Saturday, February 13, 2016

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने वेळीच व्युुहरचना आखण्याचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांचे आवाहन

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात कपाशीवरील शेंदरी बोंडअळी : नवीन आव्‍हान या विषयावरील कार्यशाळा संपन्न

कापुस हे मराठवाडयातील मुख्‍य नगदी पिक असुन या वर्षी बी टी कपाशीवर डिसेंबर महीन्‍यातच शेंदरी बोंडअळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. पुढील हंगामात याचा मोठया प्रमाणात उद्रेक होण्‍याचा शक्‍यता लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात दिनांक १० फेब्रुवारी रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी : नवीन आव्‍हान या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि विभागाचे संचालक (निविष्‍ठा व गुणनियंत्रण) श्री जयंत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत सुरत, खंडवा, गुंटुर, आदिलाबाद, मुधोळ, राहुरी व अकोला येथील कापुस शास्‍त्रज्ञ, कृषि विद्यापीठातील कृषि विस्‍तार शास्‍त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
   उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतक-यांची अर्थव्‍यवस्‍था ही मोठया प्रमाणात कापुस या पिकावर अवलंबुन असुन या वर्षीच्‍या हंगामात बी टी कपाशीवर शेंदरी बोंडअळी प्रादुर्भाव आढळुन आला. राज्‍यात पुढील वर्षी या बोंडअळीचा उद्रेक होऊ नये म्हणुन वेळीच उपाय योजना करणे आवश्‍यक असुन हंगामापुर्वी कृषी अधिकारी व शेतकरी यांचे व्‍यापक प्रशिक्षण घेऊन कापुस लागवड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान व वेळेवर आवश्यक उचित नियंत्रणाचे उपाय करणे अगत्‍याचे आहे. या अळीचे क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत सर्वेक्षण करण्‍यात येऊन प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने वेळीच व्‍युहरचना आखण्‍याचे कुलगुरूनी आवाहन केले.  नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मागील हंगामात कापुस अधिक काळपर्यंत शेतामध्‍ये ठेवणे, अधिक कालावधीचा वाणांची लागवड, बिगर बी टी आश्रयात्‍मक ओळी न लावणे, बी टी कपाशीचे बीजोत्‍पादन घेतांना एकच बी टी युक्‍त जनक वाण वापरणे, नत्रयुक्‍त खताचा अतिरेकी वापर, विविध किटकनाशके एकत्र मिसळुन फवारणी करणे आदी शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होण्‍याची कारणे आहेत. त्‍यांनी शेंदरी बोंडअळीसाठी व्‍यवस्‍थापनासाठी उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले.   शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव राज्‍यात वाढु नये म्‍हणुन गावपातळीवर शेतक-यांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील, असे प्रतिपादन श्री जयंत देशमुख यांनी केले. प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी कार्यशाळा आयोजनाची भुमिका सांगुन नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे चालु वर्ष हे अमृत महोत्‍सवी वर्ष असुन संशोधन केंद्राच्‍या प्रमुख उपलब्‍धी मांडल्‍या. कार्यशाळेत कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग यांनी बी टी कपाशीवर चालु वर्षात डिसेंबर महिन्‍यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षणीय असल्‍याचे सांगितले. किटकशास्‍त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ पी आर झंवर यांनी शेंदरी बोंडअळीच्‍या जीवनक्रमाबाबत माहिती दिली.  कार्यशाळेत विविध राज्‍यातील सहभागी शास्‍त्रज्ञांनी त्‍या त्‍या राज्‍यातील बोंडअळीच्‍या प्रादुर्भावाबाबत मते मांडतांना सांगितले की, बोंडअळीमध्‍ये बी टी प्रथिनाविरूध्‍द प्रतिकारक्षमता निर्माण झाली असुन त्‍यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागील दोन हंगामातुन गुजरातमध्‍ये झालेला प्रादुर्भावाच्‍या अनुभवावरून पुढील वर्षी महाराष्‍ट्र व अन्‍य राज्‍यात शेंदरी बोंडअळीचा उद्रेक होऊ नये म्‍हणुन लागवडीपुर्वी उपाययोजना करणे व सामुहिक प्रयत्‍न करणे आवश्‍यक असल्‍याचे चर्चेतुन समोर आले. तसेच या अळीचा प्रादुर्भाव न वाढण्‍यासाठी अल्‍पकालावधीच्‍या वाणांची गरज असल्‍याचे मत शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केले. कार्यशाळेत मराठवाडयातील विविध जिल्‍हयातुन आलेल्‍या प्रगतशील शेतक-यांनीही बोंडअळीबाबतची आपले विचार व अनुभव मांडले.
   कार्यशाळेचे सुत्रसंचलन प्रा अरविंद पांडागळे यांनी तर आभार डॉ शिवाजी तेलंग यांनी केले. याप्रसंगी नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातील नाविन्‍यपुर्ण प्रयोगशाळेची माहिती प्रा अरूण गायकवाड व डॉ पवन ढोके यांनी उपस्थितांना दिली. कार्यशाळेस विद्यापीठातील उपसंचालक संशोधन डॉ जी के लोंढे, डॉ ए एस जाधव, डॉ एस बी पवार, प्रा अरूण गुट्टे आदीसह शेतकरी व  शास्‍त्रज्ञ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्‍यवस्‍थापन घडीपत्रिकेचे विमोचन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संचालक श्री जयंत देशमुख आदी