Wednesday, June 20, 2018

वनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

बोंडअळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण व्‍हावा....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा किटकशास्‍त्र विभाग व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने "कापूस, सोयाबीन, तूर हरभरा पिकावरील कीड-रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण सल्ला प्रकल्प" (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक मास्टर ट्रेनर्स यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. 18 19 जुन रोजी संपन्‍न झाला.
प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताने, किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले म्‍हणाले की, खरिप पिकांतील किड व रोगाचा प्रार्दुभाव अचुक सर्वेक्षणाने ओळखुन वेळीच उपाय योजनेबाबत शेतक-यांना कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मार्गदर्शन करावे. कपाशीतील बोंडअळी व्यवस्थापनासाठी किडींचे अचूक सर्वेक्षण विशेष महत्‍व असुन यात कामगंध सापळयांचा प्रभावी वापर करावा. किड व्‍यवस्‍थापनात क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन सर्वांच्‍या सहकार्यातुन महाराष्ट्राचा स्वत:चा पॅटर्न तयार व्‍हावा, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या हंगामात किड - रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा विद्यापीठाचा सल्‍ला शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्‍याचा सल्‍ला दिला.
लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताणे यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाचे बदलेल्‍या स्वरुपाबाबत मार्गदर्शन करून सांगितले की, कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांची कीड रोग सर्वेक्षणात असलेली भुमिका निश्चित केलेली असुन हे काम जबाबदारीने करावे. कीड रोगाचा उद्रेकच होऊ नये म्‍हणुन आपली भुमिका महत्‍वाची आहे.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. प्रशिक्षणात गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन वरील किड व्यवस्थापन, डॉ. अनंत बडगुजर यांनी किडींचे सर्वेक्षण पध्दती, डॉ एस डी बंटेवाड यांनी तुर कीडीचे व्‍यवस्‍थापन तसेच रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ घंटे यांनी मागर्दशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. सदरील प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील जवळपास 200 पेक्षा जास्त कृषि अधिकारी उपस्थित होते.