Thursday, April 5, 2018

कृषि पदवीधरांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे,.....जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (जालना) श्री दशरथ तांबाळे

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या निरोप समारंभात प्रतिपादन
कृषि अभ्‍यासक्रमातील वैविध्‍यपुर्ण विषयामुळे कृ‍षीच्‍या विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धापरिक्षेत यश मिळविण्‍यासाठी मदत होते, अनेक कृषि पदवीधर राज्‍यातील विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. परंतु कृषि पदवीधरांनी केवळ नौकरदार होण्‍यापेक्षा रोजगार देणाऱ्या कृषि उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन जालना येथील जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांबाळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा तृतीय सत्राच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या वतीने निरोप समारंभ दिनांक 5 एप्रिल रोजी आयोजित करण्‍यात आला होता, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दशरथ तांबाळे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील सुविधा व विद्यापीठ ग्रंथालयाचा उपयोग घेऊन अनेक विद्यार्थ्‍यी स्‍पर्धा परिक्षेत यशस्‍वी झाले, आज ते विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्य करित आहेत. प्रशासकीय पदावर कार्य करतांना स्‍वत:तील कौशल्‍याचा व ज्ञानाचा वापर करण्‍यास मर्यादीत वाव आहे. परंतु कृषी उद्योजकतेसह कृषि संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात मोठा वाव आहे.
मार्गदर्शनात डॉ पी आर शिवपुजे यांनी विद्यार्थ्‍यींनी जीवनात यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा अंगीकरण्‍याचा सल्‍ला दिला तर अध्‍यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ विलास पाटील कृषि पदवीधरांनी शिस्‍तीचे जीवनात पालन करून वाईट सवयीपासुन दुर राहण्‍याचा सल्‍ला दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी सन 2017-18 मध्‍ये महाविद्यालयातील राज्‍यसेवा व बॅकिंग परिक्षेत उत्तीर्ण होऊन 35 विद्यार्थ्‍यांची निवड झाल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी आवटे व पंकज मुखीरवाड यांनी केले तर आभार ऐश्‍वर्या काळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या कलागुणांचे सादरिकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.