Monday, February 12, 2018

समाज घडविण्‍यासाठी संस्‍कारांचे विचारपीठ उभे करावी लागतील.......श्री यशवंत गोसावी

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन
कमी वयातच शिवछत्रपती, शाहु महाराज, ज्‍योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदीं थोर पुरूषांनी इतिहास रचला. या थोर व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या विचारांचा महाविद्यालयीन युवकांनी अभ्‍यास केला पाहिजे, शिवचरित्राचे चिंतन केले पाहिजे. चांगला समाज घडविण्‍यासाठी महाविद्यालयांनी व पालकांनी संस्‍काराचे विचारपीठ उभे केली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवव्‍याख्‍याते श्री यशवंत गोसावी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने शिवजयंती निमित्‍त शिवव्‍याख्‍यान मालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शिवश्री यशवंत गोसावी यांनी पहिले पुष्‍प गुंफले. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषि परिषदेचे शिक्षण संचालक डॉ एच के कौसडीकर, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद र्इस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री यशवंत गोसावी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात व्‍यसनापासुन व समाज माध्‍यमाच्‍या आभासी जगापासुन दुर रहावे. गरिबी हे जीवनात अपयशाचे कारण होऊ शकत नाही कारण अनेक गरिब कुटूंबातील विद्यार्थ्‍यींनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. युवकांनी आपले ध्‍येय निश्चित करून निरंतर परिश्रम घेतले पाहिजे. आई - वडीलांचे स्‍वप्‍न पुर्ण करणे हेच युवकांचे ध्‍येय असले पाहिजे.
कार्यक्रमात डॉ एच के कौसडीकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन अक्षय नाटकर यांनी केले तर आभार अदिती वाघ हिने मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शिवजयंती महोत्‍सव 2018 समितीचे अध्‍यक्ष महेश भोसले, उपाध्‍यक्ष तुकाराम कु-हे व इतर सदस्‍यांनी परिश्रम घेतले.