Monday, February 20, 2017

औरंगाबाद येथील कृ‍षी विज्ञान केंद्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योगावर चार दिवासीय कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्‍यान संपन्‍न झाला. प्रशिक्षणात किमान कौशल्य आधारित सोया प्रक्रिया उद्योगाविषयी सोयाबीन पासून सोया दूध, सोया पनीर, श्रीखंड, शिरा, सोया नट्स, भजे, सोया ब्रेड रोल, सोया पनीर पकोडा, सोया आपे, सोया लाडू, सोया चिवडा, सोया चकली, सोया खीर आदी पदार्थ तयार करण्‍याचे प्रात्‍याक्षिके दाखविण्यात आली. देशात कुपोषणाचे वाढते प्रमाण कमी करण्याच्‍या दृष्‍टीने व आजच्या दगदगीच्‍या जीवनात योग्य आहार व्यवस्‍थापनात आरोग्यदायी सोयबीनचा वापर रोजच्या आहारात कसे करावे, शास्त्रीय पद्धतीने सोयाबीन पासून प्रथिणयुक्त व चविष्ट पदार्थ साध्या व सोप्या पद्धतीने बनविण्‍याचे मार्गदर्शन प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी केले. प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील एकुण 28 महिला व पुरुषांनी घेतला. कार्यक्रमाच्‍या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे आत्माचे उपसंचालक श्री सतीश शिरोडकर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, आरोग्यदायी पदार्थाची बाजारपेठेत मोठी मागणी असुन तरुण महिला व पुरुषांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार यांनी महिलांनी शेतामालाचे मूल्यवर्धन करून व्यवसायभिमूख होण्‍याचा सल्‍ला दिला. प्रशिक्षणात सहभागी भावी उद्योजकांचे मनोबल वाढविण्यासाठी शिकविण्यात आलेले पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.