Saturday, August 11, 2018

कापसातील सद्यस्थित दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्ट करा......किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर

वनामकृवि व कृषि विभागाच्‍या वतीने परभणी जिल्‍हयातील विविध गावात राबविण्‍यात येत आहे गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विषेश मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येणारा विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतीवरी उपक्रम, कृषि विभाग व परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रावेच्‍या कृषिकन्‍या यांच्‍या माध्‍यमातुन दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी मानवत तालुक्‍यातील देऊलगांव आवचार, मानोली, कोल्‍हा, झरी आदी ठिकाणी गुलाबी बोंडअळी व्‍यवस्थापन मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, तालुका कृषि अधिकारी श्री. के एस गायकवाड, डॉ अनंत बडगुजर, डॉ एस जी पुरी, डॉ पपिता गौरखेड, कृषी अधिकारी जी आर शिंदे, डॉ एन आर सिरस आदीसह गावातील सरपंच उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर म्‍हणाले की, सद्यस्थितीत निबोंळी अर्क, प्रोफेनेफोस व प्रोफेनेफोस अधिक सायपरमेथ्रिन हे संयुक्‍त किटकनाशकांची फवारणी उपयुक्‍त ठरणार असुन कापसात दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्‍ट करण्‍याचा सल्‍ला दिला. तर डॉ अनंत बडगुजर यांनी कामगंध सापळयाचे महत्‍व सांगुन सामुदायिकरित्‍या सर्व शेतक-यांनी कामगंध सापळे मोठया प्रमाणात लावल्‍यास कमी खर्चात गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनास मोठा हातभार लाभणार आहे. कामगंध सापळयातील लुर वेळोवेळी बदलण्‍याची काळजी शेतक-यांनी घ्‍यावी असे सांगितले. यावेळी काही शेतक-यांच्‍या शेतावरील कापुस पिकाच्‍या प्रक्षेत्राला देण्‍यात येऊन कामगंध सापळे योग्‍य पध्‍दतीने लावण्‍याचे प्रात्‍यक्षिकही दाखविण्‍यात आले.

या व्‍यतीरिक्‍त दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी बायर कंपनी व कृषिदुत यांनी परभणी तालुक्‍यातील सोन्‍ना, उमरी, पिंपळगांव ढगे, मांडाखळी येथे मोहिम राबविली येथे किडकनाशकांची सुरक्षीत फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखवु मार्गदर्शन करण्‍यात आले तसेच एकात्मिक शेती पध्‍दती येथे कार्यरत असलेले कृषिदुतांना डॉ एस डी शिराळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मौजे पारवा येथे ही कार्यक्रम घेतला.

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन व शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विशेष मोहिम 27 कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील पाचशे पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍याचा उद्दीष्‍ट आहे.

या आठवडयाभरात विविध संलग्‍न व घटक महाविद्यालयातील कृषिकन्‍या व कृषीदुतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने विविध ठिकाणी मोहिम राबविण्‍यात आली. यात कै. राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांना कुंभकर्ण टाकळी, नांदापुर, कोक, धर्मापुरी, मोहापुर या ठिकाणी कार्यक्रम घेतला. पाथरी येथील कृषी महाविद्यालयाने सिमुर गव्‍हाण व बोर गव्‍हाण येथे आत्‍मा विभागाच्‍या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कै. अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाने मिरखेल, माखणी, फुलकळस, बलसा, पांढरी या गावात कार्यक्रम घेतला. सेलु येथील कृषी महाविद्यालयाने खुपसा, मोरेश्‍वर, घोडके पिंप्री, वाघ पिंप्री, शिराळा, ताडबोरगांव, निपाणी टाकळी, किन्‍हाळा, भोगांव, पानेरा या गांवात मोहिम राबविली. मरखेल ता. देगलुर जि नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयाने देगलुर तालुक्‍यातील सांगवी, होट्टल, दावनगिर, करखेड, करखेड वाडी, टाकळी, कारेगांव येथे ही विशेष मोहिम राबविली.