Monday, July 30, 2018

शेतक-यांना बी.टी. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनाबाबत योग्य मार्गदर्शन करावे....कृषि आयुक्त मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह

गुलाबी बोंडअळीच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या उत्‍तम समन्‍वय ...... कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडा विभागात पिकांवरील कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून परभणी जिल्हयात काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला आहे. त्याअनुगाने गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी कृषि विभाग विद्यापीठाचे कृषि कीटकशास्त्र विभाग यांचेकडून व्यापक स्वरुपात मोहिम राबविल्या जात आहे. यामध्ये शास्त्रज्ञ कृषि विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष गावामध्ये तसेच शेतावर भेटी देऊन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्‍यात येते आहे. दरम्यान जिल्हयातील गुलाबी बोंडअळीच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा. आयुक्त (कृषि) श्री. सचिंद्र प्रताप सिंह, कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी श्री. पी. शिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी श्री. बी. पृथ्वीराज, सहसंचालक श्री. जमदाडे विभागीय कृषि सहसंचालक श्री. जगताप, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 29 जुलै रोजी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाबाबत जिल्हयातील सर्व क्षेत्रीय कर्मचा­यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत परीसरातील प्रक्षेत्रास भेट देऊन सर्वेक्षण कामाचा आढावा मा. कृषि आयुक्त यांनी घेतला. बैठकिस कृषि विभागातील जिल्‍हयातील अधिकारी व कर्मचारी व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उपस्थित होते.
कृषी आयुक्‍त मा. श्री संचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्वानी सतर्क राहून युध्दपातळीवर एकत्रित गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे शेतक­यामध्ये जनजागृती करण्‍याचे निर्देश दिले तर कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी विदयापीठातील शास्त्रज्ञ कृषि विभाग यांच्या मध्ये उत्तम समन्वय असून विदयापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली तसेच या मोहीमेध्ये विद्यापीठांतर्गत असलेले 27 कृषि महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव (रावे) च्या विदयार्थ्यांच्या सहभाग घेण्‍यात येईल.
यावेळी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पुढील प्रमाणाने शेतक­यांनी गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक पध्दतीने व्यवस्थापन तातडीने करण्‍याचे गरज असल्‍याचे सांगितले.
·        सुरुवातीस कीडीच्या संनियंत्रणासाठी कामगंध सापळे हेक्‍टरी पाच मोठया प्रमाणात पतंग एकत्रित गोळा करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात आकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
·        पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
·        कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
·        निंबोळी अर्काची फवारणी करावी.
·        आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी/10 बोंडे/फुले किंवा 8 पतंग/सापळा सलग 3 रात्री दिसून आल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाला आहे हे ग्रहीत धरुन खालीलप्रमाणे किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात. 
फवारणी
किटकनाशक
मात्रा प्रति 10 लि. पाणी

पहिली फवारणी
प्रोफेनोफॉस 50 ईसी
20 मिली
यापैकी कुठलेही एक किटकनाशक
प्रोफेनोफॉस 40 % + सायपरमेथ्रीन 4 % (संयुक्त किटकनाशक)
20 मिली
दुसरी फवारणी
फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी
10 मिली
यापैकी कुठलेही एक किटकनाशक
थायोडीकार्ब 75 डब्लयु पी
20 ग्रॅम
तीसरी फवारणी
डेल्टामेथ्रीन 1 % + ट्रायझोफॉस  35 %  .सी (संयुक्त किटकनाशक)
16 मिली
यापैकी कुठलेही एक किटकनाशक
पॉयरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % ईसी (संयुक्त किटकनाशक)

चौथी फवारणी
क्लोरॅन्ट्रीनीलीप्रोल 9.3 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.6 % झेड सी (संयुक्त किटकनाशक)
5 मिली
यापैकी कुठलेही एक किटकनाशक
इंडाक्झाकार्ब 14.5 % + असीटामाप्रिड 7.7 % एस सी (संयुक्त किटकनाशक)
10 मिली
वरील किटकनाशकाचे प्रमाण पॉवर पंपासाठी 3 पट करावे.

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी वरील प्रमाणे उपाय योजना करुन संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन कृषि विभाग किटकशास्त्र विभाग वनामकृवि, परभणी यांनी केले आहे.