Sunday, April 2, 2017

मराठवाडयातील शेतक-यांत उस्‍मानाबादी शेळीपालनातुन आर्थिक स्‍थैर्य शक्‍य ....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित उस्‍मानाबादी शेळीपालनाविषयी पशुपालक व कृषी विस्‍तारकांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि महाविद्यालयाचा पशुसंवर्धन व दुग्धशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत दिनांक 31 मार्च रोजी उस्‍मानाबादी शेळीपालन : भविष्‍यकालीन संधी व आव्‍हाने या विषयावर शेतकरी–पशुपालक व कृषी विस्‍तारकांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बाळासाहेब भोसले, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, उस्‍मानाबादी शेळीचे चविष्‍ट मांस व जुळे - तीळे करडे देण्‍याची जास्‍त क्षमतेमुळे ही शेळी काळे सोने म्‍हणुन महाराष्‍ट्रातच नव्‍हे तर इतर राज्‍यातही प्रसिध्‍द आहे. मराठवाडया सारख्‍या कोरडवाहु क्षेत्रात उस्‍मानाबादी शेळीपालनातुन शेतकरी व पशुपालक सामाजिक व आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त करू शकतात. उस्‍मानाबादी शेळीचा अनुवंश शुध्‍द असणे गरजेचे आहे.
प्रशिक्षणाचा समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. समारोपीय भाषणात डॉ अशोक ढवण यांनी शेळीपालनातुन शेतक-यांना निश्चितच आर्थिक पाठबळ प्राप्‍त होऊ शकते, असे प्रतिपादन केले.
सदरिल प्रशिक्षणात उस्‍मानाबादी शेळीचे जातीवंत पैदास तंत्रज्ञान, अर्थशास्‍त्र, यशस्‍वी चतु : सुत्री, करडांचे संवर्धन, उत्‍कृष्‍ट व्‍यवस्‍थापन, आरोग्‍य, आदर्श गोठा, वर्षभराचे चारापिकांचे नियोजन या विषयावर डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ माणिकराव धुमाळ, डॉ अनंत शिंदे, डॉ धनंजय देशमुख, डॉ गजानन ढगे, डॉ. शंकर नरवाडे, प्रा. दत्‍ता बैनवाड आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी पशुपालक श्री बच्‍चेसाहेब देशमुख, रामेश्‍वर मांडगे, शेषराव सुर्यवंशी, एकनाथराव साळवे आदींची सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक तथा विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ अनंत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दत्‍ता बैनवाड यांनी केले. प्रशिक्षणात मराठवाडयातील 81 शेतकरी व 15 कृषी विस्‍तारकांनी सहभाग नों‍दविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. नरेंद्र कांबळे, प्रकाश भोसले, नामदेव डाळ, माधव मस्‍के आदींनी परिश्रम घेतले.