Friday, May 18, 2018

शेतकरी वाचला तर देश वाचेल....भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि शिक्षण) मा. डॉ. नरेन्‍द्र सिंह राठौड

वनामकृवित आयोजित खरिप शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
मेळाव्‍यात सत्‍कार करण्‍यात आलेले शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतक-यासह मान्‍यवर
खरीप शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना

आज देशात अन्‍नधान्‍य व इतर शेतमालाचे मोठया प्रमाणावर उत्‍पादन होत आहे, याचे सर्व श्रेय शेतकरी, शेतमजुर, शास्‍त्रज्ञ व शासनाचे धोरण यास जाते. शेतकरी हा समाजातील मुख्‍य सन्‍मानिय व्‍यक्‍ती असुन शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेतमालास उत्‍पादन खर्चाच्‍या दिडपट हमी भाव देण्‍यासाठी राष्‍ट्रीय पातळीवर निश्चित असे धोरण ठरविण्‍याचे काम प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि शिक्षण) मा. डॉ. नरेन्‍द्र सिंह राठौड यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 46 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 18 मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, शिक्षण संचालक डॉ. व्‍ही. डी. पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ पी आर शिवपुजे, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री के आर सराफ, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. नरेन्‍द्र सिंह राठौड पुढे म्‍हणाले की, आज देशातील उत्‍पादन वाढीचा दृष्‍टीने मृदा व जलसंधारण, कृषि यांत्रिकीकरण, हवामान बदलास अनूकुल कृषि तंत्रज्ञान आदी बाबींचा विचार करावा लागेल. देशात आजपर्यत अकरा कोटीपेक्षा जास्‍त शेतक-यांना मृदा आरोग्‍य पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले असुन याचा उपयोग शेतक-यांनी करावा. कृषि यांत्रिकीकरणासाठी युवा शेतक-यांनी पुढाकार घ्‍यावा. देशातील 690 कृषि विज्ञान केंद्राच्‍या माध्‍यामातुन शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रयत्‍न चालु आहेत. बदलत्‍या हवामानात देखिल शेतीचे उत्‍पादन वाढण्‍यासाठी शास्‍त्रज्ञ प्रयत्‍न करीत आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.   
अध्‍यक्षीय समारोप कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कापुस हे मराठवाडा व विदर्भातील मुख्‍य नगदी पिक असुन गुलाबी बोंडअळीमुळे गेल्‍या वर्षी शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुभार्व टाळण्‍यासाठी किड व्‍यवस्‍थापनाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ मोठया प्रमाणात प्रयत्‍न करित आहे. शेतक-यांनी विशेषत: सतर्क राहावे, कापसाचे पिक 45 दिवसाचे असतांना पिकांचे निरीक्षण करावे, बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळल्‍यास त्‍वरित विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील कृषि विस्‍तारकाशी संपर्क करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व प्रा अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी मानले.
मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतक-यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. खरीप पिक परिसंवादात खरीप पिक लागवड व व्‍यवस्‍थापन तसेच शेती पुरक जोडधंदे याविषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञानी निरासरन केले. याप्रसंगी विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारीत दालनासह शेती निविष्‍ठांचे खासगी कंपन्‍या व बचत गटाच्‍या दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही करण्‍यात आले. विद्यापीठ मासिक शेतीभाती खरीप विशेषांक, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध विषयावरील पुस्तिका, घडीपत्रिका आदींची विमोचन करण्‍यात आले. मेळाव्‍यास व कृषि प्रदर्शनीस शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. 
मेळाव्‍यात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आलेले शासन पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी
बीड जिल्‍ह्यातील सौ विद्या रूद्राक्ष (डिघोळअंबा, ता. अंबाजोगाई), व्‍यंकटी गिते (नंदागौळ, ता. परळी), लातुर जिल्‍हयातील शिवाजी कन्‍हेरे (धानोरा, ता. अहमदपुर), दिलीप कुलकर्णी (नागलगाव, ता उदगीर), औरंगाबाद जिल्‍हयातील शिवाजी बनकर (जातेगांव ता. वैजापुर), दत्‍तात्रय फटांगरे (नांदर ता. पैठण), बाळासाहेब जिवरख (धोंदलगाव ता. वैजापुर), उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील मारोती डुकरे, (झळकवाडी, ता. किनवट जि. नांदेड) आदीसह दिवंगत प्रगतशील शेतकरी राजेश चोबे (पानवडोद, ता. सिल्‍लोड जि. औरंगाबाद) यांच्‍या वतीने त्‍यांचे बंधु सचिन चोबे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार स्‍वीकारला.
विद्यापीठ मासिक शेतीभाती खरीप विशेषांकाचे विमोचन करतांना
उपस्थित शेतकरी

खरीप शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना मा. डॉ. नरेन्‍द्र सिंह राठौड
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि प्रदर्शनीत सुधारीत कृषि औजाराची माहिती घेतांना शेतकरी

विद्यापीठ विकसित बियाणे व्रिक्रीचे उदघाटन करतांना