Tuesday, March 31, 2015

आदिवासी शेतकरी बांधवांनी शेतीत आधुनिकतेची कास धरावी .......... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

मेळाव्‍याचे उद्घाटन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, डॉ अशोक कडाळे आदी. 
मेळाव्‍यात बहुउद्देशीय खत व बियाणे पेरणी यंत्राचे वाटप कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍य हस्‍ते करतांना, सोबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, डॉ अशोक कडाळे आदी. 

शेतीमध्‍ये प्रगती साधन्‍याकरिता आदिवासी शेतक-यांनी यांत्रिकीकरण, उत्‍तम दर्जाची पीकांची वाण व विविध शेती निवीष्‍ठांचा अवलंब विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या शिफारशीप्रमाणे करावा व आधुनिकतेची कास धरावी, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन संशोधनेव्‍दारे आदिवासी उपयोजनेंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे वाई येथील आदिवासी शेतक-यांना बहुउपयोगी खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि ३१ मार्च रोजी करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ अशोक कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतंर्गत ९० निवडक आदिवासी शेतक-यांना बहुउपयोगी खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनच्‍या सर्वंकष विकासासाठी विद्यापीठाने सातत्‍याने शेतक-यांच्‍या संपर्कात राहुन त्‍यांच्‍या गरजेनुसार संशोधन करून कृषि विस्‍तार कार्यक्रम राबवावा. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, वाई येथील आदिवासी शेतक-यांनी कृषि विद्यापीठाच्‍या विविध उपक्रमास मोठा सकारत्‍मक प्रतिसाद दिला असुन आदिवासी उपयोजनेतंर्गत सिंचन पाणी व्‍यवस्थापन योजनेने चांगला पुढाकार घेतले आहे, याचा आदिवासी शेतक-यांना निश्चितच लाभ होईल.
    प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात हरिभाऊ दुधाळकर, मारोतराव धनवे, संभाजी खुडे, उकंडी कबले, अशोक डाखुरे, गंगाबाई मुकाडे यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बहुउपयोगी खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गजानन गडदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ किरण जाधव यांनी केले. याप्रसंगी डॉ एस बी मेहत्रे, डॉ सी बी लटपटे, डॉ किरण जाधव यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा कराड, श्री गिराम, श्री कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सह्योगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, डॉ उदय खोडके आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व वाई गांवचे आदिवासी शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते. 

Friday, March 27, 2015

कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्‍न


मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के. दत्‍तात्री, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ चारी अप्‍पाजी व मुख्‍य  विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख 
*************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय व हैद्राबाद येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या विभागीय प्रकल्‍प संचालनालय (झोन-५) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आराखडा नि‍श्चित करण्‍याकरिता विषय विशेषतज्ञांची दोन दिवशीय कार्यशाळा २५ व २६ मार्च २०१५ दरम्‍यान संपन्‍न झाली. या कार्यशाळेत एकुण ११ कृषि विज्ञान केंद्रा‍तील विषय विशेषतज्ञ सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु मा. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालनालयाचे मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. के. दत्‍तात्री, मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. चारी अप्‍पाजी व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
      कुलगुरु मा. बी. व्‍यंकटेश्‍वरलू उद्घाटणीय भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या ह्या मराठवाड्यातील कृषि क्षेत्रापुढील ज्‍वलंत प्रश्‍न असुन कृषि विज्ञान केंद्रातील विषयतज्ञांनी यासाठी कार्य करावे. कृषि विज्ञान केंद्रांनी पीकांना ठिबकव्‍दारे फर्टीगेश, सोयाबीन मधील रूंद वरंबा व सरी पध्‍दत, शेती यांत्रिकीकरण आदीं बाबींच्‍या विस्‍तारावर भर द्यावा, शेती यांत्रिकीकरणासाठी भाडेतत्‍वावर यंत्र देण्‍या-या संस्‍था उभारण्‍यासाठी शेतकरी गटांना प्रोत्‍साहीत करावे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. के. दत्‍तात्री आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्रानी केंद्रानी शेती पुरक जोडधंद्याचे आदर्श प्रारूप उभारणी करून शेतक-यांत त्‍याचा प्रसार करावा. सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिकांचा समावेश करण्‍याचा सल्‍ला मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. चारी अप्‍पाजी यांनी भाषण दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सांगितले की, सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी एकात्मिक पीक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा समावेश प्रत्‍येक प्रात्‍यक्षिकात करावा.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विस्‍तार शिक्षणाधिकारी प्रा पी एस चव्‍हाण, वसंत ढाकणे, डॉ संतोष चिक्षे, श्री अशोक पंडित आदींनी परिश्रम घेतले. सदरिल कार्यशाळेत आगामी वर्षात मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राच्‍या माध्‍यमातुन घेण्‍यात येणा-या स्‍थानिक परिस्थितीनुसार उपयुक्‍त असे विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचे शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात येणा-या आद्यरेषीय प्रात्‍यक्षिके व इतर विस्‍तार कार्यक्रमाचा कृति आराखडा निश्‍चीत करण्‍यात आला.

मार्गदर्शन करतांना डॉ चारी अप्‍पाजी
मार्गदर्शन करतांना डॉ के दत्‍तात्री
प्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

Thursday, March 26, 2015

शेतीस पशुपालनाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.......कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

वनामकृवित पशुपालक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
प्रशिक्षणार्थी सोबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे, शंकरराव पवार आदी 

राजस्‍थान व गुजरातच्‍या काही भागात जमीन अत्‍यंत हलकी व कमी पर्जन्‍यमान आहे, तेथे शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण नाही याचे कारण तेथील शेतकरी पीक लागवडीवर अवलंबुन न राहता, पशुपालनाचा व्‍यवसाय करतात. त्‍यातुलनेत मराठवाडयातील पर्यन्‍यमान अधिक असुन जमिनही अत्‍यंत सुपीक आहे, कापुस व सोयाबीन ही मुख्‍य पीक लागवड केली जाते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन पर्जन्‍यमानातील अनियमिततेमुळे या पीकांचे नुकसान मोठया प्रमाणावर होत आहे, यासाठी शेतीस पशुपालनाची जोड देणे अत्‍यंत आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचलनालय व कृषि महाविद्यालयाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत दि. २६ ते ३० मार्च २०१५ या कालावधीत ‘आधुनिक पशुपालन व दुग्‍धव्‍यवसाय प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन  सदरील प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले व सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, जिल्‍हा उद्योग केंद्राचे प्रकल्‍प अधिकारी श्री शंकरराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, संशोधनात असे आढळुन आले आहे की हवामान बदलाचा परिणाम दुग्‍ध उत्‍पादनावरही होत असुन देशी पशुच्‍या जाती ह्या तापमान वाढीस प्रतिकारक्षम आहेत. स्‍थानिक गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्‍यक असुन शेतक-यांनी शासनाच्‍या गोकुळ योजनेचा लाभ घ्‍यावा. कमी पाण्‍यावर येणारी चारापीकांच्‍या वाणाचे उत्‍पादन शेतक-यांनी घ्‍यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
मराठवाडयातील शेतक-यांनी पशुपालनाबाबत शास्‍त्रीय ज्ञान घेऊन व्‍यवसाय करावा, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले. मराडवाडयातील टंचाईसदृश्‍य परिस्थितीत शेतक-यांना धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेती पुरक व्‍यवसायाचे महत्‍व लक्षात घेता, विद्यापीठाच्‍या नाविन्‍यपुर्ण उमेद उपक्रमाच्‍या संकल्‍पनेतुन या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले यांनी सांगितले. विदेशात दुग्‍ध व्‍यवसाय व्‍यवस्‍थापनात मोठी प्रगती केली असुन त्‍याचाही अभ्‍यास मराठवाड्यातील शेतक-यांनी करावा, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांनी केले. या प्रसंगी लातुर येथील प्रगतशील देवणी गोपालक बच्‍चेसाहेब देशमुख व हिंगोली येथील प्रगतशील पशुपालक रामेश्‍वर मांडगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनंतराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ शंकर नरवाडे यांनी केले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा. दत्‍ता बैनवाड, प्रभाकर भोसले, माधव मस्‍के, नामदेव डाळ, विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व विद्यार्थींनी परिश्रम घेतले.
सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात मराठवाडयातील ३० पशुपालक शेतकरी सहभागी झाले असुन प्रशिक्षणात दुधाळ जनावरांची निवड, काळजी, जाती, कृत्रिम रेतन पध्‍दती, जनावरांचा शास्‍त्रीय पध्‍दतीने गोठा, लसीकरण, जनावराचे विविध रोग व त्‍यावर उपाय, महत्‍वाची चारा पिके, दुधाचे आहारातील महत्‍व, दुधातील भेसळ ओळखणे व त्‍याचे परिणाम, स्‍वच्‍छ दुध उत्‍पादन, मुल्‍यवर्धीत दुग्‍धजन्‍य पदार्थाची निर्मिती इत्‍यादी बाबींवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व दुग्‍ध व्‍यवसाय संबंधीत उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. 


राष्‍ट्रीय स्‍तरावरील युवक महोत्‍सवात वनामकृविच्‍या संघाचे घवघवीत यश

दोन सुवर्णपदकासह पाच पारितोषिकाचे मानकरी

कर्नाल (हरियाणा) येथे संपन्‍न झालेल्‍या पंधरावी अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक महोत्‍सव स्‍पर्धातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या यशस्‍वी संघासोबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ उद्य खोडके, प्रा पी एन सत्‍वधर, क्रीडाधिकारी डॉ आशा देशमुख, प्रा जी ए गुळभिळे, प्रा एस यु चव्‍हाण, प्रा डि एफ राठोड आदी.

************** 
कर्नाल (हरियाणा) येथील नॅशनल डेअरी रिसर्च इंन्स्टिट्यूट येथे दि १८ ते २१ मार्च दरम्‍यान पंधरावी अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक महोत्‍सव स्‍पर्धा संपन्‍न झाली, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या संघाने घवघवीत यश संपादन केले. स्‍पर्धेत देशातील एकुण ४८ कृषी विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संघाने लोकनृत्‍यात सुवर्णपदक, भारतीय समुहगीत स्‍पर्धेत सुवर्णपदक तर देशभक्‍तीपर गीतात रजत पदक, कोलाज या प्रकारात रजत पदक व ऑन द स्‍पॉट पेंटींग मध्‍ये उत्‍तेजनार्थ असे एकुण पाच पारितोषिके पटकावुन विद्यापीठाच्‍या कला क्षेत्रात मानाचा तुरा रोवला. विद्यापीठाच्‍या संघात विविध महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता. लोकनृत्‍या संघात केतकी केळकर, अंजली वाघमारे, अधिरा रविंद्रन, प्रतिक्षा सावळे, मृणाली बिंद, पुनम क्षीरसागर, प्रीती कुरवारे, प्रतिभा शिरसे, प्रणाली सरदार, सम्‍यका अंबोरे यांचा तर समुह गीतात स्‍वाती संत, श्‍वेता कसबे, सम्‍यका अंबोरे व स्‍पनिल पुंगळे यांचा समावेश होता तसेच ललित कलात कोलाज मध्‍ये शिवशक्‍ती गोडसेलवार व ऑन द स्‍पॉट पेंटींग मध्‍ये ज्‍योती गरड हीचा समावेश होता. 
    या विजयी संघाचा कौतुक सोहळा दि २४ मार्च रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला, यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, नियंत्रक श्री आप्‍पासाहेब चाटे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिळे, प्रा एस यु चव्‍हाण, प्रा डि एफ राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यशस्‍वी संघातील विद्यार्थ्‍यांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देऊन अभिनंदन करण्‍यात आले. पुरस्‍कार प्राप्‍त विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांची दृढ इच्‍छाशक्‍ती व परिश्रमात सातत्‍य यामुळेच हे यश प्राप्‍त झाले असुन विद्यापीठाच्‍या अधिकारी व कर्मचारी वृंदाचे मार्गदर्शन ही यास मोलाचे ठरले आहे.  यशस्‍वी संघाची व्‍यवस्‍थापकीय जबाबदारी प्रभारी अधिकारी डॉ आशा देशमुख यांनी पाहिली तर के जी सुर्यवंशी, अनवर मिया लाला मिया यांनी संघास मदत केली. संघाच्‍या यशस्‍वतीतेसाठी प्रा जी डी गडदे, डॉ एम एस देशमुख, डॉ आशा देशमुख यांनी परिश्रम घेतले. या कौतुक सोहळयास सह्योगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा पी एन सत्‍वधर आदींसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मराठवाडयातील शेतीला स्‍थैर्य देण्‍यासाठी जलसंधारण ही काळाची गरज

मौजे चिकलठाणा (बु.) (ता.सेलु जि.परभणी) येथे आयोजीत शेतकरी मेळाव्‍यात कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांचे प्रतिपादन
चिकलठाणा (बु) येथील शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर आमदार मा श्री विजयरावजी भांबळे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदी. 

हवामान बदलामुळे निर्माण झालेले कोरडवाहू शेतीचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी एकञ येऊन प्रत्‍येक गावात सामुहिक तत्‍वावर मृद व जलसंधारणाचे उपाय केल्‍यास शेतीला निश्चितपणे स्‍थैर्य प्राप्‍त करुन देता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांनी केले. जलसंधारण दिनाचे औचित्‍य साधुन राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंञज्ञान माहिती केंद्र, राष्‍ट्रीय केमीकल्‍स अॅन्‍ड फर्टिलायझर्स लिमीटेड व चिकलठाणा येथील जय किसान सेवा शेतकरी मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २२ मार्च रोजी मौजे चिकलठाणा (बु.) (ता.सेलु जि.परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणून आमदार मा. श्री. विजयराव भांबळे हे उपस्थित होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले, प्राचार्य डॉ. उदय खोडके, जि.प. सदस्‍य डॉ. जगन्‍नाथ जाधव, पं.स. सदस्‍य श्री. संपत राठोड, सरपंच श्री. आसीम खॅा पठाण, श्री. बप्‍पासाहेब खरात, श्री. किशोर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, भूजलाचा उपसा मोठया प्रमाणात वाढत असुन मराठवाडा विभागात सर्वच जिल्‍हयात भुजलपातळी खोलवली आहे. भूजलपातळीचा अंदाज घेउनच भूजलाचा उपसा करावा. कुपनलीकांची खोली वाढवुन पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार नाही. जलसंधारणाच्‍या विविध माध्‍यमातून पावसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षम व योग्‍य वापर करणे आवश्‍यक आहे. उपलब्‍ध पाणी व सिंचन यांचा विचार करून एकूणच पिक पध्‍दतीत बदल करण्‍याची गरज आहे. शेतक-यांनी ठिबक सिंचनाशिवाय ऊस घेऊ नये, मराठवाडयातील शेतक-यांनी ऊस पिकाच्‍या मागे न लागता, उपलब्‍ध सिंचनावर सोयाबीन व तुर या आंतरपीकाची लागवड करावी किंवा खरीपमध्‍ये सोयाबीन व रब्‍बीमध्‍ये ज्‍वारी पीक घेतल्‍यास प्रति हेक्‍टरी ऊसापेक्षा जास्‍त आर्थिक नफा मिळवता येऊ शकतो. शेतक-यांची गरज लक्षात घेऊन कृषि विद्यापीठ काम करत असून या आपत्‍कालीन परिस्थितीत शेतक-यांच्‍या पाठीशी आहे, असे त्‍यांनी सांगितले.
मेळाव्‍यात आमदार मा. विजयराव भांबळे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतकरी बांधवांनी निराश न होता आधुनिक तंञज्ञानाचा वापर करुन आणि राज्‍यातील यशस्‍वी शेतक-यांपासुन प्रेरणा घेऊन जिद्दीने व चिकाटीने काम केल्‍यास परिस्थितीवर मात करता येईल. शेतकरी बांधवांनी परिसरातील नाल्‍यांचे खोलीकरण, रुंदीकरण, शेततळयातील गाळ काढणे तसेच ग्रामबिजोत्‍पादन कार्यक्रमातुन गावाचा विकास साधावा, असे आवाहनही त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले यांनी शेतकरी बांधवांनी सद्य परिस्थितीत खचून न जाता विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंञज्ञान वापराण्‍याचे आवाहन केले. यावेळी जलसंधारणावर प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कृषि तंञज्ञान केंद्राचे डॉ. आनंद गोरे यांनी कृषि विद्यापीठाचे विस्‍तार उपक्रमाबाबत माहिती दिली तर तालुका कृषि अधिकारी श्री. राम रोडगे यांनी जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती दिली.
मेळाव्‍यात प्रगतशील शेतकरी श्री. ओमप्रकाश चव्‍हाळ यांचा आमदार मा. श्री. विजयराव भांबळे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला तसेच कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते जलयुक्‍त शिवार अभियानांर्तगत बंधा-यातील गाळ काढण्‍याच्‍या कामाचे उद्घाटन करण्‍यात आले. शेतक-यांत उमेद निर्मीतीसाठी गावात शालेय विद्यार्थ्‍याची प्रभातफेरी काढुन जागर करण्‍यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा परिषद सदस्‍य डॉ. जगन्‍नाथ जाधव यांनी केले तर सुञसंचालन श्री. अशोक जाधव यांनी केले. तांञिक चर्चात शेतक-यांना कोरडवाहू फळपिक व्‍यवस्‍थापनावर प्रा बी. एस. कलालबंडी, विहीर पुनर्भरणावर प्रा. एम. एस. पेंडके, कोरडवाहू शेतीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. आनंद गोरे, माती परिक्षणावर डॉ. पपीता गौरखेडे, शेततळयाची देखभाल व निगा यावर प्रा. मधुकर मोरे तर रासायनिक खतांचा संतुलीत वापर यावर श्री. पानझाडे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना व शंकांवर शास्‍ञज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गावातील शेतकरी गटाचे श्री. कुडंलिक टाकसाळ, श्री. किशोर नाईक, श्री. संतोष घोळवे, श्री. गजानन जाधव, श्री राजाभाऊ कारंडे, श्री. गोरख बुधवंत यांनी तर कृषि विद्यापीठाचे श्री. सुधीर जाधव, श्री. राहुल मांडवगडे, श्री. श्रीकांत ईक्‍कर यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्‍यास सेलू तालुक्‍यातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते. 

Wednesday, March 25, 2015

वनामकृवित पशुपालक शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचलनालय व कृषि महाविद्यालयाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत दि. २६ ते ३० मार्च २०१५ या कालावधीत आधुनिक पशुपालन व दुग्‍धव्‍यवसाय प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते दि. २६ मार्च रोजी ठिक सकाळी ११.३० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सुवर्ण जंयती सभागृहात होणार आहे. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले व सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराडवाडयातील टंचाईसदृश्‍य परिस्थितीत शेतक-यांना धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेती पुरक व्‍यवसायाचे महत्‍व लक्षात घेता, विद्यापीठाच्‍या नाविन्‍यपुर्ण उमेद उपक्रमाच्‍या संकल्‍पनेतुन या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     सदरिल प्रशिक्षणात मराठवाडयातील ३० पशुपालक शेतकरी सहभागी होणार असुन प्रशिक्षणात दुधाळ जनावरांची निवड, काळजी, जाती, कृत्रिम रेतन पध्‍दती, जनावरांचा शास्‍त्रीय पध्‍दतीने गोठा, लसीकरण, जनावराचे विविध रोग व त्‍यावर उपाय, महत्‍वाची चारा पिके, मुरघास तयार करणे, निकृ‍ष्‍ठ चा-यापासुन वेगवेगळया प्रक्रिया करून गुणवत्‍ता वाढविणे, दुध व दुधाचे आहारातील महत्‍व, दुधातील भेसळ ओळखणे व त्‍याचे परिणाम, स्‍वच्‍छ दुध उत्‍पादन, मुल्‍यवर्धीत दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थाची निर्मिती इत्‍यादी बाबींवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व दुग्‍ध व्‍यवसाय संबंधीत उद्योजक यात श्री. एकनाथराव साळवे, प्रा. किरण सोनटक्‍के, डॉ. नितीन मार्कडेय, डॉ. एम. एफ. सिध्‍दीकी, श्री. शंकर पवार, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. अनंतराव शिंदे, प्रा. काकासाहेब चव्‍हाण, डॉ. प्रभाकर पडघन, प्रा. प्रल्‍हाद जायभाये, डॉ. शंकर नरवाडे, प्रा. दत्‍ता बैनवाड, डॉ. रमेश पाटील, प्रा. नरेंद्र कांबळे, प्रा. दिगंबर मोरे, प्रा. विजय जाधव, डॉ. अनिता जिंतुरकर, प्रा. के. एल. जगताप व डॉ. सतिश खिल्‍लारे आदी मार्गदर्शन करणार आहेत, असे कार्यक्रमाचे आयोजक पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी कळविले आहे. 

Monday, March 23, 2015

कृषि पदवीधरांनी उद्योज‍क होऊन शेतक-यांसाठी कार्य करावे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

अनुभवातुन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी व विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात संपन्‍न

कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना
मेळाव्यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्वरलु, व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवन, श्री सुर्यकांतराव देशमुख, श्रीमती मंगलाताई जाधव, प्राचार्य डॉ डी एन गोखले, प्रा किरण सोनटक्के, श्री एकनाथराव साळवे, श्री साहेबराव दिवेकर आदी

************************
शेतमाल प्रक्रिया उद्योगात मोठया संधी असुन कृषि पदवीधरांनी नौकरीच्‍या मागे न लागता उद्योग क्षेत्रात उतरावे व शेतक-यांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि म‍हाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजना व अनुभवातुन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी व विद्यार्थी-पालक मेळाव्‍याचे आयोजन दि २३ मार्च रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणजिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, प्रगतशील शेतकरी श्री सुर्यकांतराव झरीकर, महिला उद्योजीका श्रीमती मंगलाताई जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखलेसहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षणडॉ डि बी देवसरकरसह्योगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा पी एन सत्‍वधर यांची प्रमुख उपस्थिती होती.कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांत उद्योजकता विकासासाठी कृषि उद्योजक व कृषी पदवीधर यांच्‍यात याप्रकारे संवाद होणे गरजेचे आहे. विद्यापीठ मुख्‍यत: सर्वसाधारण शेतक-यांना डोळयासमोर ठेऊन कार्य करते, विद्यापीठाकडुन शेतक-यांच्‍या त्‍याच्‍या परिस्थितीनुसार विविध प्रकारच्‍या मोठया अपेक्षा आहेत. जगात अनेक प्रकारचे आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्‍ध असुन विद्यपीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास करून त्‍याबाबत मार्गदर्शन करावे.कृषि विद्यापीठ हे अधिकारी निर्मितीपुरते मर्यादित न रहाता, कृषि उद्योजक निर्मितीचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केली तर शेतक-यांनी शेतीला उद्योग समजुन व्‍यवसाय करावा असे मत प्रगतशील शेतकरी श्री सुर्यकांतराव देशमुख यांनी आपल्‍या मार्गदर्शनात व्‍यक्‍त केले. विद्यार्थ्‍यां ध्‍येय निश्चित करून इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर कोणत्‍याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात असे प्रतिपादन श्री साहेबराव दिवेकर यांनी केले तर विद्यापीठातील पशुधनांचा गुणात्‍मक दर्जां वाढत असुन मराठवाडयातील पशुपालकांना याचा लाभ होत असल्‍याचे मत प्रगतशील शेतकरी एकनाथराव साळवे यांनी व्‍यक्‍त केले.
याप्रसंगी महिला उद्योजीका श्रीमती मंगलाताई जाधव, दुग्‍ध व्‍यवसाय उद्योजक प्रा किरण सोनटक्‍के, फळप्रक्रिया उद्योजक महम्‍मद गौस, प्रतापराव लाड, सुरेद्र रोडगे, गोपालराव मुदंडा, माणिकराव दहे, रमेश रणदिवे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांनी कृषि महाविद्यालयात राबविण्‍यात येत आलेल्‍या विविध विभागातील अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाची माहिती देतांना सांगितले की, या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांत कृषी उद्योगकता गुणाचा विकास होण्‍यास मदत होत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा एस एल बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्‍यी प्रविंद्रकुमार, दिगांबर हरकळ, शारदा घोलप, प्रविण तिडके, कुमारी सोनी, चैताली चव्‍हाण, प्रियांका आठवले यांनी अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमात अवगत केलेल्‍या कौशल्‍याबाबत मनोगतात माहिती दिली. मेळाव्‍याप्रसंगी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यात कृषि महाविद्यालयातील आठव्‍या सत्रातील अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध वस्‍तुंचे प्रदर्शन मांडण्‍यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाचे प्रभारी डॉ के टी आपेट, डॉ पी बी लटपटे, डॉ ए टी शिंदे, डॉ शिवाजी शिंदे, डॉ पी के वाघमारे, डॉ अनिल धमक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास शेतकरीविद्यार्थी-पालक विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


कृषी प्रदर्शनीची पाहणी करतांना 
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवन
मार्गदर्शन करतांना श्री सुर्यकांतराव देशमुख 
प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ डी एन गोखले 

Friday, March 20, 2015

अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि महाविद्यालयाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि म‍हाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजना व अनुभवातुन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी व विद्यार्थी पालक मेळाव्‍याचे आयोजन दि २३ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन जिल्‍हा परिषदचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री सुभाष डुंबरे यांच्‍या हस्‍ते असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, महिला उद्योजीका श्रीमती मंगलाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी, विद्यार्थी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले आहे. कार्यक्रमात कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन कृषि महाविद्यालयातील आठव्‍या सत्रातील अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केले विविध वस्‍तुंचे व कामाचे सादरीकरण करण्‍यात येणार आहे. 

चिमुकल्यांचाही दिक्षांत समारंभ

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या एलपीपी स्‍कुलचा सहावा दिक्षांत समारंभ संपन्‍न 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या एलपीपी स्‍कुलचा सहावा दिक्षांत समारंभ दि १८ रोजी संपन्‍न झाला. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्या प्रा विशाला पटनम यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते एलपीपी स्‍कुल मधून पुर्व प्राथमिक शिक्षण यशस्‍वतीरित्‍या पूर्ण केलेल्‍या एकुण ४५ विद्यार्थ्‍यांना प्रशस्‍तीपत्रे प्रदान करण्‍यात आली. शाळेतील शिक्षण अतिशय दर्जेदार असुन विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी शाळेतर्फे होत असलेल्‍या प्रयत्‍नाची प्रशंसा कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केली. शाळेत विद्यार्थ्‍यां शैक्षणिक पाया मजबुत केला जात असल्‍याने निश्चितच त्‍याचा लाभ त्‍यांना भावी जीवनात होणार असल्‍याचे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले. प्राचार्या विशाला पटनम यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या पुढिल शिक्षणाबाबत पालकांनी कोणती काळजी घ्‍यावी याविषयी मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमात ब्रिज सेक्‍शनचे विद्यार्थी अर्जित, वेदिका, कार्तिक, इश्‍वरी, गोंविद, ऋन्‍वी व सम्‍यक तसेच विद्यार्थ्‍यांचे पालक प्रतिनिधी महेश पामे, प्राजक्‍ता कुलकर्णी, लक्ष्‍मीकांत गरूड व कविता मुंढे यांनी आपले अनुभव कथन करून शाळेविषयी गौरोवोद्गार काढले. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी विभागातील प्राध्‍यापक, कर्मचारी व पदवीपुर्व विद्यार्थ्‍यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

Thursday, March 19, 2015

नवागड येथे अन्नतंत्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

रासेयो अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन
रासेयोच्‍या शिबीराच्‍या समारोपात मार्गदर्शन करतांना प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्रा दिलीप मोर, प्रा एच एम सय्यद, कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण घाटगे  आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत नवागड (उखळद) येथे शिबीराचे दिनांक १३ ते १९ मार्च दरम्‍यान आयोजीत करण्‍यात आले होते. शिबीराचा समारोपीय कार्यक्रम दि १९ मार्च रोजी झाला संपन्‍न झाला. या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. एन. सत्‍वधर हे होते तर डॉ दिपक महेंद्रकर, डॉ कनकदंडे, प्रा. एच. एम. सय्यद, प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सात दिवशीय शिबीरांतर्गत कृषि व अन्‍न प्रकिया उद्योगासंबंधी ग्रामीण महिला व युवकांना मार्गदर्शन करण्‍यात आले. आरोग्‍यासाठी पोषकअन्‍नाचे महत्‍व, स्‍त्री शिक्षण, स्‍त्री-भ्रुणहत्‍या प्रतिबंध याविषयावर मार्गदर्शन करण्‍यात आले. शिबीरात ३२ स्‍वयंसेवकांनी रक्‍तदान केले तसेच गांवात स्‍वच्‍छता मोहिमे राबविण्‍यात येऊन योगा व प्राणयाम याचे प्रात्‍यक्षिके डॉ दिपक महेंद्रकर यांनी दाखवुन महत्‍व सांगितले. व्‍यसनमुक्‍तीवर डॉ शिवाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

या शिबीराच्‍या यशस्‍वतेसाठी रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रविण घाटगे, प्रा व्‍ही एस पवार, प्रा आर बी क्षीरसागर, प्रा के एस गाडे, प्रा. जी एम माचेवाड, प्रा. भानुदास पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, नवागड संस्‍थेचे महामंत्री माणिकराव तर्टे, योग शिक्षक श्री जिंतुरकर, सुदर्शन मोरे, महेंद्र संघई, बाळ जाधव, लखनजी आदींचे सहकार्य लाभले. 
स्‍वच्‍छता मोहिम
रक्‍तदान शिबीर 

Wednesday, March 18, 2015

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्यांची पाणलोटक्षेत्रास भेट


कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीपुर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीचे दिनांक १२ मार्च रोजी जिंतूर तालुक्यातील रायखेडा व जालना जिल्ह्यातील कडवंची पाणलोट क्षेत्र येथे आयोजीत करण्‍यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्‍यांनी पाणलोटाची पाहणी करून तेथील मृद व जलसंधारण कामांची माहिती कृषी अभियंता पंडित वासरे व पाणलोट विकास समितीचे सचिव चंद्रकांत क्षीरसागर यांनी दिली. जालना कृषी विज्ञान केंद्राने माननीय विजयआण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्डो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १९९४ मध्ये कडवंची गावात काम सुरू केले. मृदसंधारण व पाण्याचे योग्य नियोजनामुळे यावर्षी सरासरीच्या कमी पाऊस होऊनही कडवंची गावचा शिवार मार्चमध्येही हिरवागार असुन असून द्राक्ष, डाळिंब ही बागायती पिके येथील शेतकरी घेत आहेत. शैक्षणिक सहलीचे आयोजन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले होते. सहल यशस्वीतेसाठी प्रा भास्करराव भुईभार, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संदीप पायाळ, प्रा दयानंद टेकाळे, नागनाथ गोरे आणि मारोतराव कटारे यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, March 17, 2015

दैठणा येथे गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे महिला आर्थिक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा) परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि १० ते १३ मार्च दरम्‍यान दैठणा येथे शेतकरी महिलांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी आर्थिक सक्षमीकरणयावर चार दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाले. महिलांनी स्‍वत: अर्थाजन करून पैशांची बचत करणे व कुटुंबाचे जीवनमान उंचावणे हा या प्रशिक्षणाचा मुख्‍य उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. या प्रशिक्षणात मातांनी बालकांची काळजी घेणे, बांधणी तंत्राने कपडा रंगविण्‍याची कला, शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, पुष्‍पगुच्‍छ, पुष्‍पगाली व रिबन बॅजेस तयार करण्‍याचे प्रात्‍यक्षिकासहित मार्गदर्शन केले. यात ५० शेतकरी महिलांनी अधिकृतरित्‍या नोंदणी करूनही त्‍यापेक्षा अधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षणात प्रात्‍यक्षिकेव्‍दारे मार्गदर्शन केल्‍यामुळे ज्ञान व कौशल्‍य वृध्दिंगत झाल्‍याचे मनोगत सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमात कुलसचिव डॉ दिनकर जाधव व प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींना प्रशस्‍तीपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी आयोजक प्राचार्य प्रा विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनात प्रा निता गायकवाड, डॉ जयश्री झेंड, संगीता नाईक, रेशमा शेख व मंजुषा रेवणवार आदींनी परिश्रम घेतले. 
 

Friday, March 13, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने विविध गावात ग्रामीण महिलामध्‍येही उमेद जागृती


मराठवाडयातील शेतक-यांना सद्य दुष्‍काळस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी व शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध गावात उमेद कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य प्रा विशाला पटणम यांच्‍या मार्गदर्शनात सोनपेठ तालुक्‍यातील मौजे नरवाडी, अव्‍वलगाव, धार डिघोळ तसेच परळी तालुक्‍यातील मौजे कौठळी येथे या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात संबंधित गावात शालेय विद्यार्थ्‍यांनी प्रभारफेरी काढुन जागर करण्‍यात आला. रासेयोच्‍या कार्यक्रम अधिकारी डॉ वीणा भालेराव यांनी बचतगटाच्‍या माध्‍यमातुन आर्थिक स्‍वावलंबन, विविध गृहउद्योग, कौटुंबिक स्‍तरावर पाण्‍याची बचत, खर्चातील काटकसर, उज्‍वल जीवनासाठी शिक्षण आदी विषयावर मार्गदर्शन केले. या गावात घरोघर फिरून रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी स्‍वाईन फ्लु व इतर संसर्गजन्‍य आजारांत कौटुंबिक पातळीवरील उपाययोजना याबाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वतेसाठी स्‍वयंसेविका मनिषा गोरे, पारूली कच्‍छवे, शुभांगी काटे, मुक्‍ता तिडके आदींने परिश्रम घेतले. यासाठी नरवाडी येथील लांजेश्‍वर बचत गट अध्‍यक्षा लक्ष्‍मीबार्इ जोगदंड, अव्‍वलगाव ये‍थील मुख्‍याध्‍यापक श्री कासंडे सर, पोलिस पाटील श्री तावडे, शिक्षक श्री शिंदे तसेच धार डिघोळ येथील अंगणवाडीताई मनकर्णा काटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला व किशोरवयीन मुली मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Wednesday, March 11, 2015

शास्‍त्रज्ञांचे संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे......... मृदाशास्‍त्रज्ञ मा. डॉ. पी. के. छोंकर

वनामकृवित कृषि व मृदा संशोधनातील नाविण्‍यपुर्ण क्षेत्र’’ विषयावरील व्‍याख्‍यानमालाचे उद्घाटन

वैज्ञानिक संशोधनात अतिउच्‍च ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी स्‍वप्रेरणा व कामाप्रती आवड पाहिजे, शास्‍त्रज्ञांचे संशोधन कार्यच छंद झाला पाहिजे, त्‍यातुन आनंद प्राप्‍त करता आला पाहिजे. कुटुंब, समाज, काम व छंद यात संतुलन साधता आले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेचे मृदाशास्‍त्रज्ञ मा डॉ. पी. के. छोंकर यांनी केले.
       वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि व मृदा संशोधनातील नाविण्‍यपुर्ण क्षेत्र’’ या विषयावर दि. १० ते १२ मार्च दरम्‍यान देशातील प्रमुख मृदाशास्‍त्राज्ञांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असुन व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डी. एन. गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
       मा डॉ. पी. के. छोंकर पुढे म्‍हणाले की, आजच्‍या युवकांना भारतीय पोलीस सेवा व भारतीय प्रशासकीय सेवेचे आकर्षण आहे, कारण तेथे प्रतिष्‍ठा व पैसा आहे. पंरतु कोणत्‍याही क्षेत्रात ध्‍येय निश्चिती व इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर आपण प्रतिष्‍ठा व पैसा प्राप्‍त करू शकतो. संशोधनात यशस्‍वी होण्‍यासाठी आपले शारीरिक आरोग्‍य सुदृध व तणावरहित असणे, निरीक्षण व चिकित्‍सक बुध्‍दी तल्‍लख असणे आवश्‍यक आहे. चिकित्‍सक बुध्‍दीच्‍या जोरावर जगात अनेक शोध लागले आहेत. संशोधकास आपले विचार व भावना स्‍पष्‍टपणे मांडता आल्‍या पाहिजे. अलौकिक कल्‍पना ही वैयक्‍तीक बुध्‍दीचे उत्‍पादन असु शकते परंतु ती कल्‍पना प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी सामुदायीकरित्‍या प्रयत्‍न करावे लागतात. सामुदायीकरित्‍या काम करण्‍याची मानसिकता संशोधकांनी विकसीत केली पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
       कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी हवामान बदल व त्‍याचा शेतीवरील परिणाम यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, भारत हा क्षेत्रफळाने मोठा देश असुन हवामानात विविधता आहे. देशातील ६० टक्‍के शेती ही पर्जन्‍यमानावर अवलंबुन असुन शेती पध्दतीत विविधता आहे. हवामान बदलास नैसर्गिक व मनुष्‍य निर्मित दोन्‍ही बाबीं कारणेभुत असुन कार्बन डॉय ऑक्‍साईड, मिथेन, नॉट्रोजन ऑक्‍साईड इत्‍यादी हरितगृह वायुचा हवामानावर मोठा परिणाम होत आहे. हवामानात अचानक होणा-या बदलास तोंड देण्‍यासाठी मानवास कृती करण्‍यास अत्‍यंत कमी वेळ मिळतो, हीच मोठी अडचण शेतीमध्‍ये आहे.
       जागतिक तापमानात वाढ होत असुन गेल्‍या शंभर वर्षात ०.७४ डिग्रीसेंटीग्रेड सरासरी तापमान वाढ झाली आहे. गेल्‍या काही वर्षात तापमान वाढीचा दर वाढला आहे, याचे मुख्‍य कारण वातावरणातील प्रदुषण आहे. तापमान वाढीचा नकारत्‍मक परिणाम उष्‍ण कटिबंधातील शेतीवर जास्‍त होत आहे. भारतात हवामान बदलावर दृष्‍टीक्षेप टाकला तर हे लक्षात येते की, पावसाचे दिवस कमी झाले आहेत, गेल्‍या शंभर वर्षात उन्‍हाळयातील सरासरी तापमानात ०.६ डिग्री सेंटीग्रेडने वाढ झाली असुन सन २१०० पर्यंत हे तापमान ३.५ ते ५ डिग्री सेंटीग्रेडने वाढ होऊ शकते. तापमान वाढीमुळे भारतात पर्जन्‍यात तफावत येत असुन त्‍याचा परिणाम खरिप पीकावर होत असुन रब्‍बी हंगामात तापमानात वाढ होत आहे. एक डिग्रीसेंटीग्रेडने सरासरी तापमान वाढले तर देशातील गहु उत्‍पादनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच सोयाबीन मध्‍ये तापमान वाढीमुळे शेंगा भरण्‍यावर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे फलोत्‍पादनात किड व रोगाचा प्रार्दुभाव वाढला असुन किड व रोगाचा पुर्वानुमान शेतक-यांना देणे आवश्‍यक आहे. तापमान वाढीचा परिणाम दुग्‍ध उत्‍पादनावर ही होत असुन तापमान वाढीस प्रतिकारक जातीची निर्मितीवर भर दयावा लागेल.
       तापमान वाढीचा परिणाम देशाच्‍या अन्‍नसुरक्षततेवर ही होणार असुन ही बाब तात्‍काळ गांभीर्याने घेण्‍यासारखी आहे. अन्‍नसुरक्षतेसाठी मानवास हवामान बदलावर दोन बाजुने लढावे लागेल, एकतर हवामान बदलाला कारणेभुत असणा-या बाबी कमी कराव्‍या लागतील, यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्‍न होणे गरजेचे आहे तर बदलत असलेल्‍या हवामानास अनुकुल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. धोरणात्‍मक निर्णयात हवामानावर आधारित पीक विमा योजना राबवाव्‍या लागतील, राज्‍यस्‍तरीय हवामान बदल संशोधन केंद्र सुरू करावे लागेल, मातीतील कार्बनचे प्रमाण वाढीवर भर दयावा लागेल, नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व हवामान बदल याचा अभ्‍यासक्रमात समावेश करावा लागेल. शेतक-यांची खरी समस्‍या ओळखण्‍यासाठी शेतक-यांशी शास्‍त्रज्ञांना अधिकाधिक संवाद साधवा लागेल, तरच संशोधकाची बुध्‍दी अधिक प्रगल्‍भ होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
       कार्यक्रमात मान्‍यवर वक्‍त्‍यांचा परिचय संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी करून दिला तर प्रास्‍ताविक संयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हरिहर कौसडीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ महेश देशमुख, डॉ. अनिल धमक, डॉ गौतम हानवते, डॉ सुरेश वाईकर, डॉ सुदाम शिराळे, त्रिवेणी सांगळे, श्री अडकिणे व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.