Wednesday, September 30, 2015

वनामकृविचा "विदयापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास पुनश्‍च: प्रारंभ होणार

मराठवाडयातील आठही जिल्‍हयात तर परभणी व हिंगोली जिल्‍हयातील साधारणत: ६० ते ७० गावांत रा‍बविण्‍यात येणार उपक्रम

सन २०१५-१६ मध्‍ये मराठवाडा विभागात झालेल्‍या कमी पावसामुळे उद्भवलेली पीक परिस्थितीत आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, सदयस्थितीत पीक संरक्षण, येणा­या रबी हंगामाचे नियोजन या करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ शेतक-­यांच्‍या शेतावर थेट भेट देऊन मार्गदर्शन करण्‍यासाठी यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास दिनांक १ ऑक्‍टोबर पासुन पुनश्‍च: प्रारंभ करण्‍यात येणार आहे. विदयापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या समन्‍वयाने तसेच मराठवाडयातील आठही जिल्‍हयात विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सर्व महाविदयालये, व संशोधन योजना यांच्‍या सहकार्याने हा विशेष विस्‍तार उपक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या अंतर्गत परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने विदयापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-­यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी परभणी व हिंगोली जिल्‍हयाकरिता तालुकास्‍तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्‍यात आला असुन सदरिल उपक्रमात कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रत्‍येक तालुक्‍यातील चार ते सहा गावाचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक दिवशी दोन ते तीन गांवाचा दौरा करण्‍याचे नियोजित आहे. या दोन जिल्‍हयासाठी शास्‍त्रज्ञांचे एकुण चार चमू करण्‍यात आले असुन यात कृषिविदया, किटकशास्त्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र, मृदाशास्‍त्र, उदयानविदया, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र व कृषि अभियांत्रिकी आदीं विषयातील सात विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे. या उपक्रमातंर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन हंगामी खरीप पीके, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्‍थानी जलसंधारण, रबी हंगामाचे नियोजन आदी विषयांवर शेतक­-यांना शास्त्रज्ञांकडुन मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात सद्यस्थितीतील आपत्‍कालीन परिस्थितीत पीक व्‍यवस्‍थापन व पीक संरक्षण यावर विशेष भर देण्‍यात येणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार‍ शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे. परभणी व हिेंगोली जिल्‍हयामध्‍ये सदरील विस्‍तार कार्यक्रम दि ३० सप्‍टेबर ते १७ ऑक्‍टोबर दरम्‍यान साधारणत: ६० ते ७० गावांत राबविण्‍यात येणार असुन एकुण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि.मी होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.