वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय
कार्यालयावर विद्यापीठातील आजी - माजी विद्यार्थ्यांनी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मोर्चा
काढला होता, त्या दरम्यान काही मोर्चेकरी विद्यार्थ्यींनी माननीय कुलगुरू
कार्यालयात घुसून माननीय कुलगुरू यांची खुर्ची कार्यालयाच्या बाहेर घेऊन अवमान
केला. माननीय कुलगुरू कामानिमीत्य मुख्यालयाच्या बाहेर गेले असतांना याप्रकारचे
भ्याड व लज्जास्पद कृत्य मोर्चेकरी विद्यार्थ्याकडुन झाले, ही बाब अतिशय
गंभीर असुन गुरू - शिष्याच्या परंपरेला छेद देणारी आहे. याबाबत मराठवाडा कृषि
विद्यापीठ कर्मचारी संघटना व मागासवर्गीय काष्ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा वनामकृवि,
परभणी यांच्या वतीने जाहिर तीव्र निषेध व्यक्त केला असुन संघटना माननीय
कुलगुरूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, भविष्यात अशा घटना घडु नयेत म्हणुन विद्यापीठ
प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निवेदन माननीय कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांना मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा दिलीप मोरे तसेच मागासवर्गीय
काष्ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा वनामकृवि, परभणीचे अध्यक्ष डॉ गिरीधारी वाघमारे
यांनी दिले, यावेळी दोन्ही संघटनेचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Monday, October 16, 2017
Sunday, October 15, 2017
पिक संरक्षणासाठी करा किटकनाशकांचा सुरक्षित वापर
वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे आवाहन
"पिक संरक्षण" हा पिक उत्पादन वाढीसाठी,
आवश्यक असणा-या इतर अनेक घटकापैकी एक अत्यंत महत्वाचा
घटक आहे. पिक संरक्षणासाठी आपण किटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो. पण काही वेळा
किटकनाशके वापरुन ही आपणाला त्याचा अपेक्षीत परिणाम मिळत नाही. कारण कोणत्याही
पीकसंरक्षण शिफारशी कृषि विद्यापीठामध्ये सलग दोन अथवा तीन हंगामात घेतलेल्या
प्रयोगाअंती निष्कर्षीत केलेल्या असतात. ब-याचवेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी
कृषि विभागाने शिफारस केलेल्या किडनाशकाबाबत शेतकरी बांधवांना तसेच किडनाशक
विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची किडनाशके वापरली जातात, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे / रोगाचे योग्य नियंत्रण
होत नाही. त्यासाठी किटकनाशकांच्या योग्य व परिणामकारक वापरासाठी अनेक बाबीकडे
लक्ष दयावे लागते. पण सामान्यत: आपण त्यांकडे दुर्लक्ष करतो. अशा काही बाबी आपण
किटकनाशक वापरताना विचारात घेतल्या पाहिजेत.
(1) योग्य किटकनाशक : संबंधीत
किडीसाठी शिफारस केलेली मानक संस्थेचे (आय.एस.आय.) चिन्ह असलेली जी आपल्या नावाला
जपतात, अशा खात्रीच्या उत्पादकांची व आपल्या माहितीच्या
विक्रेत्याकडूनच किटकनाशके घ्यावीत. किटकनाशके विकत घेताना त्यावरील नोंदणी
क्रमांक, गट (बॅच) क्रमांक,
उत्पादनाचा दिनांक, वापरण्याची मुदत संपल्याचा दिनांक आदीं माहिती
असल्याची खात्री करुनच घ्या व किटकनाशक विक्रेत्याकडून पक्के बिलच घ्या. किटकनाशक
वापरण्याची मुदत व किटकनाशकाच्या प्रतिबाबत काही शंका असल्यास ताबडतोब कृषि
विभागाच्या स्थानिक अधिका-यास भेटावे.
(2) किडीनुसार योग्य किटकनाशक : किडीनुसार योग्य किटकनाशकाची निवड करावी. उदा. रसशोषण
करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशक तर अळयांच्या नियंत्रणासाठी
स्पर्शजन्य / पोटविष वापरावे.
(3) योग्य प्रमाणात : पिक
संरक्षण वेळापत्रकात शिफारस केल्याप्रमाणेच योग्य प्रमाणात किटकनाशकाची मात्रा
वापरावी.
(4) योग्य वेळी : किडीची
वाढ जास्त होवू न देता ती थोडया प्रमाणात व किडनाशकांना चांगला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असतांनाच
त्यांचे नियंत्रण करावे म्हणजे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी वाढली असल्यास
नियंत्रणाचे उपाय योजावेत.
(5) योग्य प्रकारे वापर : रसशोषण करणा-या किडी उदा. मावा, तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजूस राहून अन्नरस
शोषण करतात, या किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशके पानांच्या मागील
बाजूस फवारणे जरुरी असते. तसेच ज्वारीवरील मिजमाशीच्या बाबतीत फक्त कणसावरच
उपायोजना करणे गरजेचे असते.
फवारणीची योग्य पध्दत
फवारणीसाठी योग्य किटकनाशकांची व योग्य फवारणी यंत्राची
निवड करावयास हवी. तसेच फवारणी करतांना काही नैसर्गिक घटकांकडे लक्ष
दयावयास हवे जसे वा-याचा वेग व दिशा.
थेंबाचा आकार - मध्यम
आकाराचे थेंब (100 ते 300 मायक्रॉन) योग्य असतात. यापेक्षा लहान आकाराचे थेंब पडत
असतील तर फवारल्यानंतर पिकावर योग्य ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वा-याने इतरत्र
पडण्याची शक्यता असते. जर थेंबाचा आकार प्रमाणापेक्षा मोठा असेल तर ते पिकांच्या
सर्व भागावर व्यवस्थित पडत नाहीत व त्यामुळे योग्य प्रकारे कीड नियंत्रण होत नाही.
स्वयंचलित फवारणी यंत्र (पॉवर स्प्रे)
असल्यास किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी.
वारा - फवारणी
वा-यांच्या दिशेनेच व जेव्हा वा-याचा वेग प्रति तास 5 कि.मी. पेक्षा कमी असेल तेव्हाच करावी. फवारणी दिवसाच्या
कमी तापमानाच्या वेळी म्हणजेच सकाळी किंवा दुपारनंतर करावी.
किटकनाशकाची वाहतूक व साठवण
1) किटकनाशकाची वाहतूक खाद्यवस्तु, बियाणे, किंवा
प्रवाशांबरोबर करु नये, ती स्वतंत्र्यरित्या किंवा खताबरोबर करावी.
2) किटकनाशके नेहमी काळजीपूर्वक हाताळावीत.
3) किटकनाशके थंड व कोरडया ठिकाणी नेहमी कडी,
कुलुपांत लहान मुलांपासून, पाळीव प्राण्यापासून व राहण्याच्या खोलीत न ठेवता दूर
ठेवावीत.
किटकनाशकाचे रिकामे डबे / बाटल्या
यांची विल्हेवाट
किटकनाशके ही कागदी किंवा जाड पुठठयाचे पॉकेट,
प्लॉस्टीक किंवा धातूचे डबे / बाटल्या यामध्ये उपलब्ध
असतात. किटकनाशके वापरुन झाल्यावर रिकामे डब्बे / बाटल्या यांचा वापर पाणी
पिण्यासाठी अन्नपदार्थ किंवा जनांवराचे खाद्य ठेवण्यासाठी करु नये. तसेच ते
शेतातही इतस्तत: पडू देवू नये. कारण त्यामुळे लहान मुले जनावरे,
पाळीव प्राणी यांना धोका पोहचू शकतो. त्यासाठी अशी
किटकनाशके वापरुन झाल्यावर कागदी पुठठयाचे पॉकेट कापून त्याचे तुकडे करावेत व ते
जमिनीत गाडावे. रिकामे डब्बे / बाटल्या पाण्याने स्वच्छ धूवून त्यांना छिद्रे
पाडून, ठोकून ती
पसरट करावीत व नंतर ती जमिनीत गाडून टाकावीत.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे
घ्यावयाची काळजी
1) गळके फवारणी यंत्र न
वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.
2) किटकनाशक फवारणी यंत्रात
भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाचा वापर करावा.
3) तणनाशक फवारणीसाठी वेगळा
पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये.
4) किटकनाशक वापरतांना
संरक्षक कपडे वापरावेत.
5) फवारणीसाठी वापरलेले
सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत.
6) झिजलेले,
खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.
7) किटकनाशकाला हुंगणे
किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
8) फवारणीचे मिश्रण हाताने
न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.
9) किटकनाशक पोटात जाण्याची
शक्यता असल्यामुळे फवारणीचे मिश्रण करतांना किंवा
फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.
10) फवारणीचे काम पुर्ण
झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धूवून खाणे पिणे करावे.
11) फवारणीच्या वेळी लहान
मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या
ठिकाणापासून दूर ठेवावे.
12) उपाशी पोटी फवारणी न
करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.
13) फवारणी करतांना वापरलेली
भांडी इ. साहित्य नदी ओढे किंवा विहीरीजवळ धूवू नयेत. तर धूतांना वापरलेले पाणी त्यात
विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावे अथवा मातीत गाडावे.
14) किटकनाशकांच्या रिकाम्या
बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात.
15) फवारणी करतांना नोझल बंद
पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये किंवा हवा
तोडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार,काडी किंवा टाचणी वापरावी.
16) किटकनाशके फवारण्याचे
काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये. हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने
ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे.
17) किटकनाशके फवारण्याचे
काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धूवून काढावेत.
18) किटकनाशके अंगावर पडू
नयेत म्हणून वा-याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.
19) किटकनाशके मारलेल्या
क्षेत्रावर गुरांना चरण्यास कमीत कमी दोन आठवडे जावू देवू नये.
20) जमिनीवर सांडलेले
किटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती / चिखल यांच्या सहाय्याने
शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत.
21) डब्यावरील मार्गदर्शक
चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे. लाल रंगाचे चिन्ह / खून असलेली औषधी सर्वात
अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो.
किटकनाशकांचे विषारीपणाचे वर्गवारी
किटकनाशकांच्या विषारीपणाचे
मोजमाप एल डी 50 मध्ये केले जाते व ते मिली ग्रॅम / किलो शरीराचे वजन या एककामध्ये
दर्शविले जाते. रसायनांचा एल डी 50 काढण्यासाठी सर्वसाधारणपणे उंदीर, घुस, ससा,
डुक्कर आदी प्राण्यांवर प्रयोग केले जातात.
लाल - मोनोक्रोटोफॉस 36 टक्के,
डायक्लोरोवॉस 36 टक्के ई.सी, मिथोमिल 40 टक्के एस. पी., मिथिलपॅराथीऑन 2 टक्के
डी.पी, मिथिलपॅराथीऑन 50 टक्के ई.सी, फोरेट 10 सी जी.
पिवळा - ॲसिटामाप्रिड
20 टक्के एस पी, ,क्लोरोपारीफॉस 20 टक्के ई.सी, इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के ई.सी,
फीप्रोनिल 5 टक्के एस सी., इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के एस एल, लॅम्बडा सायलोथ्रीन 5
टक्के ई.सी, प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी, क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी ट्रायझोफॉस 40
टक्के ई.सी,
निळा - ॲसिफेट
15 टक्के एस.पी, डायफेन्थुरॉन 50 टक्के डब्ल्यु पी, डायनोटेफयुरॉन 20 टक्के एस
जी., फलोनिकॅमीड 50 टक्के डब्लयु जी.
हिरवा - बुप्रोफेझीन
25 टक्के एस सी, क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस सी, क्लोरॅनट्रानीलीप्रोल 0.4
टक्के जी आर
सौजन्य
विभाग
प्रमुख, कृषि
किटकशास्त्र विभाग, वनामकृवि,
परभणी
दुरध्वनी
क्रमांक 02452 228235
Tuesday, October 10, 2017
वनामकृवित मृदशास्त्रज्ञाचे राज्यस्तरीय परिसंवादाचा समारोप
भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने 7 व 8 ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मृद
शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, या परिसंवादाचा समारोप
दिनांक 8 ऑक्टोबर रोजी
झाला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा.
डॉ. बी. व्यंकटेश्वरलू हे
होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, राज्यातील चारही कृषि
विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए. बी कडलग,
डॉ. के. डी.
पाटील, डॉ. विलास खर्चे व डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.
महेश देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात कु.
निहाला जबीन
या विद्यार्थीनीला युवा शास्त्रज्ञ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तसेच उत्कृष्ट भित्तीपत्रक
सादरीकरणाचा पुरस्कार डॉ. नंदकीशोर मेश्राम यांना देण्यात आला तसेच सहभागी शास्त्रज्ञांना प्रमाणपत्र
देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरुल म्हणाले
की, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधनाच्या माध्यमातुन राज्यातील जमिनीची विभागवार पृथ:करण करून सुपीकता दर्शक नकाशे तयार करावेत. परिसंवादातील सहभागामुळे विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक गुणवत्ता वाढीस मदत होते. मृद विज्ञान विषयात संशोधनावर आधारित लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
सदरिल दोन परिसंवादाच्या तांत्रिक सत्रात बदलत्या गरजेनुसार जमिन
व पिकांचे शाश्वत आरोग्य या विषयावरील संशोधनावर सखोल चर्चा
करण्यात आली. तांत्रिक सत्रातील शिफारसी सादर करण्यात आल्या असुन याचा भविष्यात उद्योग व कृषि विकास यांना सुसंग तसेच जमिन व्यवस्थापन संबधीचे धोरण
निश्चित करण्यास मदत होणार आहे.
परिसंवादास राज्यातील
चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे 200
शास्त्रज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सय्यद ईस्माईल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. परिसंवादाच्या याशस्वीतेसाठी डॉ. महेश देशमुख, सचिव डॉ. गणेश गायकवाड, उपसचिव तसेच डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. अनिल मोरे, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. एस. टी. शिराळे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव अडकिने, संतोष पिल्लेवाड, श्रीमती महावलकर, अजय चरकपल्ली व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रमपुर्ण प्रयत्न केले. पुढील वर्षी भारतीय मृद विज्ञान संस्थाच्या वतीने राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात होणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सय्यद ईस्माईल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. परिसंवादाच्या याशस्वीतेसाठी डॉ. महेश देशमुख, सचिव डॉ. गणेश गायकवाड, उपसचिव तसेच डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. अनिल मोरे, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. एस. टी. शिराळे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव अडकिने, संतोष पिल्लेवाड, श्रीमती महावलकर, अजय चरकपल्ली व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रमपुर्ण प्रयत्न केले. पुढील वर्षी भारतीय मृद विज्ञान संस्थाच्या वतीने राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात होणार आहे.