Wednesday, December 23, 2015

कोणत्‍याही संस्‍थेची प्रगती संस्‍थेत कार्य करणा-या व्‍यक्‍तींच्‍या कार्यामुळे होते........कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

विद्यापीठाच्‍या वतीने कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांना निरोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांची बदली कृषि आयुक्‍तालय, पुणे झाली असुन दिनांक २२ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्‍या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नुतन कुलसचिव श्री दिलीप कछवे, विद्यापीठ नियंत्रक अप्‍पासाहेब चाटे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कोणत्‍याही संस्‍थेची प्रगती ही संस्‍थेत कार्य करणा-या व्‍यक्‍तींमुळे होत असते, डॉ दिनकर जाधव यांनी कुलसचिव या नात्‍यानी विद्यापीठ प्रशासक म्‍हणुन प्रशासनात पारदर्शकता आणली. डॉ जाधव मुळे विद्यापीठ प्रशासनात गतीमानता येऊन विद्यापीठ प्रशासनास मानवी चेहरा दिला. त्‍यांच्‍याच काळात विद्यापीठाचा विसावा पदवीप्रदान समारंभ, विविध पदाच्‍या भरती, कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नती, सेवाजेष्‍ठता यादी आदी कार्य यशस्‍वीरित्‍या पारपाडले तसेच त्‍यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार कार्यातही मोलाचे योगदान दिले. 
कुलसचिव डॉ दिनकर जाधव सत्‍काराला उत्‍तर देतांना म्हणाले की, ज्‍या विद्यापीठात शिकलो त्‍याच विद्यापीठाची सेवा करण्‍याची संधी मिळाली, हे भाग्‍य सर्वांनाच मिळत नाही. गेली सोळा महिने विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचे प्रामाणिक प्रयत्‍न केला. कुलगुरूच्‍या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्‍या सहकार्यांनी विद्यापीठात यशस्‍वीरित्‍या कार्य करू शकलो.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नुतन कुलसचिव श्री दिलीप कछवे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. नुतन कुलसचिव उपजिल्‍हाधिकारी श्री दिलीप कच्‍छवे यांनी दिनांक २२ डिसेंबर रोजी विद्यापीठ कुलसचिवपदाचा कार्यभार स्‍वीकारला, कार्यक्रमात नुतन कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात विद्यापीठातील विविध कर्मचारी व विद्यार्थी संघटनाच्‍या वतीने डॉ दिनकर जाधव यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डि जी मोरे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्‍थित होते.