Sunday, July 17, 2016

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे शेळी पालन व दुग्‍ध व्‍यवसाय प्रशिक्षण संपन्‍न



वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व परभणी आत्‍मा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने दिनांक १३ जुलै रोजी शेतक-यांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण संपन्‍न झाले. कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रशिक्षणासाठी पशु संवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. अे. टी. शिंदे व पशु वैदयकीय महाविदयालयाचे डॉ. नितीन मार्कंडेय, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे उद्घाटनपर भाषणात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले म्‍हणाले की, शेती पुरक व्‍यवसाय प्रतिकुल परिस्थितीत शेतक-यांना फायदेशीर असुन त्‍यामुळे आर्थिकदृष्‍टया शेती जास्‍त फायदेशीर होते. डॉ.बी.एम. ठोंबरे मार्गदर्शनात म्हणाले की, जातीवंत जनावरे ही विकत मिळत नाहीत तर ती निर्माण करावी लागतात. त्‍याकरिता दुग्‍धव्‍यवसाय किंवा शेळीपालन करतांना प्रत्‍येक नोंदी करायला पाहिजे, त्‍यातुनच व्‍यवसाय यशस्‍वी होऊ शकतो. तसेच दुधाळ जनावरे तयार करण्‍यासाठी जातीवंत जनावरे तयार करावीत, भारतीय गीर गाईचे दिवसाला ४५ लिटर दुध देण्‍याची क्षमता आहे, असे आपल्‍या मार्गदर्शनात डॉ. नितीन मार्कंडेय म्‍हणाले. शेळीपालन विषयावर बोलतांना डॉ.अे. टी. शिंदे म्‍हणाले की, आपल्‍या भागात उस्‍मानाबादी ही अतिशय उत्‍कृष्‍ट जात आहे, तरी शेतक-यांनी या जातीचाच उत्‍पादनाकरिता विचार करावा. कोरडवाहू परिस्थितीत योग्‍य नियोजन करुन अधिक उत्‍पादन घेण्‍यासाठी शेतीपुरक व्‍यवसायातुन जे टाकावू पदार्थ आहेत ते शेतीमध्‍ये पुन्‍हा वापरल्‍यास शेतीची सुपिकता वाढविण्‍यास मदत होते,  असे डॉ. यु. एन. आळसे यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा लाभ परभणी जिल्‍हयातील १०० पेक्षा जास्‍त शेतक-यांना घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले.