Monday, January 7, 2019

गटशेतीमधुन शेतकरी समृध्‍द होईल......विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले

मौजे ब्रम्‍हपुरी ता. पाथरी येथे शेतकरी मेळावा संपन्‍न
कृषि विभाग, महसुल विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांचे संयुक्‍त विद्यमाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पांतर्गत पाथरी तालुक्‍यातील मौजे ब्रम्‍हपुरी दिनांक ७ जानेवारी रोजी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍यास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, तहसिलदार विद्याचरण कडवकर, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, तालुका कृषि अधिकारी प्रभाकरजी बनसावडे, माजी सभापती धोंडिरामजी चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्‍हणाले की, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत लागणारे कृषि तंत्रज्ञानात्‍मक मार्गदर्शन विद्यापीठामार्फत शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यात येईल तर तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी गावाच्‍या विकासा‍साठी नवीन गावठाणातुन शेतरस्‍ते, पाणंद रस्‍ते, जीवनदायीनी नद्यांचे पुनरूज्‍जीवन, शेततळे, ठींबक व तुषार संच, फळबाग योजना आदी बाबींची पुर्तता करण्‍यासाठी सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले. तसेच तालुका कृषि अधिकारी प्रभाकरजी बनसावडे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पाबाबत शेतक-यांना माहिती देतांना सांगितले की या प्रकल्‍पांतर्गत सामुदायीक व वैयक्‍तीक शेततळे, फळबाग, ठिंबक व तुषार संच, विहीर, मोटार, प्रक्रिया उद्योग, गोडाऊन, शेळीमेंढी पालन, कुक्‍कुट पालन आदीचा समावेश असल्‍याचे सांगितले. तसेच मागेल त्‍याला शेततळे आठ दिवसांत मंजुरी देण्‍याचे त्‍यांनी आश्‍वासन दिले. यावेळी मौजे मिर्झापुर (ता परभणी) व असनाळ (जि सोलापुर) या गांवाच्‍या यशोगाथा चित्ररूपांत दाखविण्‍यात आले.
मेळाव्‍यात महसुल विभाग, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ एकाच व्‍यासपीठावरून गावक-यांना सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यांबद्दल गावक-यांनी समाधान व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे केले तर आभार माजी सभापती धोंडिरामजी चव्‍हाण यांनी मानले. मेळाव्‍यास मोठया संख्‍येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी पंचायत समिती सदस्‍य अमोल चव्‍हाण, बाळु चव्‍हाण, साहेबराव राठोड, उपसरपंच सदाशिव चव्‍हाण, महेश चव्‍हाण, राम आळसे, रावसाहेब चव्‍हाण, विद्याभुषण चव्‍हाण आदीसह गावकरी मंडळीनी सहकार्य केले.