Sunday, May 14, 2017

वनामकृवित विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन तसेच खरीप पीक परिसंवाद, कृषि प्रदर्शनाचेही आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 45 व्‍या वर्धापन दिना‍निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळावा आयोजन गुरूवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11.00 वाजता विद्यापीठ प्रशासकीय इमारतीजवळील नवीन पदव्‍युत्‍तर वसतिगृह मैदानात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उद्घाटन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. किसनराव लवांडे यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचे संचालक तथा विस्‍तार व प्रशिक्षण (कृषि) संचालक मा. डॉ. एस. एल. जाधव उपस्थित राहणार असुन खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. श्री. सतीश चव्‍हाण, आमदार मा. श्री. विक्रम काळे, आमदार मा. श्री. अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), आमदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, आमदार मा. श्री. विजय भांबळे, आमदार मा. डॉ. मधुसुदन केंद्रे, आमदार मा. श्री. मोहन फड आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍यानिमित्‍त खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर आदीसह खरीप पीक लागवड, शेतीपुरक जोडधंदे, सेंद्रिय बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन विषयावर मार्गदर्शन करणार असुन कृषि तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांच्‍या शंकाचे निरसनही करण्‍यात येणार आहे. याप्रसंगी कृषि प्रशदर्शनाचेही आयोजन करण्‍यात आले असुन यात कृषि तंत्रज्ञान व कृषि औजारे वर आधारीत विद्यापीठाचे दालने, शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या, खाजगी बी-बियाणे, कृषि निविष्‍ठाच्‍या कंपन्‍या व बचत गटाचे दालनाचा समावेश राहणार आहे.  याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित विविध पीकांच्‍या वाणाच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात येणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी. आर. शिंदे व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले आहे.