Thursday, September 17, 2015

एकजूटिने करू दुष्‍काळाचा सामना......परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते

वनामकृवित रबी पीक शेतकरी मेळावा संपन्‍न




मराठवाडा मुक्‍ती संग्रामात शेतक-यांचे मोठे योगदान होते, मराठवाडयातील शेतकरी संघर्ष करणारा शेतकरी असुन सद्यस्थितीतील दुष्‍काळाचा सामना शेतकरी, शासन व कृषि विद्यापीठ एकत्रितरित्‍या करू, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त आयोजीत रबी पीक शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संसद सदस्‍य मा श्री संजय जाधव, परभणी विधानसभा सदस्‍य मा डॉ राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य श्री केदार सोळुंके, श्री रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते पुढे म्‍हणाले की, कोरडवाहु शेतक-यांच्‍या दृष्‍टीने योग्‍य हवामानाचा अंदाज अत्‍यंत महत्‍वाचा असुन लवकरच शासन मंडळस्‍तरावर हवामान अंदाज देणारी यंत्रणा उभारणार आहे. तसेच कृषि विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाण्‍यास शेतक-यांत मोठी मागणी असुन लवकरच शेतक-यांत प्रचलीत असलेला कपाशीचा नांदेड-४४ हा वाण बी टी स्‍वरूपात उपलब्‍ध करूण देण्‍यात येणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियांनातर्गत जास्‍तीत जास्‍त शेततळे निर्माण करण्‍याचा शासन मानस असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, मराठवाडयातील पाऊसाचे प्रमाण कमी कमी होत असुन ३० ते ४० टक्‍के उपलब्‍ध जमिनीतील ओलावा बाष्‍पीभवणाव्‍दारे उडुन जातो, जमिनीतील हा ओलावा टिकुण ठेवण्‍यासाठी विद्यापीठस्‍तरावर संशोधन हाती घेण्‍यात येणार आहे. विद्यापीठाकडे हरभरा व करडई पिकांच्‍या विद्यापीठ विकसित बियाणे मुबलक प्रमाणावर उपलब्‍ध असुन त्‍याचा वापर शेतक-यांनी करावा. विद्यापीठाने यावर्षी कपाशी लागवडीवर अप्‍स ची निर्मिती केली असुन लवकरच सोयाबीन व हळद पिकांवर अप्‍स तयार करण्‍यात येईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. मेळाव्‍यात कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार सांळुके यांनी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांनी हताश न होता परतीचा पाऊसाचा लाभ घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला तर मा श्री रविंद्र देशमुख यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठांने शेतक-यांच्‍या शेतावर विविध प्रात्‍यक्षिकांची संख्या वाढण्‍यात येण्‍याची शिफारस केली.याप्रसंगी किडकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या कापुस लागवडीवर आधारीत अप्‍सचे लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठाचे न्‍युजलेटर, शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्‍तीका आदींचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचे व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. 
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात दुष्‍काळी परिस्थितीतील चारा पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी ठोंबरे, सद्यस्थितीत खरीप व रब्‍बी पिकांवरील किंडीचे व्‍यवस्थापनावर डॉ बी बी भोसले व डॉ पी आर झंवर, कापुस व तुर, रब्‍बी पिकां‍वरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ ए पी सुर्यवंशी, रब्बी ज्‍वार लागवडीवर प्रा एस एस सोळंके, हरभरा लागवडीवर डॉ डि के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे तसेच आपत्‍कालीन परिस्थितीतील पीक नियोजनावर डॉ बी व्‍ही आसेवार व बीबीएफ यंत्राचा सुयोग्‍य वापरावर प्रा पी ए मुंढे मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी उपस्थित होते.