Thursday, July 6, 2017

सोयाबीन व कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

किडींच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
जुन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाडयात कापूस व सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली. परंतु नंतर पावसाने उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर पैसा व करडे भुंगेरे या किडी कोवळया पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान करत आहे.
करडे भुंगेरे: करडया रंगाचे व तोंडाचा भाग सोंडे प्रमाणे पुढे आलेला असतो. साधारणता ही कीड कमी महत्वाची असून दर वर्षी नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु कधीकधी कीडींचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून येतो. हि कीड पांनाना गोलाकार छिद्रे पाडतात व कोवळी रोपे खाऊन टाकतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस 36 एस एल 25 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावे.
पैसा (मिलीपेड) : हि जमिनीवर आढळणारी पिकांना सर्वात जास्त नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जाते. किड कपाशीचे बियाणे फस्त करुन फक्त टर फल शिल्लक ठेवत आहे. त्यामुळे कपाशीची उगवण होत नाही व मोठया प्रमाणात शेतामध्ये तुट दिसून येत आहे. त्याचबरोबर तुट लावल्या जागेवरचे बियाणेसुध्दा खाऊन टाकत आहेत. रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकतात. ही किड निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात. तसेच बांधावरीलव शेतावरील तणांवरसुध्दा खातांना आढळून आली आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
व्यवस्थापन :
- शेतात व बांधावरील पैसा किड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात.
- शेत तणविरहित ठेवावेत व शेतातील तसेच बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे.
- पिकामध्ये कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी  उघडया पडून नष्ट होतील.
- जमिनीतील किडींसाठी फोरटे 10 टक्के दाणेदार 10 किलो/ हेक्टरी जमिनीमध्ये टाकावे.
- चांगला पाऊस पडल्यास या किडिंचे नैसर्गीक नियंत्रण होते.

वरील प्रमाणे उपाययोजना करुन या किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.