Pages

Tuesday, December 31, 2019

वनामकृविस २०१९ सालचा सेरा सुविधेचा बेस्ट युजर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार

कृषि संशोधनास चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेवदारे कृषीक्षेत्रातील ई-रिसोर्सची ऑनलाईन यंत्रणा (Consortium of e-Resources in Agriculture) म्‍हणजेच सेरा प्रकल्‍प राबविण्‍यात येतो. यात उत्कृष्ट दर्जाची सहा हजार पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ई-नियतकालिके कृषि संशोधकांसाठी उपलब्ध असुन या सुविधेचा योग्‍यरित्‍या उपयोग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यांनी सन २०१९ मध्‍ये आपल्‍या संशोधनासाठी केला. याबाबत पश्चिम विभागातुन प्रकल्पांतर्गत विद्यापीठास सन २०१९ चा बेस्ट युजर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार देण्‍यात आला. सदरील प्रकल्पाबाबत जागृती करण्यासाठी जे-गेट यांच्या मार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सदरिल पुरस्‍कार दिनांक २८ डिसेंबर रोजी पुणे येथील राष्‍ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रकल्‍प संचालक डॉ एस के सिंग, संचालक डॉ आर जी सोमंकुवर, डॉ त्रिपाटी, श्री संजय ग्रोवर यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम व मोहन झोरे यांनी स्‍वीकारला.

वनामकृवित महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी कृषि महाविद्यालयातील सभागृहात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल मेळाव्‍याचे उदघाटन परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड यांच्‍या हस्‍ते होणार असुन प्रमुख अतिथी म्‍हणुन देवसिंगा (तुळजापुर, जि उस्‍मानाबाद) येथील विजयालक्ष्‍मी सखी प्रो़डयुसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा मा सौ अर्चनाताई भोसले या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार असुन परभणी लोकसभा संसद सदस्‍य मा खा श्री संजय (बंडू) जाधव, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री सतीश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री विक्रम काळे, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री विपलव बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा आ डॉ राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा आ श्री सुरेश वरपूडकर, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा आ सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा आ श्री रत्‍नाकर गुट्टे, परभणी महा‍नगरपालिकाचे महापौर मा सौ अनिता सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ महिला शेतक-यांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त महिला शेतकरी व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे आदींनी केले आहे.

Monday, December 30, 2019

जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवा…. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर

परभणी जिल्‍हयातील मौजे तरोडा येथे ' किसान गोष्टी ' कार्यक्रम संपन्‍न
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ यांचे संयुक्त विदयमाने मौजे तरोडा (ता. परभणी) येथे गुलाबी बोंडअळी निर्मुलन व फरदड मुक्ती यावर 'किसान गोष्टी' कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे होते. यावेळी विस्तार कृषि विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, प्रगतशील शेतकरी श्री. एकनाथराव साळवे, श्री. नरेश शिंदे, श्री. पुरुषोत्त्म शिंदे, श्री. कुलकर्णी, श्री.विठठलराव जवंजाळ, कृषि विभागातील अधिकारी श्री.सुरेश म्हस्के, गंगाखेड तालुका कृषि अधिकारी श्री. भगवान कच्छवे, मंडळ कृषि अधिकारी श्री.संघई, श्री. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्‍या मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापसाची प-हाटी कुटटी करुन जमिनीत गाढुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे शेतक-यांना आव्हान केले तसेच दिवसेंदिवस जमिनीचा हास होत असुन शेतीमधील अवशेष जसे उसाची पाचट, कापसाची प-हाटी, तु-हाटया मोठया प्रमाणात जाळल्या जातात ते न जाळता जमिनीत गाढल्यास सेंद्रिय कर्बात वाढ होऊन कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे सांगितले तसेच प-हाटी उपटुन न काढता जागेवरच यंत्राच्या साहयाने कुटटी करुन जमिनीत मिसळण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 
अध्यक्षीय भाषणांत श्री. संतोष आळसे यांनी कपाशी प-हाटी कुटटी यंत्राचे महत्व सांगुन या यंत्रासाठी शासनाकडुन छोटया शेतक-यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध असल्‍याचे सांगितले. या यंत्रामधुन प-हाटीची पुर्णपणे कुटटी होत असल्यामुळे लवकर कुजण्यासाठी मदत होते व दुसरे पीक लगेच घेण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन केले.
डॉ. यु. एन. आळसे यांनी कापुस प-हाटी कुटटी यंत्राचे एकात्मिक किड व्यवस्थापनातील महत्व सांगुन प-हाटी कुटटी केल्यामुळे एकरी साधारत: 4-5 टन सेंद्रिय खत जमिनीस उपलब्‍ध होऊन त्याचा फायदा जमिन सुधारण्याच्या दृष्टीने होतो असे सांगितले. 
शेतकरी श्री.संजय शेळके यांच्या शेतावर यंत्राव्‍दारे कापसाच्‍या प-हाटीची कुटटी कर-याचे प्रात्यक्षिक दाख‍वुन मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. प्रभाकर बनसावडे, यांनी केले. सूत्रसंचालन आत्माचे श्री. इक्कर यांनी केले तर आभार श्री. रेंगे, यांनी मानले. यावेळी श्री. माने, श्री. कुरूगळ, श्री. गायकवाड,,सौ. घोडके आदीसह तरोडा परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी परभणी येथील रोटोकिंग कंपनी  व लक्ष्मी ट्रेडींग कंपनी यांनी सहकार्य केले.

Monday, December 23, 2019

वनामकृवित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी  यांच्या संयुक्‍त विदयमाने दिनांक 23 डिसेंबर रोजी हळद उत्पादन व प्रक्रिया या विषयावर शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. बी. आळसे, किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. बंटेवाड, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढविण्यासाठी जमिनीच्या पोताप्रमाणे पिकांचे नियोजन करावे तसेच पिकांच्या कालावधीनुसार जमिनीची निवड करावी. शेती करतांतना आपल्याला आलेल्या अनुभवाचा वापर करावा, शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. शेतक-यांच्या आलेल्या समस्येवर प्रामुख्याने विदयापीठ संशोधन करत असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.
प्रास्ताविकात श्री एस.बी.आळसे यांनी हळद हे परभणी जिल्हयात महत्वाचे नगदी पिक असल्यामुळे, हळद पिकांचे शास्त्रीय पध्दतीने लागवड व्हावी, यासाठीच शेतकरी शास्‍त्रज्ञ संवाद आयोजित केलेचे नमूद केले.
तांत्रिक मार्गदर्शनात तोंडापुर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विषेषज्ञ श्री. टी. जी. ओळंबे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. एस. डी. बंटेवाड यांनी रब्बी पिकावरील किड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ. मिनाक्षी पाटील यांनी हळद पिकावरील रोग व्यवस्थापन व  प्रा.डी.डी पटाईत यांनी हळदीवरील किड व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार श्री योगेश पवार यानी मानले. कार्यक्रमास परभणी जिल्‍हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. एस. बी. आळसे, डॉ. यु. एन. आळसे आणि श्री. के. आर. सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. इक्क, श्री. अंभुरे, श्री. सोळुंखे, श्री. पवार, श्री. माने, श्री. कदम, श्री. जोशी तसेच आत्मा परभणी आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीच्या अधिकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Sunday, December 22, 2019

शेतमालास योग्‍य मुल्‍य मिळण्‍याकरिता ई नाम प्रणाली कार्यक्षमरित्‍या राबविणे गरजेचे..... मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ

वनामकृवित आयोजित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचा समारोप

शेतक-यांच्‍या शेतमालास योग्‍य मुल्‍य मिळण्‍याकरिता ई नाम प्रणाली कार्यक्षमरित्‍या राबविणे गरजेचे असुन ई नाम योजनेबाबत शेतकरी, कृषि उद्योजक, आडते, कंपन्‍या यांच्‍यात जागृतीची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेजसंचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात होते या परिषदेच्‍या समारोपीय कार्यक्रमात (दिनांक २२ डिसेंबर रोजीते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे हे होते तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकरविभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, डॉ डि बी यादव, डॉ बी एन गणवीर, डॉ एस एस वाडकर, डॉ आर जी देशमुख, डॉ के पी वासनिक, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ पुढे म्‍हणाले की, एका बाजुस शेतमाल खरेदी करणा-या ग्राहकांना मोठी किंमत द्यावी लागते, परंतु त्‍यातील मुख्‍य नफा शेतक-यांच्‍या पदरात न पडता, व्‍यापा-यांनाच होतो. ई नाम विपणन व्‍यवस्‍थेत स्‍पर्धेात्‍मकरित्‍या शेतक-यांना योग्‍य मोबदला मिळेल. करार पध्‍दतीने शेतीची संकल्‍पना पुढे येत आहे, परंतु यात शेतक-यांचे शोषण होणार नाही यासाठी असलेल्‍या मॉडेल कॉन्‍ट्रट फार्मिंग अॅटची योग्‍य अंमलबजावणी करून शेतकरी व कंपन्‍यात एक विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. शेतमाल विपणनमध्‍ये कृषि पदवीधरांना कार्य करण्‍याची मोठी संधी असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. 

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी शेतमाल विपणन यंत्रणा मजबुत करावी लागेल. सफरचंद व नारळ ही पिके काही भागातच पिकतात, परंतु ही दोन्‍ही फळे संपुर्ण देशात उपलब्‍ध होतात, त्‍याचा योग्‍य मोबदला उत्‍पादकांना मिळतो, यासारख्‍या बाबींचा अभ्‍यास कृषि अर्थशास्‍त्रातील संशोधकांनी करावा.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले. सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते तांत्रिक सत्रात सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणेकृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानकेसुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणामकृषि विपणन धोरणशेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे व पोस्‍टरचे सादरीकरण केले. यातील उत्‍कृष्‍ट संशोधन लेख व पोस्‍टर सादरिकरण करणा-या संशोधक, प्राध्‍यापक व विद्या‍र्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्‍माननित करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, December 21, 2019

देशात हरितक्रांती झाली, आता शेतक-यांचे उत्पन्न वाढविणा-या क्रांतीची आवश्यकता ..... मा डॉ अशोक दलवाई

वनामकृवित आयोजित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन



भारत स्‍वातंत्र झाला त्‍यावेळी वाढत्‍या लोकसंख्‍येसाठी पुरेसे अन्‍नधान्‍य पुरवठयाची मोठी समस्‍या देशासमोर होती. कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या जोरावर सन १९७२ मध्‍ये आपण अन्‍नधान्‍यबाबतीत स्‍वयंपुर्ण झालो, तर आज आपण अडीचशे दशलक्ष टन पेक्षा जास्‍त अन्‍नधान्‍य उत्‍पादनाचा विक्रम केला, तसेच फळ व भाजीपाल पिकांतही विक्रमी उत्‍पादन होत आहे. आज जगात दुध उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. हे सर्व कृषि क्षेत्रातील विकास होतांना शेतक-यांचे उत्‍पन्‍न मात्र त्‍याप्रमाणात वाढले नाही. आज शेतीत अधिक उत्‍पादन देणा-या हरितक्रांतीपेक्षा शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढणा-या क्रांतीची गरज आहे, तरच शेती, शेतकरी व देश टिकेल. देशाच्‍या कृषि विकासाच्‍या केंद्रस्‍थानी शेतकरी कल्‍याण हेच ध्‍येय असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असुन या परिषदेच्‍या उद्घाटनप्रसंगी (दिनांक २१ डिसेंबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांची उपस्थिती होती तसेच शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, महाबीजचे माजी महासंचालक डॉ शालीग्राम वानखेडे, विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके, महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ अशोक दलवाई पुढे म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न क्रांतीच्‍या दिशेने कार्य करतांना नागरिकांना पौष्टिक अन्‍न सुरक्षाही साधता आले पाहिजे तसेच पर्यावरण सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागेल. हरित क्रांती मुख्‍यत: वनस्‍पती शास्‍त्रज्ञ, पिक पैदासकर, कृषिविद्या शास्‍त्रज्ञ, मृदाशास्‍त्रज्ञ यांच्‍या आधारे आपण साध्‍य केली परंतु शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍न वाढ क्रांतीत शेतमाल व अन्‍न प्रक्रिया, कृषि निविष्‍ठा व्‍यवस्‍थापन, कृषि उद्योग व्‍यवस्‍थापन, वित्‍तीय व्‍यवस्‍थापन, शेतामाल विपणन व निर्यात आदी क्षेत्रातील तज्ञ व शास्‍त्रज्ञांची भुमिका महत्‍वाची राहणार आहे. शेतमालाची नासाडी ही मोठी समस्‍या आपल्‍या समोर आहे, त्‍यामुळे शेतमाल काढणी पश्‍चात तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जीवाश्‍म इंधनाच्‍या माध्‍यमातुन देशात औद्योगिक क्रांती झाली, परंतु हे जीवाश्‍म इंधन पुर्ननिर्माण करता येत नाही, याचे साठे कमी झाले. आता पुढील औद्योगिक क्रांतीसाठी आपणास अक्षय उर्जा स्‍त्रोत म्‍हणजेचे जैवइंधन व शेतीतील बायोमासचा उपयोगच करावा लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.  
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडा व विदर्भ विभागातील कोरडवाहु क्षेत्रातील शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. संशोधनाच्‍या आधारे कृषि तंत्रज्ञान विकसित करणे ही कृषि विद्यापीठाची प्रमुख भुमिका असुन कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ व शासनाचे धोरणात्‍मक पाठबळ या जोरावर आपण हे आव्‍हान पेलु शकु. अन्‍न सुरक्षा, पोषण सुरक्षा व उपजीवीका सुरक्षेसाठी माती, पाणी, कृषि निविष्‍ठ आदींची प्रति एकक कार्यक्षम वापर करून शेतमाल उत्‍पादन वाढ आपले ध्‍येय असले पाहिजे.
महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेती व शेतक-यांसमोर अनेक समस्‍या आहेत, हवामान बदल व पावसाचा लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. शेतक-यांचे दरडोई उत्‍पन्‍न अत्‍यंत कमी असुन शेतक-यांची सौदाशक्‍ती वाढण्‍याच्‍या दिशेने काम करावे लागेल. आज खाद्यतेलाची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे, यासाठी मोठया प्रमाणावर आपणास आयात करावी लागत आहे, तेलबिया पिकांच्‍या उत्‍पादन वाढीवर आपणास लक्ष केंद्रीत करावे लागेल.  
शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख यांनी केले तर डॉ प्रकाश महिंद्रे यांनी महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ दिगंबर पेरके यांनी मानले. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
दोन दिवस चालणा-या सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभागी झाले असुन असुन तांत्रिक सत्रात सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप दिनांक २२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.



Friday, December 20, 2019

पत्रकार परिषदेचे आयोजन



मा. डॉ अशोक दलवाई यांचा अल्‍प परिचय


मा. डॉ अशोक दलवाई,
मुख्‍य कार्यकारी अधिकारी,
राष्‍ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरण,
कृषि, सहकार तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय,
भारत सरकार, नवी दिल्‍ली

मा डॉ अशोक दलवाई हे केंद्र शासनाच्‍या कृषि, सहकार व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या राष्‍ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी असुन केंद्र शासनाचे सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी नेमलेल्‍या आंतर मंत्रालयीन अभ्‍यास समितीचे ते अध्‍यक्ष आहेत. सन 2018 मध्‍ये त्‍यांनी शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी 14 खंडीय धोरणात्‍मक शिफारशीचा अहवाल भारत सरकारला सुपूर्त केला आहे तसेच सध्‍या या केलेल्‍या शिफारशीच्‍या अंमलबजावणीवर देखरेख करण्‍याचे कामही ते करित आहेत.

मा डॉ अशोक दलवाई हे धारवाड येथील कृषी विद्यापीठाचे कृषि अर्थशास्‍त्राचे पदव्‍युत्‍तर असुन त्‍यांना सन 2016 मध्‍ये धारवाडा कृषि विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवीने सन्‍माननित केले आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवाच्‍या 1984 बॅचचे ओरीसा कॅडरचे आयएएस अधिकारी असुन त्‍यांनी ओरिसा व कर्नाटक राज्‍यात जिल्‍हाधिकारी पदावर उल्‍लेखनिय कार्य केले आहे. देशात बायोमेट्रिक आधारित आधार कार्ड प्रणालीचे सुरवातीचे सदस्‍य राहिले असुन तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख म्‍हणुन कार्य केले आहे. ते सर्वसामान्‍यापर्यत नागरी सेवा प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी आणि सुशासनाबाबत नेहमीच आग्रही असतात. ओडिशा राज्याचे पहिले कृषी धोरण, कर्नाटकचे पहिले वस्त्र धोरण, बेंगळुरू शहरातील मालमत्ता कराच्या मूल्यांकनासाठी स्व-मूल्यांकन योजना (त्यानंतर देशभरात दत्तक घेण्यात आले), स्वच्छ बेंगळुरू - घनकचरा व्यवस्थापन, सहभागी पाटबंधारे व्यवस्थापन, राज्य पीएसयूची पुनर्रचना आदीमध्‍ये त्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्‍यांनी आजपर्यंत आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर अनेक व्‍याख्‍याने दिली आहेत. भारत सरकारच्‍या मॉडेल अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युस अँड लाइव्ह स्टॉक मार्केटिंग (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) कायदा 2017, मॉडेल कॉन्ट्रॅक्ट शेती व सेवा कायदा, 2018, ग्रामीण कृषी बाजारपेठा आदीसाठी मार्गदर्शक तत्वाचा मसुदा तयार करण्‍यात त्‍यांचे मोलाचे योगदान आहे.

Thursday, December 19, 2019

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात केशर आंबा लागवड प्रशिक्षण संपन्‍न

देशांतर्गतच आंबा विक्रीसाठी मोठी संधी.......संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांचे प्रतिपादन
भविष्‍यात आंबा लागवडी खालील क्षेत्र विस्तारले आणि अधिक उत्पादन मिळाले, तरीही विक्रीची काळजी करण्याचे कारण नाही. फळामध्‍ये आंबा फळास देशातील तसेच राज्यातील ग्राहक मोठया प्रमाणात पंसती असुन देशाची लोकसंख्यचा विचार करता आपल्या देशातंंर्गतच आंब्‍याची बाजारपेठ मोठी आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेले हिमायतबाग औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा – आत्‍मा औरंगाबाद यांच्या सहकार्याने दिनांक 19 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकरिता केशर आंबा लागवड विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, संशोधन उपसंचालक डॉ एस बी पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश अव्हाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर पुढे म्‍हणाले की, आंबा फळाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करून या फळपिकातून शेतक-यांना समृद्धी साधणे शक्‍य होईल. दर्जेदार आंबासाठी काही ग्राहकांची जास्‍त किंमत देण्‍याची तयारी असते. त्‍यासाठी प्रतवारी, पॅकिंग आणि गुणवत्ता याची कास आंबा उत्‍पादकांनी धरावी, असा सल्‍ला देऊन देशाच्या वेगवेगळ्या भागातील शेतकरी लागवड करीत असलेल्या जातीची विशेष वैशिष्ट्ये देखील सांगितले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ तुकाराम मोटे यांनी आंबा लागवड करण्यासाठी कृषी विभाग राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश अव्हाळे यांनी केले. सूत्रसंचालन आत्मा कार्यालयाचे बीटीएम श्री मकरंद ननावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आर व्ही नयनवाड यांनी मानले.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एम बी पाटील यांनी जमिनीच्या निवडीपासून तर फळधारणेपर्यंत केशर आंबा लागवडीचे तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आंबा फळ पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापनावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ गजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले तर आंब्यावरील कीड व्यवस्थापन या विषयावर डॉ एन आर पतंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास शंभरपेक्षा जास्त आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश आव्हाळे आणि त्यांचा चमूंनी परिश्रम घेतले   

सौजन्‍य
श्री रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद

Wednesday, December 18, 2019

वनामकृवितील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना देशात सर्वोत्‍कृष्‍ट

गौरव कार्याचा : ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत पन्‍नास लाखपेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो हवामान आधारित कृषि सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेस २०१८ सालचा देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन ग्‍वालियर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषि विद्यापीठात आयोजित ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेच्‍या १३ व्‍या वार्षिक आढावा राष्‍ट्रीय बैठकीत सन्‍माननित करण्‍यात आले. स‍दरिल सन्‍मान नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मा डॉ एम मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे व श्री प्रमोद शिंदे यांनी स्‍वीकारला. कार्यक्रमास ग्‍वालियर येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा एस के राव, जबलुपर येथील अटारीचे संचालक डॉ अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ के के सिंग, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक उपसंचालक (कृषि विस्‍तार) डॉ रणधीर सिंग, ग्‍वालीयार कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ जे पी दिक्षीत, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ एस एन उपाध्‍याय, कार्यक्रम आयोजक डॉ यु पी एस भथुरीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वनामकृवि शास्‍त्रज्ञ लिखित ‘हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन’ पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

सदरिल वनामकृवितील योजना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी श्री प्रमोद शिंदे, डॉ यु एन आळसे, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ सी बी लटपटे, डॉ विनोद शिंदे, डॉ राहुल बगेले, प्रा ए टी शिंदे, श्री पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे. 

भारतीय कृषि मंत्रालय व पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत देशात १३० कृषि हवामान केंद्र कार्यरत असुन परभणी विद्यापीठातील केंद्र २००७ साली सुरू झाले. या केंद्राच्‍या वतीने पिकांची पेरणीपुर्व ते पीक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारीत नियोजन कसे करावे यांचे सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते. या केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील जिल्‍हापातळीपर्यंत शेतकरी बांधवाना आठवडयातुन दोन वेळा मंगळवार व शुक्रवार कृषि हवामान सल्‍ला दिला जातो, यात पुढील पाच दिवसांकरिता पाऊस, तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, दिशा व ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो, या आधारे कृषि सल्‍ला दिला जातो. स‍दरिल सल्‍ला जिल्‍हयानिहाय आकाशवाणी, दुरदर्शन, वर्तमानपत्रे, प्रसार माध्‍यमे, कृषि विज्ञान केंद्रे, किसान पोर्टल एसएमएस, मोबाईल अॅप्‍स, व्‍हॉटसअॅप ग्रुप, संकेतस्‍थळ, ब्‍लॉग आदींच्‍या माध्‍यमातुन पन्‍नास लाख पेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो. या वेळोवेळी प्रसारित केलेल्‍या हवामानातील बदलातील सावधानतेच्‍या इशारामुळे अनेक शेतक-यांना आपले होणारे शेतीतील नुकसान प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष टाळणे शक्‍य होत आहे. या कार्याचा गौरव म्‍हणुन देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन वनामकृविच्‍या ग्रामीण मौसम सेवा केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले.  

Tuesday, December 17, 2019

वनामकृवित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन

केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांची प्रमुख उपस्थिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील परिषदेचे उद्घाटन दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत तसेच शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दोन दिवस चालणा-या सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग घेणार असुन सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप दिनांक २२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. परिषदेत शेतक-यांसाठी शेती या विषयावर मा डॉ अशोक दलवाई तर भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांचेही मुख्‍य व्‍याख्‍यान होणार असल्‍याची माहिती विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके व संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे यांनी दिली आहे.

Saturday, December 14, 2019

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कापसाचा फरदड घेऊ नये

वनामकृवि किटकशास्‍त्रज्ञांचा शेतकरी बांधवाना सल्‍ला


नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किडकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे. 
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी कामगंध सापळयाचा वापर करुन मोठया प्रमाणात सामुहिकरीत्या नर पतंग गोळा करुन नष्ट करावेत. जिनींग - प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामगंध सापळयातील ल्युर बदलून नवीन ल्युर लावावे. डिसेंबर व जानेवारी महीन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्या मध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्‍याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्‍या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे. जानेवारी महिन्या नंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, तसेच बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील 5 ते 6 महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते, त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्‍ध नसल्यास अळी सुप्तअवस्थेत जाते. परंतू फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा या वापर करावा व तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करुन सेंद्रिय खतामध्ये रुपांतरीत करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात चांगली तापू दयावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर पाणी देऊन पुन:श्च कापूस पिक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशके यांचा वापर करुन मार्च महिन्यानंतरही कापूस पीक घेतले जाते. फरदड कपाशीला सिंचीत केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होते. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फरदड कापूस पिकांवर येणाऱ्या अळयांना हंगामानंतर सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा कालावधी जसा-जसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे बोंडअळयांमध्ये बीटी प्रथिना विरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठया ढेकूण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठया प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनात घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्‍यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड व समन्वय अधिकारी क्रॉपसाप प्रकल्प तथा सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




Wednesday, December 11, 2019

वनामकृविच्या शिक्षण संचालक पदाचा डॉ डि एन गोखले तर विस्‍तार शिक्षण संचालक पदाचा डॉ डि बी देवसरकर यांनी पदभार स्‍वीकारला


डॉ डि एन गोखले
डॉ डि बी देवसरकर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांची अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) यापदावर नियुक्‍ती झाली होती, दिनांक ६ डिसेंबर रोजी ते त्‍यापदावर रूजु झाले तसेच परभणी कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) या रिक्‍तपदाचा पदभारही त्‍यांचाकडेच होता. या रिक्‍त झालेल्‍या शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदाचा पदभार डॉ डि एन गोखले यांनी तर विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुन डॉ डि बी देवसरकर यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी पदभार स्‍वीकारला. सदरिल पदभार माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्‍या मान्‍यतेने कुलसचिव डॉ रणजित पाटील यांच्‍या आदेशानुसार त्‍यांनी स्‍वीकारला. डॉ डि एन गोखले हे सध्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचे तर डॉ डि बी देवसरकर हे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य आहेत. 

डॉ डि एन गोखले यांना विद्यापीठात विविध पदांचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असुन ते चार वर्ष कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख म्‍हणुन कार्यरत होते तर सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य यापदावर गेली सात वर्षापासुन कार्यरत आहेत. डॉ गोखले यांनी कृषिविद्या विभागातुन आचार्य ही पदवी प्राप्‍त केली असुन त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवरील जर्नल मध्‍ये शंभर पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाले आहेत. तसेच डॉ डि बी देवसरकर यांना विद्यापीठात कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या क्षेत्रात विविध पदांचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी कृषि अनुवंशशास्‍त्र व वनस्पतीशास्‍त्राचे विभाग प्रमुख व विद्यापीठाचे कुलसचिव म्‍हणुन ही कार्य केले आहे. गेल्‍या दोन वर्षापासुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य म्‍हणुन कार्यरत असुन ते कृषि अनुवंशशास्‍त्र व वनस्पतीशास्‍त्राचे आचार्य पदवीधारक आहेत. त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवरील जर्नल मध्‍ये १२५ पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाले आहेत.

Saturday, December 7, 2019

भविष्‍यात देशी कपाशीखालील लागवड क्षेत्र वाढू शकते ........ कापुस तज्ञ डॉ. बसवराज खादी

वनामकृवितील महेबुब बाग परभणी येथील कापुस संशोधन केंद्राचा शताब्‍दीपुर्ती सोहळा संपन्‍न

देशी कपाशीचे वाण रसशोषण करणा-या कीडींला प्रतिकारक्षम असुन सघन लागवड पध्दतीतुन उत्पादन वाढलांब धाग्याचे वाण विकसीत केल्यामुळे भविष्यात देशी कपाशीखालील लागवडीचे क्षेत्र वाढु शकते. देशी कपाशीत बोंडाची अधिक संख्या व त्यांचा आकार लक्षात घेता भविष्यात कपाशी वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर दयावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक तथा कापुस तज्ञ डॉ. बसवराज खादी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील देशी कपाशीवरील संशोधन करणारे महेबुब बाग, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या शताब्दीपुर्ती सोहळा दिनांक ७ डिसेबर रोजी संपन्न झाला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर पुणे येथील महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीचे अध्‍यक्ष तथा माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, माजी कापुस पैदासकार डॉ. एस. एस. माने, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, डॉ के एस बेग, डॉ विजयकुमार चिंचाणे, डॉ. यु. जी. कुलकर्णी, महाबीजचे डॉ. प्रफुल्ल लहाने, श्री. अर्जुन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बसवराज खादी पुढे म्‍हणाले की, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापूस संशोधनात उल्लेखनीय कार्य केले असून केंद्राने विकसीत केलेले जनुकिय बँक देशात इतर ठिकाणी उपयोगात येत आहे. याच केंद्राने लांब धाग्याचे व किडींना सहनशील वाण उपलब्ध करून दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. अशोक ढवण म्हणाले की, बदलते हवामान, शेतीतील वाढता उत्पादन खर्च, बीटी कपाशीवरील कीडींचा प्रादूर्भाव आदींमुळे देशी कपाशी हा शेतक­यांपुढे एक पर्याय उपलब्ध आहे. या केंद्राच्या माध्यमातून अमेकिरन कपाशीचे गुणधर्म देशी कपाशीत रुपांतरीत करण्याचे मुख्य कार्य करण्यात आले आहे. आज जागतिक बाजारपेठेत कपाशीच्‍या मागणीत विविधता असुन सर्जीकल कपाशी, रंगीत कपाशी, सेंद्रीय कपाशी या मागणीत देशी कपाशीचे वाण सुयोग्य ठरतात तसेच ते अमेरीकन कपाशीच्या तुलनेत समतुल्य आहेत. भविष्यात देशी कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, जनुकीय तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, जीआय मानांकन  यासाठी प्रयत्न सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
डॉ. एस. टी. बोरीकर यांनी या केंद्राने धाग्याच्या अधिक लांबीचे वाण प्रसारीत केले असुन त्यामुळे व्यावसायीक तत्वावरही कपाशीचे उत्पादन शेतक­यांना फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर डॉ. दत्तात्रय बापट यांनी कापुस उत्‍पादनक शेतक­यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी देशी कापूस लागवड तंत्रज्ञान भविष्यात निश्चितच उपयोगी ठरेल, अशी आशा व्‍यक्‍त केली. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, गेली शंभर वर्ष हे केंद्र कपाशी संशोधनात कार्यरत असून केंद्रातर्फे कपाशीचे दहा पेक्षाही अधिक वाण लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आले आहेत. या नऊ सरळ वाण व एक संकरीत वाणाचा समावेश असल्‍याचे सांगितले.
कार्यक्रमात देशी कपाशीच्या लागवडीसंशोधनाचा आढावा घेणा-या पुस्तीका व घडीपत्रिकांचे विमोचन करण्‍यात आले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने देशी कपाशीपासुन तयार करण्यात आलेल्या कापडी पिशाव्यांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्राचे आजी व माजी प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ. अे. एच. राठोड, डॉ. एस. बी. बोरगावकर, तसेच देशी कापूस लागवड करणारे शेतकरी प्रगतशीशेतकरी श्री. स्वामीनाथन (चेन्नई, तमिळनाडु), श्री. वसंतराव फुटाने, श्री. नरेश शिंदे, श्री. बोले, आदींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक कापुस पैदासकार डॉ. खिजर बेग यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. अरविंद पंडागळे यांनी केले तर आभार डॉ. विजयकुमार चिंचाणे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यस्वीतेसाठी डॉ. डब्लु. एन. नारखेडे, डॉ. जी. के. लोंढे, डॉ. एस. पी. मेहेत्रे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. डी. एस. चौहान, डॉ. डी. एस. पेरके, डॉ. अविना राठोड, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे, श्री. बी.एच.कांबळे, श्री. अे. आर. पठाण, श्री. सदाशिव पांडे आदींनी परिश्रम घेतले.

सौजन्य - डाॅ आनंद गोरे