Thursday, April 23, 2015

स्वत:तील कमतरता ओळखुन त्याचा स्वीकार करा ........जिल्हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह

वनामकृवितील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंचाच्‍या वतीने स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रतिपादन


सकारात्मक दृष्टिकोन व अविरत प्रयत्‍न हेच यशाची गुरुकिल्‍ली असुन स्‍वत:च्‍या क्षमतेवर विश्‍वास ठेवा, स्‍वत:तील कमतरता ओळखुन अपयशाची जबाबदारी स्‍वीकारा, असा सल्‍ला जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंच यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. १९ एप्रिल रोजी आयोजीत स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले होते तर विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. संदीप बडगुजर, प्रा. रणजीत चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह पुढे म्‍हणाले की, ज्‍या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे त्‍याक्षेत्राचे परिपुर्ण ज्ञान संपादन करा, अपयशाचे कारण शोधा, दुस-याकडे बोट दाखवु नका. अनेक विद्यार्थी आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर उच्‍च सनदी अधिकारी झाले आहेत. समाजात बदल घडवायचा हेतु ठेऊन प्रशासनात या. हार्ड वर्क पेक्षा स्‍मार्ट वर्क करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेला सामोरे जातांना तयारी कशी असावी, या विषयावर त्‍यांनी सविस्‍तर मार्गदर्शन केले तसेच ‍विद्यार्थ्‍यांनी विचारलेल्‍या शंकांचे निरसन त्‍यांनी केले.
वेळेचे नियोजन हे स्‍पर्धा परीक्षेच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे असल्‍याचे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन श्री मांजरे तर आभार प्रदर्शन स्‍पर्धा मंचचे विद्यार्थी अध्‍यक्ष श्रीकृ‍ष्‍णा वारकड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.