Pages

Monday, December 31, 2018

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील पैठण रोड वरील कृषि विज्ञान केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल मेळाव्‍याचे उदघाटन औरंगाबाद जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. अॅड श्रीमती देवयानीताई डोणगांवकर यांच्‍या हस्‍ते होणार असुन प्रमुख अतिथी म्‍हणुन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती पवनीत कौर या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार असुन कोल्‍हापुर येथील स्‍वंयमसिध्‍दा संस्‍थेच्‍या संचालिका मा. श्रीमती कांचनताई परूळेकर या विशेष मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ महिला शेतक-यांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त महिला शेतकरी व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री टी एस मोटे, कार्यक्रम समन्‍वयक प्रा दिप्‍ती पाटगांवकर आदींनी केले आहे.

वनामकृविसाठी २०१८ वर्ष ठरले महत्वपुर्ण

विद्यापीठ अधिस्‍वीकृती, कापसाचा नांदेड-४४ वाण बीटीत परावर्तीत, देशातील पहिला जैवसमृध्‍द ज्‍वारीचा वाण परभणी शक्‍ती, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबतची विस्‍तार मोहिम आदी यावर्षातील महत्‍वाच्‍या घडामोडी  
********************************************************
२०१८ वर्ष हे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने एक महत्वपुर्ण वर्ष ठरले आहे. कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तीनही क्षेत्रात अनेक घडामोडी झाल्‍या. शेतकरी, विद्यार्थ्‍यी व सामान्‍य नागरिकांचा विचार करता, या वर्षातील काही महत्‍वाच्‍या बाबीं आपण पाहु.
कृषि शिक्षण
भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठास पुढील पाच वर्षाकरिता दिलेली अधिस्‍वीकृती ही विद्यापीठातील शिक्षण क्षेत्रातील महत्‍वाची उपलब्‍धी आहे. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेची राष्‍ट्रीय कृषि शिक्षण अधिस्‍वीकृती मंडळाच्‍या २२ व्‍या बैठकीत हा निर्णय झाला. विद्यापीठास शै‍क्षणिक दर्जाच्‍या आधारे एकुण ४ पैकी २.७७ मिळाले असुन विद्यापीठाने ‘’ दर्जा प्राप्‍त केला आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी, लातुर, बदनापुर, गोळेगाव, उस्‍मानाबाद व अंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली आहे. या महाविद्यालयातील सर्व पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्या अधिस्‍वीकृ‍तीस मान्‍यता देण्‍यात आली आहे. ही गोष्‍ट विद्यापीठाच्‍या भावी शैक्षणिक कार्यासाठी एक संजीवणीच ठरेल. यावर्षीच्‍या दिक्षांत समारंभात ३३७६ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले असुन येणा-या काळात या प्रशिक्षित मनुष्‍यबळाचे योगदान कृषि विकासात मोलाचे ठरणार आहे. संपुर्ण वर्षभरात विद्यापीठातील नियमित शैक्षणिक कार्यासोबतच क्रीडास्‍पर्धा, सां‍स्‍कृतिक कार्यक्रम व विविध मान्‍यवरांची व्‍याख्‍याने महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींचे व्‍यक्‍तीमत्‍व घडविण्‍यात फलदायी ठरले. यात देशाचे प्रसिध्‍द विधिज्ञ पदमश्री मा. अॅड उज्‍ज्‍वल निकम यांचे व्याख्‍यान अविस्‍मरणीयच होते.  
कृषि संशोधन
विद्यापीठाच्‍या कृषि संशोधनाचा विचार करता, मराठवाडयातील शेतक-यांचे सोयाबीन, कापुस, ज्‍वारी व तुर हे मुख्‍य पिके आहेत. सोयाबीन व तुर या पिकांमध्‍ये यापुर्वीच विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांच्‍या शेतात चांगल्‍या प्रकारे स्थिरावली आहेत, या मुख्‍यत: सोयाबीन मधील एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-१६२ याचा तर तुर पिकातील बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, बीडीएन-७११ आदींचा उल्‍लेख करावा लागेल. मराठवाडयातील शेतक-यांचे पांढरे सोने म्हणचेच नगदी पिक कापुस, या पिकातही विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने ऐतिहासिक गोष्‍ट ठरली, ती म्‍हणजे विद्यापीठाचा नांदेड-४४ (एनएचएच-४४हा संकरित वाण बीटी वाणात परावर्तीत करण्‍यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे मराठवाडा व राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला, गेल्‍या चार वर्षात हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात येऊन यशस्‍वी प्रक्षेत्र चाचण्‍यात घेण्‍यात आल्‍या. पुढील हंगामात तो मर्यादित स्‍वरूपात महाबीजच्‍या माध्‍यमातुन विक्रीसाठी उपलब्ध होणार असुन अनेक दिवसापासुन शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी पुर्ण होऊ शकली, असा सार्थ अभिमान नक्कीच विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना आहे.  
ज्‍वारी हे पिक ही मराठवाडयातील एक महत्‍वाचे पिक आहे, यातही एक ऐतिहासिक अशी उपलब्‍धी झाली. विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय अर्धकोरडवाहु ऊष्‍णकटिबंधीय पीक संशोधन संस्‍था (इक्रीसॅट) यांच्या संशोधन सहभागातुन परभणी शक्ती या लोह आणि जस्ताचे अधिकतम प्रमाण असणाऱ्या खरीप ज्वारीचा जैवसमृध्द वाण वि‍कसित करण्‍यात आला असुन देशातील ज्‍वारीचा हा पहिला वाण ठरला आहे. सदरिल वाणाचे दिनांक  जुलै रोजी इक्रीसॅट हैद्राबाद येथे समारंभपुर्वक प्रसारण करण्यात आले. या वाणात लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असल्यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. शरीरातील रक्‍तातील लोहाच्‍या कमरतेमुळे अनेक व्‍यक्‍तींमध्‍ये रक्‍तक्षय मोठया प्रमाणात आढळतोतसेच गर्भवती महिला व आदीवासी मुलांसाठी हा वाण अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहे. यात लोह प्रती किलो ४४ ते ४६ मिलीग्रॅम तर जस्त प्रती किलो ३२ ते ३३ मिलीग्रॅम असुन भाकरीची प्रत चांगली आहे. तसेच कडबाही उच्‍च प्रतीचा असुन उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ज्वारीचे ३६ ते ३८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. हा वाण खोडमाशीखोडकीड व काळया बुरशी रोगास प्रतिकारकक्षम आहे. यामुळे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने आहारात पुन्‍हा एखादा ज्‍वारीचे महत्‍व वाढणार आहे. याशिवाय बाजरी संशोधनातील महत्‍वाच्‍या घटनेचा उल्लेख करावा लागेल. औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन २०१७-१८ साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी जैवसमृध्‍द लोहयुक्‍त एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात संपन्न झालेल्‍या ४६ व्‍या बैठकीत परभणी कृषि विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापुस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषि यंत्रे आणि २८ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता देण्यात आली.
विस्‍तार कार्य
विद्यापीठाचे विस्‍तार कार्य नियमितपणे विविध मेळावे, प्रशिक्षण, चर्चासत्र, शास्‍त्रज्ञांच्‍या प्रक्षेत्र भेटी, माहिती वाहीनी आदींच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे राबविण्‍यात आले. परंतु यावर्षी विशेष ठरले ते कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत राबविण्‍यात आलेली मोहिम. मागील वर्षी निर्माण झालेल्‍या कापसावरील गुलाबी बोंडअळीचा धोका यावर्षी उदभवु नये, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या विस्‍तार यंत्रणेच्‍या वतीने विविध विस्‍तार कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना कापसावरील गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनाकरीता मार्गदर्शन करण्‍यात आले. यामुळे निश्चितच शेतकरी बांधव गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कमी फवारणीत व कमी खर्चात करू शकले. या मोहिमेत मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाचे सातवे सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) चे विद्यार्थ्‍यांनी मोलाचे योगदान दिली. ही मोहिम विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील एकुण २७ घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालयातील २२८० विद्यार्थ्‍यांनी तीनशेपेक्षा जास्‍त गावांपर्यंत पोहचवली हे विशेष. यावर्षी विद्यापीठांतर्गत बदनापुर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राची सुरूवात करण्‍यात आली, याचे उदघाटन ऑनलॉईन पध्‍दतीने देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री नरेन्‍द्र मोदी यांनी केले. यामुळे जालना जिल्‍हयातील विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यास चालना मिळणार आहे.    

या वर्षातील आणखी एका महत्‍वाच्‍या घटनेचा उल्‍लेख करावा लागेल, ती म्‍हणजे विद्यापीठाचे सतरावे कुलगुरू म्‍हणुन कोरडवाहु शेती संशोधनातील आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी कुलगुरू म्‍हणुन ३१ मे रोजी म्‍हणजेचे चार वर्ष चार महिने कार्यकाळ यशस्‍वीपणे पुर्ण केलाया कार्यकाळात विद्यापीठाच्‍या संशोधनशिक्षण व विस्‍तार कार्यास त्‍यांनी एक विशिष्‍ट दिशा दिलीतर विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन मा. डॉ अशोक ढवण यांनी दिनांक १ जुन रोजी पदभार स्‍वीकारला. अध्‍यापन, विस्‍तार शिक्षण व संशोधनाचा ३३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, तसेच मराठवाडयातील शेतक-यांच्‍या प्रश्‍नांची जाण असणारे, एक आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व अशी ओळख असणारे कुलगुरू विद्यापीठास लाभले आहेत. येणा-या काळात निश्चितच कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील शेती, शेतकरी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या हिताचे उत्‍कृष्‍ट कार्य होईल, यात शंकाच नाही.

संपुर्ण वर्षभरातील विद्यापीठाच्‍या यशस्‍वी प्रवासात निश्चितच अनेकांचे योगदान आहे, यात  माननीय कुलगुरू पासुन ते शेतकरी, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी, प्रसारमाध्‍यमाचे प्रतिनिधी यांचाही वाटा आहे. माजी कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु, सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठाचे कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक व विद्यार्थ्‍यी यांचा उल्‍लेख करावाच लागेल.

हे वर्ष जरी विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने महत्त्वपूर्ण ठरले, परंतु ज्‍यांच्‍या साठी हा सर्व अट्टाहास केला जात आहे, तो जगाचा पोंशिदा शेतक-यांसाठी कमी पावसामुळे निराशाजनक राहीले आहे. परंतु येणा-या वर्षात चांगल्‍या पर्जन्‍य व हवामानाची अपेक्षा करू व भावी काळ सर्वांसाठी समृध्‍दी घेऊन येईल, हीच अपेक्षा.

डॉ प्रविण कापसे, जनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी

Saturday, December 29, 2018

परभणी जिल्‍हयात थंडीची लाट

तब्बल  पंधरा वर्षानंतर परभणीचे निच्चांक तापमान ३ अंश सेल्सिअस 
मराठवाडयातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्‍हयात सध्‍या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सध्‍या विदर्भामध्‍ये थंडीची लाट आलेली असुन पश्चिम विदर्भालगतचे जे तीन जिल्‍हे आहेत त्‍यामध्‍ये नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्‍हयात थंडीच्‍या लाटेचा परिणाम जाणवत आहे. तसेच दिवसाचे कमाल तापमानात देखील घट झाली असल्‍यामुळे वातावरणात गारवा अधिक जाणवत आहे आणि दिवसा सुर्याची उष्‍णता जमिनीत शोषन होते व रात्रीला ही जमिनीत शोषण केलेली उष्‍णता आकाशाकडे परत परावर्तीत होते. सध्‍या ढगाळ वातावरण नसल्‍यामुळे आणि वारा शांत किंवा स्‍तब्‍ध असल्‍यामुळे सुर्याची उष्‍णताही सरळ आकाशाकडे निघून जात आहे. जर ढगाळ वातावरण राहीले असते तर ती उष्‍णता परावर्तीत होऊन वातावरणातील किमान तापमानात वाढ झाली असती. परंतु तसे होत नसल्‍यामुळे किमान तापमानात घट होत आहे. यापूर्वी १७ जानेवारी २००३ रोजी आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान २.८ अंशसेल्सिअसची नोंद झाली होती. दिनांक २९ डिसेंबर रोजी १५ वर्षानंतर परभणीचे किमान तापमान हे ३ अंश सेल्सिअस पर्यंत आलेले आहे आणि आगामी ३ ते ४ दिवस असाच वातावरणात गारवा राहील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ कैलास डाखोरे यांनी दिली आहे.

Friday, December 28, 2018

संशोधनाच्‍या आधारे सेंद्रीय शेतीस चालना देण्‍यास विद्यापीठ प्रयत्‍नशील...... कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
संशोधन हे अव्‍याहत चालणारी प्रक्रिया असुन शेतीतील समस्‍यांनुसार कृषि संशोधनाची दिशा निश्चित होत असते. जागतिक व देशातील बाजारपेठेत सेंद्रीय शेतमालाची मागणी वाढत असुन एकात्मिक शेती पध्‍दती बरोबरच संशोधनाच्‍या आधारे सेंद्रीय शेती पध्‍दतीस चालना देण्‍यास विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने सेंद्रीय शेती विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक 28 डिसेंबर रोजी) ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, आंतरराष्‍ट्रीय प्रमाणीकरण तज्ञ डॉ प्रशांत नाईकवाडी, अभिनव फार्मर क्‍लबचे संस्‍थापक तथा सेंद्रीय शेती तज्ञ श्री ज्ञानेश्‍वर बोडके, केंद्राचे प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतमालास प्रमाणीकरण केल्‍यास आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठ उपलब्‍ध होणार आहे. सेंद्रीय शेतीत लागणा-या निविष्‍ठां बाजारातुन विकत घेण्‍यापेक्षा शेतक-यांनी स्‍वत: घरच्‍या घरी तयार कराव्‍यात किंवा शेतकरी गटांच्‍या माध्‍यमातुन निर्मिती कराव्‍यात, त्‍यामुळे उत्‍पादन खर्च कमी होईल. सेंद्रीय शेती करणा-यां शेतक-यांचे अनुभव विद्यापीठात सुरू असलेल्‍या सेंद्रीय शेती संशोधनास उपयुक्‍त ठरू शकतात. विद्यापीठात संशोधनाच्‍या आधारे एक आदर्श सेंद्रीय शेतीचे मॉडेल तयार करण्‍यात येईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतमालातील रासायनिक घटकांमुळे मानवाच्‍या आरोग्‍य प्रश्‍न निर्माण होत आहेत, विषमुक्‍त शेतमाल निर्मिती करून बाजारपेठेत सेंद्रीय मालाबाबत विश्‍वासहर्ता निर्माण करावी लागेल. एप्रिल 2018 पासुन विद्यापीठात सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरूवात झाली असुन वेळोवेळी सेंद्रीय शेती, प्रमाणीकरण व बाजारपेठ याबाबत शेतक-यांना या केंद्राच्‍या वतीने प्रशिक्षण देण्‍यात येईल.
श्री ज्ञानेश्‍वर बोडके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बाजारपेठेत सेंद्रीय शेतीमालातुन जास्‍त नफा मिळविण्‍यासाठी शेतक-यांना थेट विक्रीशिवाय पर्याय नाही. शेतक-यांनी स्‍वत: शेतमालाची प्रतवारी करून घरपोच व थेट विक्री केल्‍यास निश्चितच चांगला बाजारभाव मिळेल. यासाठी मोबाईल अॅपचाही चांगला उपयोग होऊ शकेल. कार्यक्रमात डॉ प्रशांत नाईकवाडी व डॉ शंशाक शोभणे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्रगतशील शेतकरी सोपानराव अवचार, माणिक रासवे, ज्ञानोबा पारधे, नरेश शिंदे, संतोष मोरे, आदीसह परभणी जिल्‍हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
विद्यापीठात सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र नव्‍यानेच सुरू करण्‍यात आले असुन या केद्रांत शेतक-यांना सेंद्रीय शेतीबाबत सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, जैविक किड - रोग व्‍यवस्‍थापन, सेंद्रीय अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय बाजारपेठ, शेतकरी यशोगाथा आदी विषयावर मार्गदर्शन करण्‍यासाठी सन 2018-19 मध्‍ये प्रथम फेरीत मराठवाडातील परभणी, हिंगोली, नांदेड व लातुर या जिल्‍हयातील प्रत्‍येकी 40 शेतक-यांना प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. यात देशातील सेंद्रीय शेतीतील तज्ञ प्रशिक्षक व शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी संबंधित जिल्‍हयाचे आत्‍माचे प्रकल्‍प संचालक, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आदीच्‍या माध्‍यमातुन नोंदणी करण्‍यात आली आहे. सदरिल प्रशिक्षण परभणी जिल्‍हयासाठी 28 29 डिसेंबर 2018, हिंगोली जिल्‍हयासाठी 1 2 जानेवारी 2019, नांदेड जिल्‍हयासाठी 4 5 जानेवरी 2019 व लातुर जिल्‍हयासाठी 8 9 जानेवारी या कालावधीसाठी आयोजित करण्‍यात आले आहे.

Thursday, December 27, 2018

कृषि पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजेत......महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बावीसावा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न
माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहीत  




देशाच्‍या आर्थिक विकासात कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्राचे मोठे योगदान आहे, स्‍वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषि शास्‍त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्‍या परिश्रमातुन कृषि उत्‍पादनात वाढ होऊन देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या वर्षी देशात २७७ दशलक्ष टन अन्‍नधान्‍याचे उत्‍पादन झाले असुन जगात भात, गहु, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्‍या उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. सद्यस्थितीत भारतीय शेती समोर अनेक आव्‍हाने असुन यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्‍ती, जमिनीचा होणारा -हास, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमालाच्‍या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्‍या आहेत. कृषि विकासासाठी शेतमालास योग्‍य व शाश्‍वत भाव मिळणे आवश्‍यक असुन शेतीनिगडीत मुलभुत सुविधांचे बळकटीकरण, योग्‍य कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर द्यावा लागेल. कृषि पदवीधर हे कृषि उद्योजक म्‍हणुन पुढे आले पाहिजेत. देशाच्‍या कृषि विकासात कृषि विद्यापीठातील पदवीधरांनी आपले योगदान देण्‍याची गरज असुन कृषि पदवीधर हे आधुनिक शेतीचे उत्‍प्रेरक बनले पाहिजे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र यांनी केले़. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक २६ डिसेंबर रोजी आयोजीत २२ वा दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष खा मा श्री संजय धोत्रे व राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन, दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री मा.ना.श्री.सदाभाऊ खोत उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते. व्‍यासपीठावर कुलसचिव श्री रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. . श्री राहुल पाटील, मा. श्री लिंबाजी भोसले, मा श्री अजय गव्‍हाणे, मा. श्री बालाजी देसाई, मा. श्री शरद हिवाळे, मा. डॉ आदिती सारडा, माजी कुलगुरू डॉ एस एस कदम, डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ व्‍ही के पाटील, डॉ के पी गोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ त्रिलोचन महापात्र पुढे म्‍हणाले की, सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे भारत सरकारचे उदिष्‍ट असुन शेती उत्‍पादनक्षम पेक्षा अधिक उत्‍पन्‍नक्षम करण्‍याच्‍या धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्‍वत असा एकात्मिक शेती पध्‍दतीचा विकास करावा लागेल. कृषि संशोधनात रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. परभणी कृषि विद्यापीठाने मराठवाडयातील कोरडवाहु शेती विकासाकरिता उपयुक्‍त असे पिकांचे वाण व कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती केली असुन हे तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहच‍ण्‍यासाठी सक्षम अशी विस्‍तार यंत्रणा निर्माण करावी लागेल. यासाठी कृषि पदवीधरांचे योगदान महत्‍वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
स्‍वागतपर भाषणात कुलगुरू डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आजपर्यंत विविध पिकांच्‍या १४१ वाण व २५ शेती औजारे विकसित केले असुन ८५० पेक्षा जास्‍त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत. मराठवाडयातील शेतक-यांची अनेक दिवसापासुन मागणी असलेला कापसाचा नांदेड-४४ हा वाण महा‍बीजच्‍या मदतीने बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला असुन येणा-या खरिप हंगामात शेतक-यांसाठी हा वाण उपलब्‍ध होणार आहे. तसेच हैद्राबाद येथील अर्ध शुष्‍क उष्‍णकटिंबधीय आंतरराष्‍ट्रीय संशोधन संस्‍थेच्‍या मदतीने लोह व झिंक चे अधिक प्रमाण असणारा देशातील पहिला खरिप ज्‍वारीचा परभणी शक्‍ती जैवसमृध्‍द वाण विद्यापीठाने विकसित केला असुन बाजरी पिकातील एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ हे जैवसमृध्‍द वाण निर्माण केले आहेत, यामुळे गर्भवती महिला व मुलींमधील कुपोषणावर मात करता येईल. भारतीय कृषि संशोधन परिषदेने नुकतेच विद्यापीठास अधिस्‍वीकृती दिली असुन यामुळे परिषदेकडुन प्राप्‍त होणा-या निधीचा विद्यापीठातील शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्‍या कृषि विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्‍यपुर्ण मनुष्‍यबळ निर्मितीवर भर देण्‍यात येईल. देशातील विविध भागातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी करिता परभणी कृषि विद्यापीठ परिसर अधिक हरित, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍यास मानस असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केला
सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होतेदीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात आले. समारंभात विविध विद्याशाखेतील एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोद्यांव्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात आले. यात आचार्य पदवीचे एकुण ६१ स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण ३६४ स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण २९५१ स्‍नातकांचा समावेश होता.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील पदवी अभ्‍यासक्रमातील गोविंदा रॉय शर्मा (कृषि), जे.आरथी (उद्यानविद्या), बलराम यादव (कृषि जैवतंत्रज्ञान), प्रियांका स्‍वामी (गृहविज्ञान), इंद्रजित सिंह (कृषि अभियांत्रिकी), पदमप्रिया निराली (अन्‍नतंत्रज्ञान), मनोहर धोंडकर (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदी विद्यार्थ्‍यांना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील  श्रीवर्षा जस्‍ती (कृषि), सुप्रिया सिंगम (उद्यानविद्या), टी.अरूणा (गृहविज्ञान), स्‍वेता सोळंके (कृषि अभियांत्रिकी), दिव्‍यांनी शिंदे (अन्‍नतंत्रज्ञान), आरती देशमुख (कृषि जैवतंत्रज्ञान), एल. बांधवी (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदीं विद्यार्थ्‍यीना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौ‍रविण्‍यात आले
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील के. अविनाश (कृषि), एस. सजना (उद्यानविद्या), सत्‍यवाण भोसले (कृषि जैवतंत्रज्ञान), रेश्‍मा मल्‍लेशी (गृहविज्ञान), पुरण प्रज्ञा जोशी (कृषि अभियांत्रिकी), मुकेश बेलवाल (अन्‍नतंत्रज्ञान), एक के शिवशंकर (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन) आदी विद्यार्थ्‍यीना सुवर्ण पदकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौ‍रविण्‍यात आले. याव्‍यतिरिक्‍त दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदकांचाही समावेश होता.






Monday, December 24, 2018

वनामकृविच्‍या २२ वा दीक्षांत समारंभानिमित्‍त आयोजित पत्रकार परिषद संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला असुन यानिमित्त दिनांक २४ डिसेंबर रोजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली. पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अनिल आलुरकर, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी मानले. यावेळी शहरातील विविध प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

प्रेस नोट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बावीसावा दीक्षांत समारंभाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला असुन समारंभाचे अध्‍यक्षस्‍थान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे भुषविणार आहेत. समारंभास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक मा. डॉ त्रिलोचन महापात्र हे उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. खा. संजय धोत्रे व राज्‍याचे कृषि, फलोत्‍पादन, दुग्‍धविकास व पणन राज्‍यमंत्री मा.ना.श्री. सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
सदरिल दीक्षांत समारंभात विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके (सुवर्ण मुलामित), रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात येणार असुन कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल विद्यापीठातील प्राध्‍यापक / संशोधक यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात येणार आहे.
दीक्षांत समारंभात विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध विद्याशाखेतील एकुण ३३७६ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर, आचार्य पदवीने माननीय कुलगुरू महोद्यांव्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे एकुण ६१ स्‍नातक, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे एकुण ३६४ स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे एकुण २९५१ स्‍नातकांचा समावेश राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील कृषि पदवी अभ्‍यासक्रमातील गोविंदा रॉय शर्मा, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील जे.आरथी, कृषि जैवतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील बलराम यादव, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील प्रियांका स्‍वामी, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील इंद्रजित सिंह, अन्‍नतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील पदमप्रिया निराली, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील मनोहर धोंडकर आदी पदवी अभ्‍यासक्रमातील विद्यार्थ्‍यी सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील कृषिच्‍या अभ्‍यासक्रमातील श्रीवर्षा जस्‍ती, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील सुप्रिया सिंगम, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील टी.अरूणा, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील स्‍वेता सोळंके, अन्‍नतंत्रज्ञान अभ्यासक्रमातील दिव्‍यांनी शिंदे, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील एल. बांधवी आदीं विद्यार्थ्‍यी पदव्‍युत्‍तर अभ्यासक्रमातुन सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. 
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील कृषि पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील के. अविनाश, उद्यानविद्या अभ्‍यासक्रमातील एस. सजना, कृषि जैवतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील सत्‍यवाण भोसले, गृहविज्ञान अभ्‍यासक्रमातील रेश्‍मा मल्‍लेशी, कृषि अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमातील पुरण प्रज्ञा जोशी, अन्‍नतंत्रज्ञान अभ्‍यासक्रमातील मुकेश बेलवेल, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमातील एक के शिवशंकर आदी विद्यार्थ्‍यी सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत. याव्‍यतिरिक्‍त दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदकांचाही समावेश राहणार आहे.