Thursday, February 4, 2016

दुष्काळी परिस्थितीत वनामकृविच्‍या परभणी मोतीने तारले शेतक-याला

मौजे तरोडा येथील शेतक-यांनी केला विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचा वापर 
परभणी तालुक्‍यातील मौजे तरोडा येथील शेतकरी शे. रहीम शे. नादुमिया यांनी ५ एकर क्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेली परभणी मोती व मालदांडी ज्‍वारीची पेरणी केली आहे. खरीपाची पीके हातची गेल्‍यानंतर हताश न होता शे. रहिम यांनी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन ज्‍वार पीक लागवडी विषयी माहिती घेतली असता विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु.एन. आळसे यांनी अवर्षण परिस्थितीत तग धरणारी परभणी मोती व तूलनेसाठी मालदांडी ज्‍वारी पेरण्‍याचा सल्‍ला दिला तर किडकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी इमिडाक्‍लोप्रिड १४ मिली प्रति किलो बियाण्‍यास बीजप्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यामुळे ज्‍वारीला खोडमाशी व हूमणी अळीचा प्रादुर्भाव झाला नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्‍यामुळे जमिनीत ओलावा अत्‍यंत कमी होता. बोअरला पाणी कमी असल्‍यामुळे सरवनी पाणी दिल्यास एकच एकर जमिन भिजली असती. तुषार सिंचन संच नव्‍हता अशा परिस्थितीत डॉ. आळसे यांच्‍या सल्‍यानूसार वखराला दोरी बांधुन मागे जोड सरत्‍याने खत व बियाण्‍याची कोरडयातच पेरणी केली, त्‍यामुळे आपोआपच स-या पडल्‍या. त्‍या स-यामधुन एकसरी आड पाणी दिले. ज्‍वारी उगवण शंभर टक्‍के झाली. दुसरे पाणी पीक पोटरीत असतांना एक सरी आड दिले त्‍यामुळे अशा अवर्षण परिस्थितीतही कमी पाण्‍यात कुठल्‍याही आधुनिक किंवा उच्‍च दाब सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही, तरिही शे. रहिम यांना एकरी परभणी मोती ज्‍वार वाणाचे साधारणत: धान्‍य १० क्विंटल व कडब्‍याच्‍या १ हजार पेंडया पर्यंत उत्‍पादन येऊ शकते, असा त्‍यांचा अंदाज आहे. त्‍यांच्‍या मते आतापर्यंत अशी ज्‍वारी कधीच झाली नाही. दिनांक ३० जानेवारी रोजी डॉ. यु. एन. आळसे व  प्रा. डी. डी. पटाईत यांनी श्री. शेख रहिम यांचे परभणी मोती पीकाला भेट दिला असता, मावा किडींचा प्रादुर्भाव दिसुन आला त्‍यासाठी प्रति १० लिटर पाण्‍यात डायमेथोएट १० मिली व १३:०:४५ विद्राव्‍य खताचा १५० ग्रॅम मिसळुन फवारण्‍याचे सांगितले.