‍यास मानोली, इंदेवाडी व रामे टाकळी येथील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थिती होते.