Friday, September 29, 2017

रब्‍बी हंगामात अधिक उत्‍पादनासाठी योग्‍य पीक व्‍यवस्‍थापन करा

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
दरवर्षी हवामानात नवीन बदल होत आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्‍या बदलाला सामोरे जात निसर्गासोबत राहून शेती केल्‍यास निश्चितच उत्‍पादनात वाढ होते. या वर्षी पाऊस आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी असला तरी काही अपवाद वगळता बरेचशे मोठे व छोटे जलस्‍त्रोत भरले आहेत. मराठवाडयातील जायकवाडी, लोअर दुधना, तेरणा मांजरा ही धरणं पुर्णपणे भरले आहेत परंतु येलदरी, सिध्‍देश्‍वर, हि धरणं अजून पावसाच्‍या प्रतिक्षेत आहेत. मराठवाडयात जलयुक्‍त शिवाराची कामे ब-यापैकी झाल्‍यामुळे या जलस्‍त्रोतांचा वापर रबी हंगामात एखादं संरक्षित पाणी देण्‍यासाठी निश्चितच होऊ शकते.
या वर्षी जलस्‍त्रोतांमध्‍ये पाणी भरपुर प्रमाणांत उपलब्‍ध असल्‍यामुळे त्‍याचे नियोजन रबी हंगामासाठी करावे. पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पीक व पीक पध्‍दतीचे नियोजन करावे. कमी पाण्‍यात येणारी पीके जसे कि, हरभरा, करडई, ज्‍वारी, जवस इत्‍यादी उपलब्‍ध ओलाव्‍यावर पेरणी करुन एखादे पाणी दिले तर हेक्‍टरी ४ ते ५ क्विंटल उत्‍पन्‍न वाढते. सोयाबीन काढणीनंतर शुन्‍य मशागतीवर करडई, हरभरा पेरावीत. देशी हरभरा जमिनीत ओल कमी असल्‍यास ७-१० सें.मी. खोलीवर पेरणी करावी. परंतु काबुली हरभ-याची पेरणी ५ सें.मी. पेक्षा जास्‍त खोलीवर करु नये, उगवणीवर परिणाम होतो कारण त्‍याचा वरचा पापुद्रा पातळ असतो. सोयाबीन नंतर ज्‍वारी पेरतांना ४ किलो ऐवजी ६ किलो प्रति एकर बियाणे घ्‍यावे. उगवण कमी होते म्‍हणून बियाणे जास्‍त घ्‍यावे. करडई बियाणे ५ ते ६ किलो प्रति एकर पेरावे. काही भागात पाऊस कमी पडल्‍यामुळे हुमणी किडींचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी इमिडाक्‍लोप्रिड ४८ टक्‍के प्रति किलो बियाण्‍यास १४ मिली लावून पेरणी करावी. त्‍यामुळे ज्‍वारीत खोडमाशीचाही प्रादुर्भाव कमी होतो.
जमिनीतील ओलाव्‍याचा कार्यक्षम वापर व्‍हावा म्‍हणून ज्‍वारी, हरभरा, करडई पीकांची पेरणी ४५ सें.मी. अंतरावर करावी. एक ते दोन कोळपण्‍या केल्‍यास जमिनीतील ओलावा टिकतो व तणांचा बंदोबस्‍त करता येतो. रबी गहू सोडून बाकी सर्व पिके ऑक्‍टोबरच्‍या पहिल्‍या आठवडयात पेरावीत. लवकर पेरणी केल्‍यास परतीच्‍या पावसामुळे पीकांना मर लागण्‍याची शक्‍यता असते, आणि ज्‍वारीत खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. उशिरा पेरणी झाल्‍यास पीक परिपक्‍वतेच्‍या अवस्‍थेत पाणी कमी पडून उत्‍पादनात घट येते. म्‍हणून वेळेवर पेरणी करणे महत्‍वाचे आहे.
गव्‍हाची पेरणी नोंव्‍हेबरच्‍या दुस-या आठवडयात करावी. लवकर पेरणी केल्‍यास अकाली परिपक्‍वता येते व उत्‍पन्‍नात मोठी घट होते. पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार गव्‍हाचे वाण निवडावेत. कमी पाणी असल्‍यास लोक-१, नेत्रावती हे वाण तर भरपुर पाणी असल्‍यास परभणी- ५१, त्रयंबक, समाधान हे वाण घ्‍यावेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी येथे हरभरा-आकाश(बीडीएनजी-७९७), ज्‍वार - परभणी मोती, करडई - पीबीएनएस-१२ व गहू - त्रयंबक, समाधान व नेत्रावती हे वाण मुबलक प्रमाणात उपलब्‍ध आहेत. हे सर्वच वाण किड, रोगास कमी बळी पडणारे आणि अधिक उत्‍पादन देणारे असल्‍यामुळे या वाणांची निवड करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्राच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.