Wednesday, September 5, 2018

प्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करावे....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

परभणी कृषि महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
शिक्षकीपेशा हा समाजातील अतिउच्‍च कोटीतील पेशा असुन विद्यार्थ्‍यी घडविण्‍यात महाविद्यालयातील प्राध्‍यापकांचे मोठे योगदान असते. प्राध्‍यापकांनी सदैव विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करावे. असा सल्‍ला कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात दिनांक 5 सप्‍टेबर रोजी आयोजित शिक्षक दिनानिमित्‍त व कृषी पदवीच्‍या प्रथम वर्षात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यासाठीच्‍या उदबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, पालक प्रतिनिधी डॉ अरूण पडघण, डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यांनी वाचन संस्‍कृती जपली पाहिजे. सतत पुस्‍तकांच्‍या सान्निध्‍यात रहा, वाचनामुळे विचारातील प्रगल्‍भता वाढते, व्‍यक्‍तीमत्‍वाला आकार प्राप्‍त होतो. परभणी कृषि महाविद्यालय हे राज्‍यातील सर्वात जुने महाविद्यालय असुन या महाविद्यालयात अनेक चांगले विद्यार्थ्‍यी घडले आहेत, अनेक विद्यार्थ्‍यी शास्‍त्रज्ञ, अधिकारी, शेतकरी, उद्योजक, राजकारणी म्‍हणुन कार्य करित आहेत. देश-विदेशात विविध क्षेत्रात आपले चांगले योगदान देते आहेत.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रत्‍येक संस्‍थेचा विकास हा त्‍या संस्‍थेत कार्यरत असलेल्‍या मनुष्‍यबळामुळे होतो. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी चांगल्‍या व्‍यक्‍तीच्‍या सान्निध्‍यात रहावे. आपला वेळ हा सकारात्‍मक व सर्जनशील बाबीत खर्च करावा.
कार्यक्रमात पालक प्रतिनिधी प्रा डॉ अरूण पडघण, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी तेजस्विनी भद्रे, कृष्‍णा उफाड, रंगोली पडघन आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते 2017-18 शैक्षणिक वर्षात उत्‍कृष्‍ट कामगिरी केलेल्‍या महाविद्यालतील विद्यार्थ्‍यी किरण कदम, रेंजिनी जे एस, नेहा माट्रा, रूपेश बोबडे, पंकज घोडके, शेख अमन, सारिका वरपे, रंगोली पडघण आदींचा सत्‍कार करण्‍यात आला.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, अधिकारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.