Thursday, September 1, 2016

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात चर्चासत्र संपन्‍न

वनामकृवि विकसित नांदेड-४४ बीटी वाण लवकरच.......कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राद्वारे प्रसारीत एनएचएच-४४ हा लोकप्रिय संकरीत कपाशीचा वाण बीटी जनुकयुक्त (बीजी-२) स्वरूपात परिवर्तीत करण्याचे काम प्रगतीपथावर असुन येणा-या हंगामात प्रायोगिक तत्‍वावर या वाणाच्या बियाणे काही प्रमाणात महाबीज मार्फ़त वितरीत करण्यात येतील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिली. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या वतीने दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आयोजीत कापूस पीकावरील कीड व रोग व्यवस्थापन विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. केदार साळुंके पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री लाडके, केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले की, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील २० अमेरिकन सरळ वाणांमध्ये बीजी-१ बीटी जनुकाचा अंतर्भाव करण्‍यात आला असुन यापैकी तीन वाण हे वनामकृवि विकसीत आहेत. तर सघन लागवडीत उच्च उत्पादकता असणा-या १४ देशी वाणांपैकी चार वाण हे वनामकृवि विकसीत आहेत. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त वर्षभर विवीध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कापूस पीकामध्ये येणा-या नवनवीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्नशील रहावे, अशी सुचना मा. श्री. केदार साळुंके यांनी मांडली. शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतक‌-यांनी लागवडीपासून सजग राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. तुकाराम मोटे यांनी आपल्‍या भाषणात केले.

कपाशीवर येत असलेली शेंदरी बोंडअळी व ईतर किड-रोग यांच्या व्यवस्थापनाकरीता वाढत जाणारा खर्च कमी करणे व योग्य वेळी उचित व्यवस्थापन याबाबत माहिती देण्‍यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापनाबाबतची सचित्र माहिती देणा-या कापूस संशोधन केंद्राने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन व वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले. चर्चासत्रात डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. अशोक जाधव, डॉ. पवन ढोके, प्रा. अरविंद पांडागळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्राच्‍या धनेगांव प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या एनएचएच-४४ जनुक परिवर्तीत संकरीत वाणासह इतर विवीध वाण व लागवडपद्धती आदी प्रयोगांची पाहणी मान्यवर व शेतक-यांनी केली. चर्चासत्रास कृषि विभाग व आत्माचे अधिकारी-कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.