Thursday, January 10, 2019

परभणी जिल्ह्रयात कुपोषण व त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांच्या निर्मुलनासाठी शास्त्रोक्त कार्यशाळा संपन्न

वनामकृवितील मानव विकास व अभ्‍यास विभागाने बाल विकासासंबंधी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाबाबत करण्यात आले मार्गदर्शन
परभणी जिल्हा परिषदाच्‍या महिला व बालविकास विभागातील परभणी जिल्हा मानव विकास समिती आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा मानव विकास व अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण निर्मुलनासाठी परभणी जिल्ह्रयातील नऊ तालुक्यातील 2460 जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्त्‍यांसाठी कार्यशाळांचे नुकतेच आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेचे आयोजन परभणी जिल्हा मानव विकास समिती अध्यक्ष  तथा जिल्हाधिकारी मा. पी. शिवा शंकरमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. बी. पी. पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले, यात विद्यापीठातील मानव विकास शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी बाल विकासासंबंधी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कैलास घोडके, नऊ तालुक्यांचे सीडीपीओ शिक्षणाधिकारी यांनी यशस्वीपणे केले.
कार्यशाळां बालकांच्या व प्रौढांच्या वाढांक मूल्यमापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण प्रा. विशाला पटनम यांनी नावीन्यपूर्ण पध्दतींने दिले. या वातावरण निर्मिती करुन प्रशिक्षणार्थींना त्यांना करावयाच्या कार्याविषयी संवेदनशील करण्यात येवून त्यांना वाढांक मूल्यमापनांच्या तंत्रज्ञानाविषयी अवगत करण्यात आले. प्रशिक्षणार्थींचा प्रत्यक्ष सहभागातुन वाढांक मूल्यमापनावर प्रात्याक्षीक, पॉवरपॉईट सादरिकरण, उचित केस स्टडीजचा संदर्भ, तसेच मनोरंजक गोष्टी व उदाहरणे यांचा अवलंब करण्यात आल. जिल्हा परिषद परभणीतर्फे प्रशिक्षणार्थींना याविषयीच्या घडीपत्रिका, इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. प्रा. विशाला पटनम यांनी शास्त्रोक्त बालसंगोपनाबाबत पालकांना जर सजग करावयाचे असेल तर प्रशिक्षणार्थी अंगणवाडी शिक्षिका व जिल्हा परिषद शिक्षकांनी अधिक प्रयत्नशिल राहून त्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन केले. समाजाच्या कल्याणासाठी अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण कार्यशाळांचे आयोजन वारंवार होणे अतिशय आवश्यक असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले.

कार्यशाळेत प्रा. विशाला पटनम यांनी पुढील शास्‍त्रीय बाबींवर दिला भर 
प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतेवेळी गर्भवतीं महिलांनी स्वत:ची व्यवस्थीत काळजी घेतल्यास ती सुदृढ शिशुस जन्म देऊ शकते हे उपस्थितांना पटवून दिले. बालकांच्या आहार, आरोग्य, लसीकरण आदींबाबत योग्य काळजी घेतल्यास जन्मत: शिशुच्या डोक्याचा घेर हा 34-35 से.मी. म्हणजेच प्रौढ व्यक्तीच्या डोक्याच्या घेराच्या तुलनेत 60 टक्के होऊन पुढे 4 वर्षे वयापर्यंत त्यांच्या डोक्याचा घेर हा 49 ते 50 से.मी. (90 टक्के) होतो. पुढील 8 वर्षे वयापर्यंत तो 53 ते 54 से.मी. (96 टक्के) असा वाढतो. तर 8 ते 18 वर्षें वयापर्यंत त्याची उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे काळजी घेतली गेल्यास त्यात केवळ 56-57 से.मी. (4 टक्के) वाढ होते असे प्रा. विशाला पटनम यांनी प्रतिपादीत केले. यामुळेच गर्भावस्थेपासून 8 वर्षांपर्येंत बालकांची सर्वतोपरी काळजी घेतल्यास बालकातील कुपोषण तथा त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांचे निराकरण होऊन त्यांचा उच्चतम सर्वांगीण विकास होतो. भविष्यात अशी बालके यशस्वी व आनंदीपणे आपले जीवन व्यतित करण्यासाठी सक्षम होतात अशी ग्वाही मानव विकास शास्त्रज्ञ प्रा. विशाला पटनम यांनी याप्रसंगी दिली.