Pages

Friday, December 29, 2017

वनामकृवित महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामाजिक विज्ञान महाविद्यालय तसेच ठ शेतकरी महीला  कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उदघाटन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा श्रीमती उज्‍वलाताई राठोड यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत तसेच परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर हया प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास परभणी लोकसभा संसद सदस्‍य खासदार मा. श्री संजय जाधव, विधानपरिषद सदस्‍य आमदार मा. श्री सतीश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य आमदार मा. श्री विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य आमदार मा श्री अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य आमदार मा. श्री रामराव वडकुते, परभणी विधानसभा सदस्‍य आमदार मा डॉ राहुल पाटील, जिंतुर विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य आमदार मा. डॉ मधुसुदन केंद्रे, पाथरी विधानसभा सदस्‍य आमदार मा. श्री मोहन फड आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्‍यात भांडगाव (ता. दौंड जि. पुणे) येथील अंबिका महिला औद्यागिक सहकारी संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा मा श्रीमती कमलताई परदेशी व गोलापांगरी (ता. जि. जालना) येथील प्रगतशिल महिला शेतकरी मा. श्रीमती छायाताई मोरे या विशेष मार्गदर्शन करणार आहे. तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध विषयावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी महिला, शेतकरी बांधव व कृषि उद्योजकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. एच. एल. सरंबेकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी. आर. शिंदे व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले.

वातावरणातील तापमान वाढीत तग धरण्‍याची क्षमता देशी गोवंशात......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित सकाळ वाचक महोत्‍सव अंतर्गत देशी गोवंशाचे महत्‍व या विषयावर व्‍याख्‍यान

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व सकाळ माध्‍यम समुहाच्‍या वतीने सकाळ वाचक महोत्‍सव अंतर्गत दिनांक 29 डिसेंबर रोजी विद्यापीठात देशी गोवंशाचे महत्‍व या विषयावर पशु वैद्यकिय व पशु विज्ञान महाविद्यालयाचे जेष्‍ठ पशुतज्ञ तथा विभाग प्रमुख (पशु प्रजनन) डॉ नितीन मार्कडेय यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, सकाळ समुहाचे श्री कुणाल मांडे, प्रगतशील पशुपदौसकार श्री एकनाथराव साळवे, श्री रामेश्‍वर मांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, हवामान बदलाचा परिणाम शेती व पशु वर होत असुन तापमान वाढीमुळे दुध उत्‍पादनावरही मोठा परिणाम होत आहे. मराठवाडयातील देवणी व लाल कंधारी देशी गोवंश वातावरणातील तापमान वाढीस सहनशील असुन शाश्‍वत दुध उत्‍पादन व प्रजोत्‍पादन क्षमता त्‍यात आहे. त्‍यामुळे या प्रजातीचे सवंर्धन व संगोपन करणे गरजेचे आहे. या देशी गोवंशच्‍या शुध्‍द पैदासीतुन भविष्‍यात पशुपालकामध्‍ये आर्थिक स्‍थेर्य प्राप्‍त होऊ शकते.
डॉ नितीन मार्कडेय आपल्‍या व्‍याख्‍यानात म्‍हणाले की, देशी गोवंशाच्‍या दुधातील प्रथिनांमध्‍ये अनेक आरोग्‍यवर्धक गुणधर्म असुन बालकांचा बुध्‍दांक वाढ होते. देशी गोवंश शुध्‍दतेसाठी सर्वांना प्रयत्‍न करावे लागतील. अनेक पशुपालक हे संशोधक वृत्‍तीने गोवंशाची जोपासना करतात. या पशुपालकांना प्रोत्‍साहन देण्‍याची गरज आहे. देशी गोवंशाच्‍या गायीचे गोमुत्र व शेणास आयुर्वेदात औषधी महत्‍व असुन गायीचा चिक ही आरोग्‍य रक्षक आहे. गायीचे गर्भजलात बीजवणक्षमता असते, त्‍यामुळे जखम भरून येण्‍यासाठी मदत होऊ शकते तसेच देशी गायीच्‍या झारातील स्‍टेम सेलचा वापर अनेक आजारावर उपचार करण्‍यासाठी होऊ शकतो. अध्‍यात्‍ममध्‍ये देशी गायीचे महत्‍व अधोरेखित आहेच परंतु आपणास देशी गायीकडे वैज्ञानिक दृष्‍टीकोनातुन पाहावे लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
देशी गोवंशाबाबत जनजागृती होणे आवश्‍यक असल्‍याचे मत प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशीत झालेल्‍या देशी गोवंश या पुस्‍तकाची प्रत भेट म्‍हणुन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी माननीय कुलगुरू यांना दिली. पुस्‍तकाच्‍या लेखनात डॉ नितीन मार्कडेय, श्री अमित गद्रे, डॉ बाबासाहेब ठोंबरे यांचा सहभाग असुन अल्‍पावधीतच सदरिल पुस्‍तकाची चौथी आवृत्‍ती प्रकाशित झाली आहे.  
कार्यक्रमाचे प्रास्‍तविक डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आनंद शिंदे यांनी केले तर आभार डॉ शंकर नरवाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ दत्‍ता बैनवाड, प्रा नरेंद्र काबळे, विजय सावंत, सुभाष जगताप, माधव मस्‍के आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पशुपालक, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Saturday, December 16, 2017

हवामान बदलाच्या आव्हानास तोंड देण्यासाठी संशोधनास बळकटी देण्याची गरज.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्राचा समारोप
अध्‍यक्षीय समारोप करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे, भविष्‍यात येणा-या आव्‍हानाना तोंड देण्‍यासाठी हवामान बदलावरील संशोधनास बळकटी देण्‍यासाठी राज्‍यात स्‍वंतत्र संशोधन केंद्राची गरज आहे, असे मत कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आले होते, चर्चासत्राचा समारोपात (दिनांक १४ डिसेंबर रोजी) अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राहुरी येथील हात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे डॉ एस भास्‍कर, वाल्मीचे महासंचालक मा. श्री. एच. के. गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी स्‍वत: संशोधक असुन बदलत्‍या हवामानात स्‍वत:चे तंत्र विकसित करून शेतीत चांगले उत्‍पादन घेत आहेत, या संशोधक शेतक-यांच्‍या नवतंत्रज्ञानास प्रोत्‍साहन देण्‍याची गरज आहे, यासाठी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाने शासनाच्‍या मदतीने स्‍वतंत्र निधी उभारून त्‍यांच्‍या संशोधनास चालना द्यावी लागेल. राज्‍यात तालुकास्‍तरावर स्‍वतंत्र स्‍वयंचलित हवामान केंद्र स्‍थापन करावी लागतील. शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सुक्ष्‍म सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तसेच किड – रोग प्रादुर्भावाबाबत अचुक पुर्वानुमान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लाग‍तील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, सदरिल आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्रात देशविदेशातील हवामान बदलाशी संबंधीत ७२ सर्वात्‍कृष्‍ट शास्‍त्रज्ञांनी आपले संशोधनाचे सादरिकरण केले. या चर्चासत्रातील शिफारसी राज्‍यासाठी हवामान बदलाबाबत लघुकालीन, मध्‍यम कालीन व दिर्घकालीन धोरण ठरविण्‍यास मार्गदर्शक ठरणार आहे.
कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, हवामान बदलाचा कोकणातील सागरी किनारावरील शेती मोठा परिणाम होत असुन जमिनीची धुप थांबविण्‍यासाठी त्‍वरित उपाय योजना करणे गरजेचे आहे.  
सदरिल आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्रात प्राप्‍त ज्ञान युवा कृषि शास्‍त्रज्ञांना संशोधन करतांना दिशादर्शक ठरेल, असे मत माजी कुलगुरू मा. डॉ एस एन पुरी यांनी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले तर आभार डॉ ए एस गरूडकर यांनी मानले.
कार्यक्रमात बदलत्‍या हवामानात स्‍वत:च्‍या तंत्राच्‍या आधारे यशस्‍वी शेती करणारे शेतकरी उस्‍मानाबाद येथील शिवाजी नवगिरे, जळगांव येथील प्रतापराव देशमुख व अकोला येथील गणेश नानोटे यांना क्लॉमेट स्‍मार्ट शेतकरी पुरस्‍कार देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्‍माननीत करण्‍यात आले तसेच विविध संशोधनात्‍मक विषयावरील उत्‍कृष्‍ट भितीपत्रकासाठी शास्‍त्रज्ञांना सन्‍मानित करण्‍यात आले.
तीन दिवसीय चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञासह सुमारे ८०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. एकुण बारा विविध विषयावरील तांत्रिक सत्रात देशविदेशातील ७२ सर्वात्‍कृष्‍ट शास्‍त्रज्ञांनी आपले संशोधनात्‍मक सादरिकरण केले. चर्चासत्राचे संयोजक वनामकृविचे संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होत तर सहसंयोजक मफुकृवि, राहुरीचे डॉ. सुनिल गोरंटीवार व वाल्मी औरंगाबादचे डॉ. अविनाश गरुडकर होत तसेच आयोजन सचिव मुख्यशास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार होते. चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान व अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हया होते. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक होते.
बारूळ (ता. तुळजापुर जि. उस्‍मानाबाद) येथील शिवाजी नवगिरे यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते कलॉमेट स्‍मार्ट शेतकरी पुरस्‍कारांने सन्‍मा‍ननित करतांना

Friday, December 15, 2017

मानव व पशुचे आरोग्‍य हे जमिनीच्‍या आरोग्‍यावरच अवलंबुन....अमेरिकेतील ओहीओ स्‍टेट विद्यापीठ अमेरिकचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ रतन लाल

जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्रात प्रतिपादन
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात असुन चर्चासत्रात दिनांक १४ डिसेंबर रोजी अमेरिकेतील ओहीओ स्‍टेट विद्यापीठ अमेरिकचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ रतन लाल यांचे हवामान बदल व शेती यावर विशेष व्‍याख्‍यान झाले. सदरिल तांत्रिक सत्राचे अध्‍यक्ष इजिप्‍तचे कृषि शास्‍त्रज्ञ डॉ अदेल अल बेलतागी हे होते तर उपाध्‍यक्ष माजी कुलगुरू डॉ एम सी वरश्‍नीय हे होते तसेच डॉ सय्यद ईस्‍माईल व डॉ आर एन काटकर यांनी सत्र संकलक म्‍हणुन काम पाहिले.
यावेळी मा. डॉ रतन लाल म्‍हणाले की, जमिन ही सजीव आहे, त्‍यात अनेक सुक्ष्‍मजीव व जंतु असतात. वातावरणातील वाढते तापमान तसेच किटकनाशके, रासायनिक खते, मशागत आदींच्‍या अतिरेकामुळे जमिनीचा जीवंतपणा कमी होऊन जमिन र्निजीव होत आहे. जर जमीनीचे आरोग्‍य बिघडले तर मानव व प्राणी मात्राचे देखिल आरोग्‍यावर ही विपरित परिणाम होणार आहे. जमिन जीवंत ठेवण्‍यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, यासाठी पिकांचे अवशेष महत्‍वाची भुमिका बजावु शकते. शेतक-यांनी पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत पुर्नवापर करावा. भारतातील जमिनीत सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी होत असुन यामुळे पिक उत्‍पादनात शाश्‍वतता टिकविणे कठिण होणार आहे. जमिनीस केवळ नत्र, स्‍फुरत व पालाश पुरविण फायदयाचे नसुन शाश्‍वत उत्‍पादनासाठी सेंद्रिय कर्ब अत्‍यंत आवश्‍यक आहे. भारतातील वाढत्‍या लोकसंख्‍येकरिता अन्‍नसुरक्षेसाठी जमिनीचे आरोग्‍य टिकविणे गरजेचे आहे. देशात शहरीकरणासाठी घरे बांधण्‍यासाठी विटांचा वाढता वापर ही चिंता विषय झाला असुन विट तयार करण्‍यासाठी सुपिक मातीचा वापर होत आहे, हे थांबविणे गरजेचे आहे. शेती करता माती व पाणी यांचा काटेकार वापर करून हवामान बदलाचे परिणाम कमी करता येऊ शकते. जमिनीवर वृक्षांची लागवड करणे, शेतात वापरण्‍यात येणा-या विविध निविष्‍ठांची कार्यक्षमता वाढविणे व सेंद्रिय घटकांचा नियमित वापर करणे अत्‍यंत गरजचे आहे. यासर्व बाबींची माहिती देशातील नियोजन करणा-या यंत्रणेला अवगत करण्‍याची गरज असुन यासाठी धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची वेळ आली आहे, असे मत जागतिक र्कीतीचे शास्‍त्रज्ञ डॉ रतन लाल यांनी व्‍यक्‍त केले.
तीन दिवसीय चर्चासत्रात दिनांक 14 रोजी विविध विषयावर चार तांत्रिक सत्र संपन्‍न झाली, यात जागतिक स्‍तरावरील कृषि शास्‍त्रज्ञ ऑस्‍ट्रेलियाचे डॉ जॉन डिक्‍सन, इजिप्‍तचे डॉ अदेल अल बेलतागी, स्वित्‍झर्लंडचे डॉ शिवकुमार, मुंबईचे डॉ सुरेश कुलकर्णी, नवी दिल्‍ली येथील डॉ एम सी सक्‍सेना, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे डॉ के व्‍ही प्रभु, महकोचे डॉ भारत चार, डॉ कुलदिप सिंग आदींची सादरिकरण झाले. दिनांक 15 रोजी पाच तांत्रिक सत्र पार पडली यात डुपॉन्‍टचे डॉ अमित मोंहती, बारामती येथील डॉ जगदीश राणे, हैद्राबाद येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्‍ही प्रविण राव, जैन इरिगेशचे डॉ सोमनाथ जाधव, ऑस्‍ट्रेलीयाचे डॉ कार्ल डामीन, नार्म हैद्राबादचे संचालक डॉ श्रीनिवास राव, जोधपुर येथील डॉ ओ पी यादव आदीचे विविध विषयावर सादरीकरण झाले. तसेच राज्‍यातील स्‍वत:चे नवतंत्रज्ञानाच्‍या आधारे बदलत्‍या हवामानास यशस्‍वी तोंड देऊन शेती व शेतीपुरक जोडधंद्यात शाश्‍वत उत्‍पादन घेत असणा-या शेतक-यांनी ही उपस्थित शास्‍त्रज्ञ समोर सादरिकरण केले. 

हैद्राबाद येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्‍ही प्रविण राव आपल्‍या सादरिकरणात तेलगंणा राज्‍यात सुक्ष्‍मसिंचनामुळे मोठया प्रमाणात शेती सिंचनाखाली येऊन शेतक-यांचे उत्‍पादनात भरीव वाढ झाल्‍याचे दाखवुन दिले तसेच देशातील शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी सुक्ष्‍मसिंचनाचा आधार घ्‍यावा लागेल असे प्रतिपादन केले.  

सदरिल चर्चासत्राचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे यजमानपद आहे. चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञासह सुमारे ८०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.

चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान व अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हया आहेत. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

Thursday, December 14, 2017

जागतिक हवामान बदलाचा कृषि क्षेत्रावर होणा-या परिणामानाचा पुर्व अनुमान काढुन योग्‍य उपाययोजना करणे गरजेचे......निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद

जागतिक हवामान बदल  त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणार परिणाम यावरील आंतरराष्‍ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन


मार्गदर्शन करतांना निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद 

औरंगाबाद :
हवामान बदलाचा परिणाम कमी करण्‍यासाठी बदलत्‍या हवामानाचा पुर्व अनुमान काढुन वेळीच योग्‍य उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्‍यामुळे परिणामाची दाहकता कमी करता येईल. हवामान बदल हा जागतिक प्रश्‍न आहे, असे न मानता सर्वसामन्‍याचे जीवनमानाशी संबंधित आहे, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद यांनी मांडले.  

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषि आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चासञ दि. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत वाल्मी औरंगाबाद येथे आयोजीत करण्यात आले. सदरिल चर्चासत्राच्‍या उदघाटनाप्रसंगी दिनांक १४ डिसेंबर रोजी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महा‍संचालक पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा, इजिप्‍तचे कृषि तज्ञ डॉ अदेल बेलत्‍यागी, ऑस्‍ट्रेलियाचे कृषि शास्‍त्रज्ञ डॉ जॉन डिक्‍सन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु, महिकोचे अध्यक्ष श्री. राजु बारवाले, राहुरी येथील हात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास भाले, पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक श्री के एम नागरगोजे, औरंगाबाद येथील वाल्मीचे महासंचालक मा. श्री. एच. के. गोसावी, संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. अविनाश गरुडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. रमेश चंद पुढे म्‍हणाले की, वातावरणातील हानीकारक वायुचे होणारे प्रसरण कमी करणे, सौर ऊर्जाचा वापर वाढविणे, वातावरणातील कार्बनचे संतुलन राखणे गरजेचे आहे. यासाठी देशातील हरित क्षेत्र वाढवावे लागेल. वृक्षलागवडीवर भर देऊन वृक्ष तोडीला बंधने घालावी लागतील. देशातील नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा वापर कार्यक्षमरित्‍या झाला पाहिजे. विशेषत: देशात पडणा-या पावसाच्‍या पाण्‍याचे योग्‍यरित्‍या संवर्धन व वापर करावा लागेल. शेतीतील  पिकांचे अवशेष जाळल्‍यामुळे मोठया प्रमाणावर वातावरणावर परिणाम होत आहे, याबाबत शेतक-यांमध्‍ये जाणिव जागृती करण्‍याची गरज आहे. शेतक-यांचे पारंपारिक ज्ञान ही हवामान बदलावर मात करण्‍यासाठी आपणास उपयुक्‍त पडु शकते, यावर सखोल संशोधन कृषि शास्त्रज्ञांनी करावे, असे मत निती आयोगाचे सदस्‍य मा. डॉ. रमेश चंद यांनी मांडले.  
अध्‍यक्षीय भाषणात पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा म्‍हणाले की, वाढत्‍या लोकसंख्‍येस अन्‍नधान्‍याची वाढती गरज, वाढता औद्योगिक विकास यासर्व बाबींचा हवामान बदलाशी संबंध आहे यावर अधिक संशोधनाची गरज आहे. औद्योगिक विकासावर अधिक भर देतांना आपण नैसर्गिक संतुलन दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामान बदलाचराष्ट्रीय अन्नसुरक्षेवर मोठा परिणाम होणार आहे. हवामान बदलाचा कृषि पाणी क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस, पुर परिस्थिती, गारपीट, उष्णतेची लाट तसेच पावसाचे खंड हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्याचा अल्पभुधारक शेतक-यांच्या कृषि उत्पादनावर व पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. नैसर्गिक साधनसामग्री जसे जमीन, पाणी वातावरण यांचाहास होऊन कृषि उत्पादनात घट होत असल्याचे दिसुन येत आहे. पिकांवरील किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवामान बदलामुळे होणा-या तापमानातील वाढ मुळे पिक पक्‍वतेवर मोठा परिणाम होणार असुन पिकांचा कालावधी कमी होईल. देशातील गहु, भात, सुर्यफुल आदी पिके तापमानास अधिक संवेदनशील असुन त्‍याचा उत्‍पादनावर परिणाम होत आहे. हवामान अनुकुल कृषि तंत्रज्ञानाच्‍या विकासासाठी कृषि संशोधनावर अधिक गुंतवणुक करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.  
यावेळी ऑस्‍ट्रलियाचे शास्‍त्रज्ञ डॉ जॉन डिक्‍सन, इजिप्‍तचे शास्‍त्रज्ञ डॉ अदेल बेलत्‍यागी व महिकोचे अध्यक्ष श्री. राजु बारवाले यांनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
स्‍वागतपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी चर्चासत्र आयोजनाची पार्श्‍वभुमी विषद करून चर्चासत्रातील शिफारसींचा देश व राज्‍यातील कृषि धोरण निश्चित करतांना मार्गदर्शक ठरतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिल गोरंटीवार यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले.
कार्यक्रमात राज्‍यातील चार ही कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍यातील 278 तालुक्‍याचा गेल्‍या तीस वर्षाचा हवामानाचा अभ्‍यास करून अॅग्रो क्‍लॉयमेटिक अॅटलास ऑफ महाराष्‍ट्र तयार करण्‍यात आला असुन याचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल अॅटलास तालुकास्‍तरिय पिक नियोजन व लागवडीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सदरिल चर्चासत्राचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे यजमानपद असुन चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील नामवंत शास्त्रज्ञ सहभागी झाले असुन   ते विविध विषयावर मार्गदर्शकरणार आहेत. देशविदेशातुन सुमारे ८०० हुन अधिक संशोधनपर निबंध प्राप्त झाले असुन ६०० हुन अधिक शास्‍त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणा-या चर्चासत्राप्रामुख्याने हवामान बदल, कृषि क्षेत्रावर होणारे परिणाम, जल क्षेत्रावर होणारे परिणाम, मत्स्य पशु यावर होणारे परिणाम तसेच अल्पभुधारक शेतक-यांची हवामान बदलावर मात करण्याची उपाययोजना आदी विषयावर आठ वेगवेगळया सत्रात विविध संशोधनपर निबंधाचे सादरीकरण होणार आहे. सदरिल विविध विषयावर विचारमंथन होणार असुन हवामान बदलावर मात करून कृषि क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध नवनवीन तंञज्ञानाचा वापर करण्यासंबधी उपाययोजना सुचविल्या जातील त्याचा फायदा विविध शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक तसेच पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी होणार आहे. वाल्मी येथील संस्थेत तांत्रिक सत्राबरोबर हवामान बदलावर आधारीत उपकरणे, साहित्यविविध पुस्तकांचे तसेच अनेक कंपन्याचे दालन असलेले प्रदर्शनाचे उदघाटनही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
चर्चासत्राचे संयोजक वनामकृविचे संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे असुन सहसंयोजक मफुकृविराहुरीचे डॉ. सुनिल गोरंटीवार व वाल्मी औरंगाबादचे डॉ. अविनाश गरुडकर आहेत तसेच आयोजन सचिव मुख्यशास्त्रज्ञ डॉ. भगवान आसेवार हे आहेत. 
चर्चासत्राचे सहआयोजक महिको, जालना असुन सहभागी संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, जैन इरीगेशन, जळगांव, भारतीय स्टेट बँक, महाबीज, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, टास नवी दिल्ली, विज्ञान अभियांत्रिकी मंडळ, नवी दिल्ली हया आहेत. अनेक खाजगी कंपन्या आणि विविध संस्था या चर्चासत्राचे प्रायोजक आहेत.

मार्गदर्शन करतांना नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महा‍संचालक पदमभुषण मा. डॉ. आर. एस. परोडा