महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण यांनी उद् घाटनीय भाषण करतांना |
अध्यक्षीय भाषण करतांना कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील |
विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी संपादित केलेल्या विद्यापीठाच्या स्मरणिकेचे व शास्त्रज्ञांनी लिखीत विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करतांना |
कृषि प्रदर्शनाचे उद्घघाटन करतांना |
पिंगळगड नाला सिंचनस्त्रोत प्रकल्पास मा. ना. श्री पृथ्वीराजजी चव्हाण व इतर मान्यवरां माहिती देतांना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, डॉ मदन पेंडके डॉ उदय खोडके आदी |
राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या कृषि औजारे चाचणी, निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करतांना |
कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्रास मा. ना. श्री पृथ्वीराजजी चव्हाण भेटी प्रसंगी माहिती देतांना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, डॉ ए के गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी |
हवामान बदलाचा विचार करुन कृषि संशोधनाची दिशा ठरविणे आवश्यक
आहे. महाराष्ट्रातील 82 टक्के क्षेत्र कोरडवाहू शेती खाली आहे. सध्याच्या दुष्काळामुळे
शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे, यामुळे कृषि शास्त्रज्ञांनी शास्त्रीय जल
व्यवस्थापनावर संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. शेतक-यांसाठी पाण्याचा ताण सहन
करणा-या पिकांच्या वाणाची निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावे असा सल्ला
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण यांनी उद् घाटनीय
भाषणात राज्यातील कृषि संशोधकांना दिला. महाराष्ट्रातील
चारही कृषि विद्यापीठांची संयुक्त कृषि संशोधन
व विकास समितीची 41 वी बैठक 30 मे ते 1 जुन, 2013 या कालावधीत परभणी येथे महाराष्ट्र
कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
होत आहे. सदरील बैठकीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील होते. महाराष्ट्र कृषी
शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते, आमदार मा. बाबाजानी दुराणी, आमदार मा. सुरेश जेथलिया, तसेच अव्वर मुख्य सचिव (कृषि) डॉ.सुधीरकुमार गोयल, यांच्यासह अकोला येथील
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे, कृषि
परिषदेचे महासंचालक मा.श्री.एन.एच.सावंत, विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ मिन्हांस, जिल्हाधिकारी डॉ शाळीग्राम वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण पुढे म्हणाले
की, केंद्र व राज्य शासन अनेक प्रकल्प शेतक-यांसाठी राबवत आहेत. हवामान आधारीत
कृषि पिक विमा योजना बळकट करण्याचा विचार राज्य शासनाचा आहे. हवामान अंदाजावर
देशात मोठा खर्च होतो, तरी सुध्दा अचूक हवामानाचा अंदाज साध्य करणे शक्य झाले
नाही. राज्याला भविष्यकाळात दुष्काळ मुक्त राज्य करण्यासाठी शासनाचा मानस
आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम शासन हाती घेणार आहे.
तसेच शिरपूर पॅटर्नच्या धरतीवर सिमेंट नाला बंडिंगचे काम मोठ्या प्रमाणात राबविण्यात
येणार आहे. राज्यातील ऊस व कापूस क्षेत्र पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली येणे आवश्यक
आहे, यामुळे पाण्याची बचत होईल व उत्पादनात वाढ होणार आहे. विकेंद्रीत पाणी
साठवण योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या सर्व पार्श्वभूमिवर कृषि
विद्यापीठांना महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे. जगातील पहिल्या 200
विद्यापीठात महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, यामुळे विद्यापीठाने
आपली गुणवता वाढविणे गरजेचे आहे. राज्यातील कृषि विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता
जगाच्या पातळीवर नेणे आवश्यक आहे. विद्यापीठाने मुलभूत संशोधनावर भर द्यावा त्याचा
फायदा निश्चीतच शेतकरीवर्गांना होईल. आज मोबाईल व इंटरनेट तंत्रज्ञानामुळे जगात मोठी
क्रांती झाली आहे. याच प्रकारचे तंत्रज्ञान कृषि क्षेत्रामध्ये निर्माण करावे. दुष्काळामुळे
शेतक-यांचे झालेले नुकसान हे भरून निघणे सोपे नाही. परंतु शेतीच्या व शेतक-यांच्या
शाश्वत विकासासाठी कृषि शास्त्रज्ञांनी कार्य करावे असे प्रतिपादन मुख्यमंत्री
मा. ना. श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील म्हणाले
की, कृषि विद्यापीठ व शेतकरी यांचे जवळचे नाते आहे. विद्यापीठाने मोठे संशोधन
केलेले आहे, परंतु या संशोधनामुळे शेतक-यांचा किती प्रमाणात फायदा झाला याचे ‘परिणाम
विश्लेषण’ करु शकलो नाही. यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापनेचा
शासनाचा विचार चालू आहे. शासनाने राबविलेल्या अनेक योजनामुळे शेतकरी आत्महत्यचे
प्रमाण कमी होत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रगतीशील शेतक-यांशी चर्चा करुन कृषि
विद्यापीठाने कृषि संशोधनाची दिशा ठरवावी. कृषि विद्यापीठाचे पदवीधरांची संख्या
वाढत आहे, परंतु विद्यापीठाने शैक्षणीक गुणवत्ता वाढवली पाहिजे. चारही
विद्यापीठामध्ये साधारणत: 35 ते 40 टक्के कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत, त्या
भरण्यासाठी केंद्रीय भरती मंडळाची स्थापना करण्याचा शासनाचा विचार असून, या
निवड प्रक्रिये मार्फत गुणवतेला प्राधान्य देते येईल. शेतक-यांना आर्थीकदृष्ट्या
सक्षम करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे असे प्रतिपादन मा. ना. श्री
राधाकृष्णजी विखे पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष
मा.ना.श्री.विजयरावजी कोलते आपल्या भाषणात म्हणाले की, देशाचा विकास दर वाढवायचा
असेल तर कृषि क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. आज राज्यामध्ये कृषि
महाविद्यालयांचे व संशोधन केंद्राची संख्या वाढली आहे. चारही कृषि विद्यापीठात
मनुष्यबळाची कमतरता आहे, ही कमतरता भरून काढल्या शिवाय कृषि संशोधनास गती येणार
नाही.
अव्वर मुख्य सचिव (कृषि) डॉ. सुधीरकुमार गोयल आपल्या
भाषणात म्हणाले की, कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत नेण्यासाठी
कृषि विभाग, कृषि विद्यापीठे व शेतक-यांनी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. सध्याच्या
दुष्काळ परिस्थितीमुळे अनेक तांत्रिक प्रश्न आपणास पडत आहेत. शेततळयास अस्तर
असावे की नसावे? माथा ते पायथा की शेततळे व सिमेंट बंधारे या पैकी कोणत्या
गोष्टीवर जास्त भर द्यावा यासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे यांनी
प्रास्तावीकात विद्यापीठाच्या संशोधन कार्याची माहिती दिली व पुढे म्हणाले की, मराठवाडा
कृषि विद्यापीठ लवकरच शेतकरी - शास्त्रज्ञ जत्रा भरवणार असून यामुळे शेतकरी व
शास्त्रज्ञ यांच्यांत सुसंवाद निर्माण होईल. कोणताही विकास हा संशोधनावर आधारीत
असल्यास तो शाश्वत असतो. राष्ट्रीय कृषि विकास योजनेतील निधीपैकी 5 टक्के निधी
हा शिक्षण व संशोधन बळकटीकरणासाठी देण्याचा विचार शासनाने करावा. शासनाच्या
सहकार्यामुळे कृषि विद्यापीठ शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात मोठे कार्य करत
आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सिंचन स्त्रोत विकास प्रकल्पामुळे 600 हेक्टर
पडीत जमीन वहितीखाली येणार आहे, यामुळे विद्यापीठ अधिक सक्षम होईल. 41 वी संयुक्त
कृषि संशोधन व विकास समितीची बैठक घेण्याचा बहुमान विद्यापीठास प्राप्त झाला आहे
याचा मला आनंद वाटतो. या बैठकीच्या निमित्ताने
अमेटी विद्यापीठाचे गुरगांव (हरियाना) येथील संचालक डॉ. पॉल खुराणा यांचे ‘कृषि
विकासासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर’ यावर विचार
मांडणार असून नवी
दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक
महासंचालक डॉ. सी. देवकुमार हे ‘कृषि संशोधनाच्या नविन दिशा’ या विषयावर
प्रकाश टाकणार आहेत. यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थाचे संचालक व
शास्त्रज्ञ त्यांच्या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्मक सादरीकरण करणार असुन
राज्यातील कृषि संशोधकांना मार्गदर्शक ठरणार आहेत असे प्रतिपादन मा. डॉ.
किशनरावजी गोरे यांनी केले आहे.
या बैठकी निमित्त विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी
संपादित केलेल्या विद्यापीठाच्या स्मरणिकेचे
व शास्त्रज्ञांनी लिखीत विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले.
आभार प्रदर्शन संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे यांनी केले,
तर सूत्रसंचालन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव श्री. का. वि. पागिरे उपस्थित
होते. उद् घाटन कार्यक्रमास चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ,
प्राध्यापक, कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
तीन दिवस चालणा-या या बैठकीच्या चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील
साधारणता 300 कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मा.
ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्यात
आलेल्या कृषि औजारे चाचणी, निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन
करण्यात आले. तसेच पिंगळगड नाला सिंचनस्त्रोत प्रकल्प व कृषि माहिती तंत्रज्ञान
केंद्रास मा. ना. श्री पृथ्वीराजजी चव्हाण व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या. या
प्रसंगी भरवण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनाचे उद्घघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले.