Saturday, February 4, 2017

बाजारपेठेची खात्री करूनच दर्जेदार औषधी वनस्‍पतीचे शेतक-यांनी उत्पादन घ्यावे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न

राज्‍यात आयुर्वेद उपचार पध्‍दतीचा लोकांत उपयोग वाढत आहे, आयुर्वेद उपचारासाठी दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणीही वाढत आहे. शेतक-यांनी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड करण्‍यापुर्वी बाजारपेठाचा विचार करूनच लागवड करावी. राज्‍यात कोरडवाहु क्षेत्र मोठे असुन कोरडवाहु क्षेत्रात येणा-या औषधी व सुगंधी वनस्‍पतींची निवड शेतक-यांना करावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व पुणे येथील महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ३ फेब्रवारी रोजी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे येथील फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळाचे संचालक मा. डॉ एस एल जाधव हे उपस्थित होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डी एन गोखले, विभाग प्रमुख डॉ डी बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी औषधी वनस्‍पतीची लागवडीपुर्वी प्रत्‍यक्ष आयुर्वेदतज्ञ, आयुर्वेद औषधी निर्माते व प्रक्रिया उद्योजक यांच्‍याशी प्रत्‍यक्ष भेट घेऊनच निर्णय घ्‍यावा. क्‍लस्‍टर पध्‍दतीने गटशेतीच्‍या माध्‍यमातुन औषधी वनस्‍पतीची लागवड व विपणन करण्‍याचा सल्‍लाही शेतक-यांना दिला.  
संचालक मा. डॉ एस एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशात दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणी वाढत आहे, राज्‍यात आपल्‍या वातावरणात येणा-या औषधी वनस्‍पतीचे क्षेत्र वाढविणे शक्‍य आहे. या वनस्‍पती लागवड व साठवणुक शास्‍त्रशुध्‍दपणे करणे गरजेचे आहे. महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ राज्‍यात विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन औषधी व सुगंधी वनस्पतीच्‍या लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्‍साहित करत आहे. यापासुन मुख्‍य पीकासोबतच अतिरिक्‍त उत्‍पादनाचे साधन शेतक-यांना प्राप्‍त होऊ शकते.  सदरिल वनस्‍पतीच्‍या लागवाडीसाठी शासकिय अनुदानाचीही सोय आहे.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमात सर्पगंधा लागवड तंत्रज्ञानावर घडीपत्रिकेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विमोजन करण्‍यात आले. सदरिल कार्यशाळेत गुगळ, अश्‍वगंध, सर्पगंधा, चंदन, शतावरी लागवड व उपयोग याविषयावर आयुर्वेद तज्ञ डॉ वैशाल महाजन, आयुर्वेद तज्ञ डॉ कौसडीकर, वनश्री पुरस्‍कार प्राप्‍त श्री महेंद्र घोगरे, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एल एन जावळे, डॉ डि जी दळवी, डॉ अशोक जाधव, डॉ विजया पवार, डॉ के व्‍ही देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ डी बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा एस एस शिंदे यांनी केले तर आभार डॉ. एल एन जावळे यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाडयातील प्रगतशील शेतकरी, आयुर्वेद औषधी निर्माते, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.