Thursday, March 26, 2015

शेतीस पशुपालनाची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.......कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

वनामकृवित पशुपालक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
प्रशिक्षणार्थी सोबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे, शंकरराव पवार आदी 

राजस्‍थान व गुजरातच्‍या काही भागात जमीन अत्‍यंत हलकी व कमी पर्जन्‍यमान आहे, तेथे शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण नाही याचे कारण तेथील शेतकरी पीक लागवडीवर अवलंबुन न राहता, पशुपालनाचा व्‍यवसाय करतात. त्‍यातुलनेत मराठवाडयातील पर्यन्‍यमान अधिक असुन जमिनही अत्‍यंत सुपीक आहे, कापुस व सोयाबीन ही मुख्‍य पीक लागवड केली जाते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन पर्जन्‍यमानातील अनियमिततेमुळे या पीकांचे नुकसान मोठया प्रमाणावर होत आहे, यासाठी शेतीस पशुपालनाची जोड देणे अत्‍यंत आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचलनालय व कृषि महाविद्यालयाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत दि. २६ ते ३० मार्च २०१५ या कालावधीत ‘आधुनिक पशुपालन व दुग्‍धव्‍यवसाय प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन  सदरील प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब भोसले व सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले, जिल्‍हा उद्योग केंद्राचे प्रकल्‍प अधिकारी श्री शंकरराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, संशोधनात असे आढळुन आले आहे की हवामान बदलाचा परिणाम दुग्‍ध उत्‍पादनावरही होत असुन देशी पशुच्‍या जाती ह्या तापमान वाढीस प्रतिकारक्षम आहेत. स्‍थानिक गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्‍यक असुन शेतक-यांनी शासनाच्‍या गोकुळ योजनेचा लाभ घ्‍यावा. कमी पाण्‍यावर येणारी चारापीकांच्‍या वाणाचे उत्‍पादन शेतक-यांनी घ्‍यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
मराठवाडयातील शेतक-यांनी पशुपालनाबाबत शास्‍त्रीय ज्ञान घेऊन व्‍यवसाय करावा, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले. मराडवाडयातील टंचाईसदृश्‍य परिस्थितीत शेतक-यांना धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेती पुरक व्‍यवसायाचे महत्‍व लक्षात घेता, विद्यापीठाच्‍या नाविन्‍यपुर्ण उमेद उपक्रमाच्‍या संकल्‍पनेतुन या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले यांनी सांगितले. विदेशात दुग्‍ध व्‍यवसाय व्‍यवस्‍थापनात मोठी प्रगती केली असुन त्‍याचाही अभ्‍यास मराठवाड्यातील शेतक-यांनी करावा, असे प्रतिपादन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांनी केले. या प्रसंगी लातुर येथील प्रगतशील देवणी गोपालक बच्‍चेसाहेब देशमुख व हिंगोली येथील प्रगतशील पशुपालक रामेश्‍वर मांडगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनंतराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ शंकर नरवाडे यांनी केले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा. दत्‍ता बैनवाड, प्रभाकर भोसले, माधव मस्‍के, नामदेव डाळ, विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व विद्यार्थींनी परिश्रम घेतले.
सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात मराठवाडयातील ३० पशुपालक शेतकरी सहभागी झाले असुन प्रशिक्षणात दुधाळ जनावरांची निवड, काळजी, जाती, कृत्रिम रेतन पध्‍दती, जनावरांचा शास्‍त्रीय पध्‍दतीने गोठा, लसीकरण, जनावराचे विविध रोग व त्‍यावर उपाय, महत्‍वाची चारा पिके, दुधाचे आहारातील महत्‍व, दुधातील भेसळ ओळखणे व त्‍याचे परिणाम, स्‍वच्‍छ दुध उत्‍पादन, मुल्‍यवर्धीत दुग्‍धजन्‍य पदार्थाची निर्मिती इत्‍यादी बाबींवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व दुग्‍ध व्‍यवसाय संबंधीत उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.