Thursday, July 9, 2015

दर्जात्मक कृषि संशोधनासाठी संशोधकांनी आग्रही असावे..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

वनामकृवितील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी कुलगुरूंनी साधला थेट संवाद

संशोधकांचा संशोधनातील प्रामाणिकपणा हा महत्‍वाचा गुण असुन संशोधनाची कार्यप्रणाली भक्‍कम असली तरच संशोधनातील निष्‍कर्ष योग्‍य येतील. शेतक-यांच्‍या प्रगतीसाठी दर्जात्‍मक संशोधनासाठी कृषि संशोधकानी प्रयत्‍नशील असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. दर्जात्‍मक कृषि संशोधनासाठी आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी दि ७ जुलै रोजी एका कार्यक्रमात संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शटगार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ हेमांगिनी सरंबेकर, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा ए आर सावते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाचा विषय शेतक-यांच्‍या बदलत्‍या परिस्थितीचा सखोल अभ्‍यासांती निवडावा. विदेशात आचार्य पदवी प्राप्‍त करणे अत्‍यंत अवघड असुन विकसित देशातील समाजात आचार्य पदवीधरकांचा मोठा आदर केला जातो. भारताच्‍या तुल‍नेत विदेशातील संशोधकांना संशोधन सुविधा निश्चितच अधिक आहेत. संशोधन करतांना अनेक समस्‍या आहेत, परंतु त्‍यावर मात करून शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान दिल्‍यास शेतक-यांसाठी आपण ईश्‍वरा समान व्‍हाल. अनेक वेळा संशोधक संशोधनाच्‍या आधारे शेतक-यांना शिफारशी देतो, परंतु त्‍या शिफारशी प्रत्‍यक्ष शेतात अवलंबीत असतांना अनेक अडचणी येतात, त्‍याचा विचारही संशोधकांनी करावा. आपल्‍या विचारांना चालना दया व कृषि क्षेत्राच्‍या विकासासाठी अधिकाधिक उपयुक्‍त संशोधनावर भर दया. कृषि संशोधकच कृषि विद्यापीठाची प्रतिमा बदलु शकतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि क्षेत्रातील तांत्रिक तफावतीचा अभ्‍यास करून आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाची दिशा ठरवावी. कार्यक्रमात आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या संशोधनाच्‍या विषय तसेच संशोधनात येणा-यां विविध समस्‍यावर चर्चा करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन कविता देशमुख व सुप्रिया पाचपुते हिने तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची वसंतराव नाईक कृषि पुरस्‍कारासाठी निवड झाल्‍याबाबत सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विविध शाखेचे आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.