Thursday, December 14, 2017

जागतिक हवामान बदलाचा कृषि क्षेत्रावर होणा-या परिणामानाचा पुर्व अनुमान काढुन योग्‍य उपाययोजना करणे गरजेचे......निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद

जागतिक हवामान बदल  त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन


मार्गदर्शन करतांना निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद 

औरंगाबाद :
हवामान बदलाचा परिणाम कमी करण्‍यासाठी बदलत्‍या हवामानाचा पुर्व अनुमान काढुन वेळीच योग्‍य उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्‍यामुळे परिणामाची दाहकता कमी करता येईल. हवामान बदल हा जागतिक प्रश्‍न आहे, असे न मानता सर्वसामन्‍याचे जीवनमानाशी संबंधित आहे, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद यांनी मांडले.  

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आले. सदरिल चर्चासत्राच्‍या उदघाटनाप्रसंगी दिनांक १४ डिसेंबर रोजी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महा‍संचालक पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा, इजिप्‍तचे कृषि तज्ञ डॉ अदेल बेलत्‍यागी, ऑस्‍ट्रेलियाचे कृषि शास्‍त्रज्ञ डॉ जॉन डिक्‍सन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु, महिकोचे अध्यक्ष श्री. राजु बारवाले, राहुरी येथील हात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास भाले, पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक श्री के एम नागरगोजे, औरंगाबाद येथील वाल्मीचे महासंचालक मा. श्री. एच. के. गोसावी, संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. अविनाश गरुडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. रमेश चंद पुढे म्‍हणाले की, वातावरणातील हानीकारक वायुचे होणारे प्रसरण कमी करणे, सौर ऊर्जाचा वापर वाढविणे, वातावरणातील कार्बनचे संतुलन राखणे गरजेचे आहे. यासाठी देशातील हरित क्षेत्र वाढवावे लागेल. वृक्षलागवडीवर भर देऊन वृक्ष तोडीला बंधने घालावी लागतील. देशातील नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा वापर कार्यक्षमरित्‍या झाला पाहिजे. विशेषत: देशात पडणा-या पावसाच्‍या पाण्‍याचे योग्‍यरित्‍या संवर्धन व वापर करावा लागेल. शेतीतील  पिकांचे अवशेष जाळल्‍यामुळे मोठया प्रमाणावर वातावरणावर परिणाम होत आहे, याबाबत शेतक-यांमध्‍ये जाणिव जागृती करण्‍याची गरज आहे. शेतक-यांचे पारंपारिक ज्ञान ही हवामान बदलावर मात करण्‍यासाठी आपणास उपयुक्‍त पडु शकते, यावर सखोल संशोधन कृषि शास्त्रज्ञांनी करावे, असे मत निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद यांनी मांडले.  
अध्‍यक्षीय भाषणात पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा म्‍हणाले की, वाढत्‍या लोकसंख्‍येस अन्‍नधान्‍याची वाढती गरज, वाढता औद्योगिक विकास यासर्व बाबींचा हवामान बदलाशी संबंध आहे यावर अधिक संशोधनाची गरज आहे. औद्योगिक विकासावर अधिक भर देतांना आपण नैसर्गिक संतुलन दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामान बदलाचराष्ट्रीय अन्नसुरक्षेवर मोठा परिणाम होणार आहे. हवामान बदलाचा कृषि पाणी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस, पुर परिस्थिती, गारपीट, उष्णतेची लाट तसेच पावसाचे खंड हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्याचा अल्पभुधारक शेतक-यांच्या कृषि उत्पादनावर व पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. नैसर्गिक साधनसामग्री जसे जमीन, पाणी वातावरण यांचाहास होऊन कृषि उत्पादनात घट होत असल्याचे दिसुन येत आहे. पिकांवरील किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवामान बदलामुळे होणा-या तापमानातील वाढ मुळे पिक पक्‍वतेवर मोठा परिणाम होणार असुन पिकांचा कालावधी कमी होईल. देशातील गहु, भात, सुर्यफुल आदी पिके तापमानास अधिक संवेदनशील असुन त्‍याचा उत्‍पादनावर परिणाम होत आहे. हवामान अनुकुल कृषि तंत्रज्ञानाच्‍या विकासासाठी कृषि संशोधनावर अधिक गुंतवणुक करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.  
यावेळी ऑस्‍ट्रलियाचे शास्‍त्रज्ञ डॉ जॉन डिक्‍सन, इजिप्‍तचे शास्‍त्रज्ञ डॉ अदेल बेलत्‍यागी व महिकोचे अध्यक्ष श्री. राजु बारवाले यांनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
स्‍वागतपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी चर्चासत्र आयोजनाची पार्श्‍वभुमी विषद करून चर्चासत्रातील शिफारसींचा देश व राज्‍यातील कृषि धोरण निश्चित करतांना मार्गदर्शक ठरतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिल गोरंटीवार यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले.
कार्यक्रमात राज्‍यातील चार ही कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍यातील 278 तालुक्‍याचा गेल्‍या तीस वर्षाचा हवामानाचा अभ्‍यास करून अॅग्रो क्‍लॉयमेटिक अॅटलास ऑफ महाराष्‍ट्र तयार करण्‍यात आला असुन याचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल अॅटलास तालुकास्‍तरिय पिक नियोजन व लागवडीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सदरिल चर्चासत्राचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे यजमानपद असुन चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञ सहभागी झाले असुन   ते विविध विषयावर मार्गदर्शकरणार आहेत. देशविदेशातुन सुमारे ८०० हुन अधिक संशोधनपर निबंध प्राप्त झाले असुन ६०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणा-या चर्चासत्राप्रामुख्याने हवामान बदल, कृषि क्षेत्रावर होणारे परिणाम, जल क्षेत्रावर होणारे परिणाम, मत्स्य पशु यावर होणारे परिणाम तसेच अल्पभुधारक शेतक-यांची हवामान बदलावर मात करण्याची उपाययोजना आदी विषयावर आठ वेगवेगळया सत्रात विविध संशोधनपर निबंधाचे सादरीकरण होणार आहे. सदरिल विविध विषयावर विचारमंथन होणार असुन हवामान बदलावर मात करून कृषि क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध नवनवीन तंञज्ञानाचा वापर करण्यासंबधी उपाययोजना सुचविल्या जातील त्याचा फायदा विविध शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक तसेच पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी होणार आहे. वाल्मी येथील संस्थेत तांत्रिक सत्राबरोबर हवामान बदलावर आधारीत उपकरणे, साहित्यविविध पुस्तकांचे तसेच अनेक कंपन्याचे दालन असलेले प्रदर्शनाचे उदघाटनही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
चर्चासत्राचे संयोजक वनामकृविचे संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे असुन सहसंयोजक मफुकृविराहुरीचे डॉ. सुनिल गोरंटीवार व वाल्मी औरंगाबादचे डॉ. अविनाश गरुडकर आहेत तसेच आयोजन सचिव मुख्यशास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार हे आहेत. 
चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हया आहेत. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

मार्गदर्शन करतांना नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महा‍संचालक पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा