Sunday, November 5, 2017

वनामकृवित इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवाचे शानदार उद्घाटन

राज्‍यातील एकुण १९ कृषी व अकृषि विद्यापीठातील सुमारे ७१४ कलावंताचा सहभाग



महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागात असलेल्‍या विद्यार्थ्‍यामध्‍ये सांस्‍कृतिक कला गुणांना वाव देण्‍याची गरज असुन इंद्रधनुष्‍य सारख्‍या युवक महोत्‍सव त्‍यांच्‍यासाठी मोठे व्‍यासपीठ आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यी घडत असतो, त्‍यांच्‍या सांस्‍कृतिक कला गुणांना प्रोत्‍साहन देण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन परभणीचे आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात १५ वी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य २०१७ स्‍पर्धेचे आयोजन दिनांक ५ ते ९ नोव्‍हेबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर प्रसिध्‍द कवी मा. प्रा. इंद्रजित भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती होती, अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, स्‍पर्धा निरिक्षक डॉ आनंद पाटील, डॉ अजय देशमुख, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिध्‍द कवी प्रा. इंद्रजित भालेराव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, समाजात कलावंत हा सर्वात मोठा असतो, श्रीमंत, अधिकारी किंवा राजा यापेक्षा लोक कलावंताना लक्षात ठेवतात. कलावंतांनी आपल्‍या कलागुणांचा वापर लोक, समाज व राष्‍ट्राच्‍या कल्‍याणासाठी करावा. नवा युगाचा नवा शिवाजी तुमच्‍या मधुन घडवावा, असे प्रतिपादन त्‍यांनी आपल्‍या कवितेच्‍या माध्‍यमातुन केली.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आजच्‍या माहिती तंत्रज्ञान व मोबाईलच्‍या युगात खरी कला व संस्‍कृती लयास जाण्‍याची भिती निर्माण झाली असुन विद्यार्थ्‍यांमध्‍ये कला व संस्‍कृती जपण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतीलयुवक महोत्‍सवात विद्यार्थ्‍यींनी पारितोषकासाठी सहभाग न घेता, बेभान होऊन कला सादर करावी, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
स्‍वागतपर भाषण शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले तर प्रास्‍ताविक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशा आर्या  व डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार प्राचार्या डॉ हेमांगिणी सरंबेकर यांनी मानलेप्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते युवक महोत्‍सवाच्‍या ध्‍वजाचे ध्‍वजरोहण करण्‍यात आले तसेच सहभागी विद्यापीठ संघानी मान्‍यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यी विद्यार्थ्‍यीनी, प्राध्‍यापक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. पाच दिवसीय युवक महोत्‍सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय व ललित कला अशा विभागांतील विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेत. महोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्त्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकींग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध २४ कला प्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील. राज्‍यातील १९ कृषी व अकृषि विद्यापीठातील सुमारे ७१४ स्‍पर्धक विद्यार्थ्‍यी, विद्यार्थ्‍यीनीराष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील स्‍पर्धा निरिक्षक सहभागी होणार आहे. सदरिल स्‍पर्धेचे आयोजन राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री चे. विद्यासागर राव यांच्‍या आदेशान्‍वय करण्‍यात आले आहे. सदरिल युवक महोत्‍सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक ९ नोव्‍हेबर रोजी परभणीचे खासदार मा. श्री. संजय जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित पार पाडणार आहे.


सहभागी विद्यापीठे - एसएनडीडी महिला विद्यापीठ, मुंबई, यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कवी कुलगुरू कालीदास संस्‍कृत विद्यापीठ, रामटेक, महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, सोलापुर विद्यापीठ, सोलापुर, शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मुंबई विद्यापीठ, मुंबई, महाराष्‍ट्र प्राणी व मत्‍स विद्यापीठ, नागपुर, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर, स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी