Friday, November 10, 2017

कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याबाबत विविध स्‍तरावर जनजागृती करण्‍याची गरज.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किटकनाशकांचा सुरक्षित वापर यावरील विभागीय कार्यशाळा संपन्‍न

किटकनाशकांच्‍या फवारणी पासुन विषबाधा होऊन यवतमाळ जिल्‍हयात अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले, याप्रकारच्‍या घटना ओरिसा व तामिळनाडु राज्‍यात ही घडल्‍या आहेत. मराठवाडयात यासारख्‍या घटना होऊ नयेत म्‍हणुन शेतक-यांमध्‍ये कीटकनाशकांचा सुरक्षित वापराबाबत जागृतीसाठी कृषि विभाग व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रयत्‍न करावी लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन, कापूस आणि तूर व हरभरा पिकावरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत दिनांक १० नोव्हेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक शास्त्रज्ञ यांच्यासाठी किटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयावर विभागीय कार्यशाळा व मध्यहंगाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला, कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री आर एस भताने हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (परभणी) श्री बी आर शिंदे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (नांदेड) श्री पी एस मोटे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्रकल्‍प संचालक श्री आर एस चोले, श्री एम एल चपळे, श्री आर टी सुखदेव, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विस्‍ताराकाबरोबरच किटकनाशक विक्रत्‍यांना ही याबाबत प्रबोधन करणे गरजेचे असुन कीटकनाशकांचा सुरक्षीत वापरावरील पोस्‍टर व मार्गदर्शिका गावागावात व कीटकनाशक विक्री केंद्रावर उपलब्‍ध करून देण्‍यात यावेत. किटकनाशकांची बाधा झाल्‍यास प्रथमोपचारासाठी घ्‍यावयाची दक्षतेबाबत गावातील प्राथमिक आरोग्‍य केद्रातील वैद्यकिय अधिकारी यांच्‍याशी ही समन्‍वय राखणे गरजेचे आहे.
विभागीय कृषि सहसंचालक श्री आर एस भताने आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, तुर, कापुस व रब्‍बी हंगामातील हरभरा पिकांवरील कीड - रोग व्‍यवस्‍थापन करतांना कीटकनाशकांचा वापर योग्‍यरित्‍या करण्‍यासाठी कृषि विभागातील क्षेत्रीय अधिका-यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करावे. कार्यशाळेत अवगत केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत त्‍वरीत पोहचवावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार श्री आर टि सुखदेव यांनी मानले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ पी आर झंवर, डॉ ए जी बडगुजर, डॉ बी व्‍ही भेदे व डॉ डि पी कुळधर लिखित कीटकनाशकांचा सुरक्षित वापर मार्गदर्शिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमास कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळेत कीटकनाशकांचा किफायतशीर वापर, वर्गीकरण, हाताळणी यावर तसेच कपाशीवरील शेदरी बोंडअळी, तुर पिकावरील किडींचे व्‍यवस्‍थापन व किडींचे सर्वेक्षण यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. शास्‍त्रशुध्‍द फवारणीचे प्रात्‍यक्षिकही कार्यशाळेत दाखविण्‍यात आले. कार्यशाळे यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.