Wednesday, December 30, 2015

मौजे तुळजापूरवाडी (ता.वसमत जि.हिंगोली) येथे जय किसान–जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत गटचर्चा व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्‍न

माजी पंतप्रधान भारतरत्‍न माननीय डॉ. अटलबिहारी वाजपेयी व माननीय चौधरी चरणसिंह यांच्‍या जन्‍मदिवसाचे औचित्‍य साधुन दि. २३ ते २९ डिसेंबर दरम्‍यान जय किसान–जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापिठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व तालुका कृषि अधिकारी, वसमत यांच्‍या संयुक्‍त विदयमाने वसमत तालुक्‍यातील मौजे तुळजापूरवाडी येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी शेतकरी गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. गटचर्चेत कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी मार्गदर्शनात शेतक-यांनी गट स्‍थापन करुन शेती करावी व भविष्‍यात गटाव्‍दारे कंपनीची स्‍थापना करुन विविध प्रक्रिया उदयोग करण्‍याचा सल्‍ला दिला तर विदयापीठ विकसीत विविध वाण व तंत्रज्ञान यांचा वापर करुन शेतीचे उत्‍पादन वाढविण्‍याबाबत मार्गदर्शन केले. किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी शेतक-यांना किड व्‍यवस्‍थापनाविषयी माहिती देतांना किड व्‍यवस्‍थापनात खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असुन केवळ किटकनाशकांचा फवारणी न करता एकात्मिक पध्‍दतीचा वापर करुन किटकनाशकांवरील खर्चात बचत करावी असे सांगितले. कृषि विभागाचे श्री. के. एस. घुगे यांनी शेतक-यांना शेतकरी कंपनी स्‍थापन करण्‍याविषयीचे मागदर्शन करून तुळजापूरवाडी येथे कृषिविभागातर्फे राबविण्‍यात येणा-या जलयुक्‍त शिवार कार्यक्रमाविषयी माहिती दिली. 
यावेळी शेतक-यांनी निंबोळी अर्क तयार करणे, पाणी नियोजन आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी चर्चा केली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील ज्‍येष्‍ठ नागरिक गुलाबराव चव्‍हाण हे होते तर कृषि विभागातर्फे आर. एस. नवघरे, एन. व्हि. लोखंडे, अशोक चव्‍हाण यांनी सहभाग नोंदविला. शास्‍त्रज्ञांनी शेतकरी अर्जून चव्‍हाण यांच्‍या हळदीच्‍या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन केले.

Tuesday, December 29, 2015

जय किसान जय विज्ञान सप्ताहाची सांगता व ग्राम ज्ञानगंगा कार्यक्रमाचे आयोजन

कृषि विद्यापीठ विविध माध्‍यमाव्‍दारे कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविते आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामजंस्‍य करार केला असुन अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचत आहे, याचा लाभ जास्‍तीस जास्‍त शेतक-यांनी घ्‍यावा. विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार अधिक प्रभावी करण्‍यासाठी शेतक-यांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने माजी पंतप्रधान माननीय चौधरी चरणसिंह यांची जयंती व माननीय अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवसानिमित्‍त २३ ते २९ डिसेंबर दरम्‍यान जय किसान जय विज्ञान सप्‍ताहांतर्गत विविध गावात गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते, या सप्‍ताहाची सांगता तसेच उद्योजक स्‍व. श्री धीरूभाई अंबानी यांच्‍या जयंतीनिमित्‍त वनामकृवि व रिलांयस फाउंडेशन माहिती सेवा यांचे संयुक्‍त विद्यमाने ग्राम ज्ञानगंगा कार्यक्रमातंर्गत शेतक-यांसाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २९ डिसेंबर रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव श्री डी एस कच्छवे, रीलायंस फाउंडेशनचे विभागीय समन्‍वयक श्री दिपक केकान, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या वातावरणात शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा वापर करावा. एकाच जमिनीत एकचएक पिक न घेता पिकांची फेरपालट करण्‍याचा सल्‍ला देऊन वॉटर बजेट ची संकल्‍पना मांडली. कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालनालय व रिलायंस फाउंडेशन निर्मीत हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन या विषयावर आधारित चित्रफितीचे विमोचन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रगतशील शेतकरी श्री मदन महाराज, श्री पांडुरंग गलबे, श्री नरेश शिंदे आदींनी आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले.
तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ यु एन आळसे, प्रा डि डि पटाईत, प्रा प्रल्‍हाद जायभाये, प्रा मुंढे व  पशु वैद्यकिय अधिकारी डॉ कादरी आदींनी विविध विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री दिपक केकान यांनी केले तर सुत्रसंचालन श्री नरेश डंबाळे व आभार प्रदर्शन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास परभणी व जालना जिल्‍हातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


Monday, December 28, 2015

डॉ. राजेश कदम राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्काराने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत असलेले सहयोगी प्राध्यापक (विस्तार शिक्षण) डॉ. राजेश परभतराव कदम यांना अग्रोकेअर कृषी मंच, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान विस्तार प्रा. लि. व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि २४ डिसेंबर रोजी आयोजित कसमादे कृषी महोत्सव-२०१५ मध्ये सातवा राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्काराने सन्‍मामित करण्‍यात आले. सटाना, जि नासिक येथील कसमादे कृषी महोत्सवात एका भव्य कार्यक्रमात वनाधिपती मा. श्री. विनायकदादा पाटील यांच्‍या हस्ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आलात्याप्रसंगी आमदार मा. श्री. राहुलजी आहिरे, आदर्श गांव योजनेचे प्रणेते मा. पोपटराव पवार, विभागीय कृषी सह संचालक मा. श्री. मोते, मा. श्री भूषण निकम, मा. श्री नंदकिशोर शेवाळे, मा. श्री. डॉ. पाटील, प्राचार्य मा. डॉ. रसाळ, मा. श्री. जगताप, मा. डॉ. आहिरे आदींची प्रमुख उपस्थित होती. 
स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्कारांचे स्वरूप असुन कृषी शिक्षण, कृषि विस्तार व ग्रामीण युवकांचा विकास या क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत डॉ कदम यांना हा राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्कार देण्‍यात आला. कृषी शिक्षणात नवनवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थाच्या विकासात योगदान दिले, तसेच विविध तंत्रज्ञान प्रसाराच्या माध्यमातून नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतक-यांच्‍या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन करून त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा व शेतक-यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी डॉ कदम प्रयत्न केले. सदरील कामाचे दखल घेऊन अग्रोकेअर कृषी मंच, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान विस्तार प्रा. लि. यांनी श्री भूषण निकम यांच्या अध्यक्षतेखाली ल श्री नंदकिशोर शेवाळे व इतर जेष्ठ तज्ञ सदस्याचा समावेश असलेल्‍या समितीने डॉ. प्रा. राजेश कदम यांची सातवा राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्कार-२०१५ या पुरस्कारासाठी निवड केली. 
या पुरस्काराबाबत डॉ. प्रा. राजेश कदम यांचे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, डॉ. राकेश आहिरे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सुनील उमाटे, डॉ. जयश्री एकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे, प्रा. प्रल्हाद चव्हाण, डॉ. गजानन भालेराव, डॉ. दिलीप झटे, डॉ विनोद शिंदे व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले आहे.

Sunday, December 27, 2015

लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात उतीसंवर्धन आधारित विशेष प्रशिक्षण शिबीर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्‍या जैवतंत्रज्ञान विभाग पुरस्कृत महिला ग्रामीण विकासाकरिता उती संवर्धन या प्रकल्पांतर्गत सुशिक्षित तरुण विद्याथ्यांसाठी प्रगत उती संवर्धनावर आधारित विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक १६ ते २३ डिसेंबर दरम्‍यान करण्‍या आले होते. सदरिल प्रशिक्षणात लातुर येथील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतले होता. प्रशिक्षणालातूर, पुणे परभणी येथील तज्ञ मंडळीनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीकार्यक्रमालातूरच्‍या दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेशचंद्रजी बियाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर ध्‍यक्षस्थानी चाकूर येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्‍थापण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील हे होते. मा. श्री. रमेश्चन्द्रजी बियाणी आपल्‍या भाषणाम्हणाले कि, जैवतंत्रज्ञान हे काळाची गरज बनलेली असुन सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितित उती संवर्धन जनुकीय परावर्तीत वाण निर्मिती हेच वाढलेल्या लोकसंख्‍येसाठी पूरक अन्नधान्य तयार करू शकते. या तंत्रज्ञानामुल्यवर्धीत वेगवेगळ्या पिकांचे वाण निर्मितीचे सामर्थ्य आहे. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. हेमंत पाटील म्हणाले कि, कै. विलासराव देशमुख साहेबांनी या महाविद्यालाच्या रूपाने लातूरमध्ये जैवतंत्रज्ञान विषयातील अत्‍या‍धुनिक प्रयोगशाळा निर्माण करून भविष्या कृषी संशोधनासाठी लातूर येथे एक व्यासपीठ तयार केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ. अमोल देठे यांनी केले. सूत्रसंचालन श्री पांडुरंग जेटनवरे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ राहुल चव्हाण यांनी केले. प्रशिक्षण शिबीर यशस्वीतेसाठी श्री. संदीप काळे, प्रकल्प व्यवस्थापक श्री. पशुपत वसमतकर, शरयू गुरले, सुनील आडे, श्रीकांत पाटील, लक्ष्मी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.