Pages

Thursday, January 28, 2021

कृषी संशोधनासाठी रिमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक ______ डॉ. पेन्नन चिन्नासामी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी, पवई) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 ते 25 जानेवारी दरम्यान रिमोट सेन्सींग व जीआयएस तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर यावरील एक आठवडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक 25 जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयआयटी पवई, मुंबई येथील डॉ. पेन्नन चिन्नासामी हे होते तर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होती. आयोजक डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार, डॉ. प्रविण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. पेन्नन चिन्नासामी म्हणाले की, कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी वेगवेगळया प्रकारच्या संख्यात्मक माहितीची आवश्यकता असते. ही संख्‍यात्‍मक माहिती वेळेवर उपलब्ध होण्‍याकरिता रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर संशोधनासाठी फायदेशीर ठरु शकतो. कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी जीआयएस व रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. प्रशिक्षणात डॉ. पेन्नन चिन्नासामी यांनी क्युजीआयएस प्रणालीचा उपयोग, शेतीचे नकाशे काढणे, उपग्रह प्रतिमांचा उपयोग करणे, ड्रोन प्रतिमांचा शेती संशोधनासाठी वापर करणे आदीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थी व शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करून मराठवाडयातील कोरडवाहू शेती संशोधनासाठी रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.

नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाद्वारे प्रशिक्षीत संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना देशपातळीवर विविध संशोधन कार्यपटलावर संधी उपलब्ध असल्‍याचे सांगितले. वनामकृवि व आयआयटी येथील संशोधक प्राध्यापक यांच्‍या मदतीने सर्व विभागनिहाय डिजीटल शेती करीता भौगोलिक नकाशे व शेती उपयुक्त माहिती तयार करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.

प्रशिक्षणात 40 पदव्युत्‍तर विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक आयआयटी पवई, मुंबई येथील जागतिक कीर्तीचे नामांकीत प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी आणि त्यांचे सहकारी श्री. शिवानंद नलगिरे यांनी मार्गदर्शन केले.

श्री. राम मोरे, डॉ. कैलास डाखोरे, श्रीमती भाग्यलक्ष्मी आदीं प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र देण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मेघा जगताप यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, इंजि. खेमचंद कापगते, इंजि. नरेंद्र खत्री, डॉ. हेमंत रोकडे, इंजि. शिवानंद शिवपुजे, रहिम खान, इंजि. गोपाळ रनेर, इंजि. विश्वप्रताप जाधव, इंजि. अपुर्वा देशमुख, रामदास शिंपले, श्रीमती रेखा ढगे, जगदीश माने, मारोती रनेर, गंगाधर जाधव आदींनी सहकार्य केले.

Wednesday, January 27, 2021

वनामकृवित प्रजासत्ताक दिन साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यात आलायावेळी कुलसचिव श्री रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्यविद्यापीठातील अधिकारीकर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा देऊन कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावातही विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण कार्यक्रम माननीय कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनानुसार सर्वांच्‍या सहकार्याने अविरत चालु असल्‍याचे ते म्‍हणालेकार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.  

Wednesday, January 20, 2021

लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रात जवस दिन साजरा


देशात अन्नधान्याची कमतरता नाहीपरंतु तेलबिया पिकाखालील लागवडीचे क्षेत्र फारच कमी आहे. दरवर्षी देशाला खाद्यतेलाची मोठया प्रमाणात आयात करावी लागतेत्‍याकरिता मोठी किंमत मोजावी लागते. शेतकरी बांधवानी तेलबिया पिक लागवड करावी. मराठवाडयातील कोरडवाहु क्षेत्रात रब्‍बी हंगामात जवस हे पिक एक चांगले पर्याय ठरेलअसे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर ये‍थील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र आणि हैद्राबाद येथील तेलबिया संशोधनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने लातुर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्रात जवस दिन साजरा (दिनांक २० जानेवारीकरण्‍यात आलाकार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास हैद्राबाद येथील शास्‍त्रज्ञ डॉ एस एन सुधाकरबाबुसंशोधक संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरहैद्राबाद येथील जवस प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ ए एल रत्‍नकुमारगळीतधान्‍ये विशेषज्ञ डॉ एम के घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले कीविद्यापीठ विकसित एखादा वाण जेव्हा शेतकरी बांधवाना पसंद पडतोत्‍यामागे कृषी शास्त्रज्ञाची मोठी मेहनत असते. लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्राची स्‍थापना १९५६ साली झालीतेलबिया पिकांमध्‍ये अनेक चांगले वाण या संशोधन केंद्राने दिले. याच केंद्राने विकसित केलेले जवसाचे लातूर-९३  हे वाण अत्‍यंत चांगले असुन जवस लागवड ही आर्थिकदृष्‍टया फायदेशीर ठरेल असे ते म्‍हणाले.  

शास्‍त्रज्ञ डॉ एस एन सुधाकरबाबू मार्गदर्शनात जवसाचे आहारातील महत्‍व वाढत असुन शेतकरी बांधवाना जवस लागवड करून जवस प्रक्रिया उद्योग उभारण्‍याची संधी असल्‍याचे म्‍हणाले तर शास्रज्ञ डॉ ए एलरत्नकुमार म्हणाले कीजवस हे महत्वाचे रब्बी पीक आहेत्याचा वापर पेंट उद्योगात होत आहे त्यामुळे हे पीकाचे महत्‍व वाढणार आहे.  

डॉ दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले कीजवसाचे लातूर-९३ या हे वाण २०१७ मध्ये प्रसारित करण्‍यात आलाा. केवळ तीन महिन्‍यात येणारे चांगले उत्पादन देणारे वाण आहे. लातुर येथील प्रक्षेत्रावर पंधरा एकर जवस वाणाची लागवड करण्‍यात आली आहे. तसेच लातुर येथील विभागीय कृषि सहसंचालक डॉ टि एन जगताप म्‍हणाले कीजवस दिवस एक दिवसाचा न ठेवता तो तंत्रज्ञान सप्‍ताह म्‍हणुन साजरा करून शेतकरी बांधवाना जवस लागवडी पासुन प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण देण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एम के घोडके यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मुटकुळे यांनी केले तर आभार डॉ मोहन धुपे यांनी मानले. कार्यक्रमास लातुर परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या प्रसंगी जवस पीक प्रात्‍यक्षिकांचे आयोजन करण्‍यात आले होतेसंशोधन केंद्राच्‍या पंधरा एकर प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसित नवीन वाण लातुर ९३ लागवड करण्‍यात आली असुन इतर ४० वाणाचे ‍पिक प्रात्‍यक्षिकात समावेश आहे. कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. बचत गट सदस्‍यांना जवस लागवडप्रक्रियाव मुल्‍यवर्धन यावर प्रशिक्षण देण्‍यात आले.

तांत्रिक सत्रात तेलबिया संशोधन व पुढील वाटचाल यावर डॉ दत्‍तप्रसाद वासकरसुर्यफुल लागवडीवर डॉ एस एन सुधाकरबाबुजवस लागवडीवर डॉ ए एल रत्‍नकुमारजवस मुल्‍यवर्धन यावर श्री उदय देवळाणकरजवस शेतक-यांसाठी वरदान यावर प्रगतशील शेतकरी श्री अशोक चिंते आदींनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात सुधारित तंत्रज्ञानाने जवस लागवड करणारे व जवस मुल्‍यवर्धन करून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणा-या सहा प्रगतशील शेतक-यांचा माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित जवस लागवडप्रक्रियाव मुल्‍यवर्धन या पुस्‍तकाचे विमोचन करण्‍यात आले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या योजनेतुन अनुसुचित जाती व जमातीच्‍या शंभर शेतकरी व महिला शेतकरी यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फवारणी यंत्र, वैभव विळा, ताडपत्री आदी कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले.










माळेगांव खुर्द (ता बारामती) येथे आयोजित कृषी प्रदर्शनातील परभणी विद्यापीठाच्या कृषि अवचारे दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद

माळेगांव खुर्द (ता बारामती) येथे राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संशोधन संस्‍था व अॅग्रीकल्‍चर डेव्‍हलपमेंट ट्रस्‍टचे कृ‍षी विज्ञान केंद्र तसेच बायर संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि तंत्रज्ञान सप्‍ताहाचे दिनांक 18 ते 22 जानेवारी दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले असुन कृषिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्‍यात आले. सदरिल प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित विविध कृषि अवचारे व यंत्राचे स्‍वतंत्र दालन उभारण्‍यात आले आहे. यात बहुउद्देशीय बीबीएफ यंत्र, सौर ड्रायर, बैलचलित कृषि प्रक्रिया युनिट, आदीचे प्रात्‍यक्षिके दाखविण्‍यात येत असुन कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व डॉ राहुल रामटेके हे विद्यापीठ विकसित यंत्राची माहिती देत आहे. या विद्यापीठ दालनास माजी केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार, उपमुख्‍यमंत्री मा श्री अजितदादा पवार, जलसंधारण मंत्री मा ना श्री जयंत पाटील, मृदा व जलसंवर्धन मंत्री मा ना श्री शंकरराव गडाख, कृषि मंत्री मा ना श्री दादाजी भुसे, कृषि राज्‍यमंत्री मा ना श्री विश्‍वजीत कदम, पशुसंवर्धन राज्‍यमंत्री मा श्री दत्‍तात्रय भरणे, कृषि आयुक्‍त मा श्री धीरजकुमार, कृषि सचिव मा श्री एकनाथ डवले, खासदार मा सौ सुप्रियाताई सुळे, आमदार मा श्री रोहित पवार, मा श्री राजेन्‍द्र पवार, माजी कुलगुरू डॉ एस एस मगर आदीसह शेतकरी बांधवानी भेटी देऊन माहिती घेतली. विद्यापीठ विकसित कृषि यंत्र व अवचाराबाबत शेतकरी बांधवामध्‍ये मोठी उत्‍सुकता दिसुन आली.






वनामकृवित रिमोट सेन्सींग व जिआयएस तंत्रज्ञानाचा शेतीमध्‍ये वापर यावर प्रशिक्षणास प्रारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व आयआयटी, पवई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांकरिता रिमोट सेन्सींग व जिआयएस तंत्रज्ञानाचा शेतीमध्‍ये वापर विषयावर एक आठवडयाचे प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २० ते २५ जानेवारी दरम्यान करण्‍यात आले असुन दिनांक २० जानेवारी रोजी ‍प्रशिक्षणाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते तर आयआयटी पवई चे प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठातील विविध विभागांची व नाहेप अंतर्गत विभागाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जीआयएस व रिमोट सेन्सिंग प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संशोधन करण्‍याचा सल्‍ला  दिला तर डॉ. पेन्नन चिन्नासामी यांनी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा कृषि संशोधनातील महत्‍व सांगुन प्रशिक्षणार्थीनी संशोधन प्रकल्प तयार करण्यास सागितले.

याप्रसंगी नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ ‍ शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाच्‍या ‍विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात आयोजन सचिव प्रा. संजय पवार यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व प्रशिक्षण यावर माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. मेघा जगताप यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार व डॉ. प्रवीण वैद्य यांनी परिश्रम घेतले. नाहेपचे डॉ. अनिकेत वाईकर, रवीकुमार कल्लोजी, शिवानंद शिवपुजे, नरेंन्द्र खत्री आदींनी तांत्रिक सहाय्यक केले तर प्रक्षेत्र सहाय्यक गंगाधर जाधव, मारोती रनेर, जगदीश माने आदींनी सहकार्य केले.

सदरिल प्रशिक्षणात आयआयटी पवई चे नामांकित प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी व त्यांचा समुह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पेन्नन चिन्नासामी हे भूजल मॉडेलिंग, रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस या विषयाचे प्रमुख संशोधक, शास्त्रज्ञ प्राध्यापक आहेत. प्रशिक्षणासाठी एकूण ५० पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी नोंदणी केली आहे.

Saturday, January 16, 2021

वनामकृविच्‍या वतीने लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात जवस दिनाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर ये‍थील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र आणि हैद्राबाद येथील तेलबिया संशोधनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जवस दिनाचे आयोजन लातुर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्रात दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ११.०० ते १४.०० दरम्‍यान करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन हैद्राबाद येथील शास्‍त्रज्ञ डॉ एस एन सुधाकरबाबु यांच्‍या हस्‍ते होणार असुन संशोधक संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील जवस प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ ए एल रत्‍नकुमार, मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ संजय जांभुळकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या प्रसंगी जवस पीक प्रात्‍यक्षिकांचे आयोजन करण्‍यात आले असुन संशोधन केंद्राच्‍या पंधरा एकर प्रक्षेत्रावर केवळ नव्‍वद दिवसात तयार होणारे विद्यापीठ विकसित नवीन वाण लातुर ९३ लागवड करण्‍यात आली असुन इतर ४० वाणाचे ‍पिक प्रात्‍यक्षिक पाहता येणार आहे. कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन यात जवसाचे मुल्‍यवर्धीत पदार्थ, जवस तेल, जवस चिक्की, जवस चटणी, जवस प्रतवारी, पॅकेकिंग आदींचा समावेश राहणार आहे. बचत गट सदस्‍यांना जवस लागवड, प्रक्रिया, व मुल्‍यवर्धन यावर प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. तांत्रिक सत्रात तीळ मुल्‍यवर्धन यावर डॉ संजय जांभुळकर, तेलबिया संशोधन व पुढील वाटचाल यावर डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सुर्यफुल लागवडीवर डॉ एस एन सुधाकरबाबु, जवस लागवडीवर डॉ ए एल रत्‍नकुमार, जवस मुल्‍यवर्धन यावर श्री उदय देवळाणकर, जवस शेतक-यांसाठी वरदान यावर प्रगतशील शेतकरी श्री अशोक चिंते, मार्गदर्शन करणार आहेत. माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते दहा प्रगतशील शेतकरी बांधवाचा सत्‍कार करण्‍यात येणार असुन जवस लागवड, प्रक्रिया, व मुल्‍यवर्धन या पुस्‍तकाचे विमोचन करण्‍यात येणार आहे. तरी सदरिल कार्यक्रमाचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी घ्‍यावाअसे आवाहन गळीतधान्‍ये विशेषज्ञ डॉ एम के घोडके यांनी केले आहे.



लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावरील जवस पीक प्रात्‍यक्षिकेे






Monday, January 11, 2021

शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावरील विद्यापीठ विकसित तुरीच्‍या वाणास मोठा बहर

भोकर तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्र विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी. बी देवसरकर यांची भेट व मार्गदर्शन  

दिनांक ११ जानेवारी रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी. बी देवसरकर, कृषि विद्यावेत्ता डॉ यु. एन. आळसे यांनी नांदेड जिल्‍हयातील मौजे नारवट (ता. भोकर) येथील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मीकांत देशपांडे यांचे तूर पिकाची पहाणी केली. श्री देशपांडे यांनी दहा एकर क्षेत्रावर विद्यापीठ विकसित बीएसएमआर ७३६ या तुरीच्‍या वाणाची टोकण पद्धतीने १०X१.५ फुट अंतरावर लागवड केली असुन सद्यस्थितीत मोठया प्रमाणात शेंगा लगडलेल्‍या दिसुन येत आहे. एकरी ९ ते १ क्विंटल उत्पादन येण्याची अंदाज असुन श्री देशपांडे एकात्मिक पध्दतीने अन्‍नद्रव्य व एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाचा अवलंबत केला आहे. यात विद्यापीठ निर्मिती बॉयोमिक्‍सचा वापर केला असल्‍यामुळे तुरीवर अत्यंत कमी प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

यावेळी डॉ डी. बी देवसरकर यांनी घरच्या घरी तुरीचे शुध्‍द बियाणे निर्मितीबाबत मार्गदर्शन करून सदरिल  बीएसएमआर ७३६ या वाणाचे शुध्द बियाणे तयार करून इतर शेतकऱ्यांना शुद्ध व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी भोकर तालुक्‍यातील मौ. रायखोड येथे श्री नार्लेवाड यांचे भोकर तालुक्यातील नाविन्यपूर्ण अशा बटाटा शेती, मौजे भोकर येथे श्री भगवान किशनराव कदम यांचे पेरू व पपई बागेस भेट दिली. भेटी दरम्यान डॉ  यु. एन आळसे यांनी अन्‍नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र भेटी दरम्यान तालुका कृषि अधिकारी श्री व्ही. बी. गिते भोकर, मंडळ कृषि अधिकारी श्री रामहरी मिसाळ भोकर, तालुका तंत्र व्यवस्थापक श्री बोईनवाड़ श्री विशाल बोथींगे शंतणू सितावर आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, January 5, 2021

Sunday, January 3, 2021

शेतकरी कुटुंबाच्‍या आर्थिक समृध्‍दी करिता शेतीच्‍या सातबारावर महिलांचे नाव पाहिजे ...... मा. श्रीमती आशाताई भिसे

वनामकृवि तर्फे आयोजित ऑनलाईन महिला मेळाव्‍यात प्रतिपादन

क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या कार्यामुळेच महिला शिक्षणाचे अखंड कार्य चालु आहे. शेतीतील ८० टक्के शेतकामात महिलांचा प्रत्‍यक्ष सहभाग असतो, पेरणी, खते देणे, कोळपणी, काढणी आदी काबाडकष्‍टाच्‍या कामात सहभाग असतो, परंतु शेतमाल विपणन प्रक्रिया व आर्थिक बाबीतं महिलांचा सहभाग नसतो. प्रत्‍येक काम महिला बारकाईने व नियोजनबध्‍द पध्‍दतीने करतात, काटकसर हा अंगभुत गुण महिलांमध्‍ये असतो, त्‍यामुळे महिलाचा शेतमाल विक्री, विपणन व निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविल्‍यास निश्चितच शेतकरी कुटंबाची आर्थिक समृध्‍दीत वाढ होईल. निर्णय प्रक्रियेत महिला सहभाग वाढविण्‍याकरिता सात बारावर महिलांचे नाव असले पाहिजे, अशी अपेक्षा लातुर येथील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्‍या मा. श्रीमती आशाताई भिसे यांनी व्‍यक्‍त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी आयोजित ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्‍यात प्रमुख अतिथी म्‍हणुन मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. श्रीमती आशाताई भिसे पुढे म्‍हणाल्‍या की, बचत गट चळवळीमुळे महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढत आहे, आज महिला बचत गटामुळे महिलाही कुटुंबाच्‍या आर्थिक आधार देत आहेत. राज्‍यात शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याचे जाळे निर्माण होत आहे, परंतु शेतीतील कामात मोठा स‍हभाग असणा-या महिलांचाही उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन झाल्‍या पाहिजे. शेतमाल आधारभुत किंमत ठरवितांना महिलांचे शेतकामातील कष्‍टाचे मोलाची नोंद  घेतली पाहिजे. महिलाच्‍या कामाचे मुल्‍यांकन व्‍हावे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गेल्‍या नऊ महिन्‍यात विद्यापीठाच्‍या वतीने अनेक कार्यशाळा, मेळावे, चर्चासत्र आदींचे ऑनलाईन आयोजन करण्‍यात आले, त्‍यास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. कोरोना महामारीतही कृषि विद्यापीठाचे विस्‍ताराचे कार्य अविरत चालु आहे. आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. शेतीतील काबाडकष्‍टाची कामे महिलाच करतात. शेतकरी महिला केंद्रीत कृषि विद्यापीठाचे संशोधन कार्यात भर देण्‍यात येत आहे. विद्यापीठातील सामुदायिक महविद्यालय, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी म‍हाविद्यालय आदी महिलासाठी कार्य करित आहेत. ग्रामीण भागात घराघरात उन्‍नती  करण्‍याकरिता महिला सक्षमीकरण करावे लागेल. शेतमाल उत्‍पादन, काढणी, प्रक्रिया ते बाजारपेठ साखळी मजबुत करतांना महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. लवकर विद्यापीठ मराठवाडयातील यशस्‍वी महिला शेतकरी व उद्योजिका यांची यशोगाथा पुस्‍तक स्‍वरूपात प्रकाशित करणार आहे, त्‍यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर म्‍हणाले की, शेतीतील कामे वेळेवर होण्‍यात महिलांचा मोठा वाटा असतो. शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍याकरिता महिलास उपयुक्‍त अवचारे व लघुउघोगास लागणारे तंत्रज्ञान संशोधनाच्‍या आधारे कृषि विद्यापीठाने निर्माण केले असुन महिला सक्षमीकरणाकरिता विद्यापीठ कार्य करित आहे.

प्रास्‍ताविकात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांनी ग्रामीण महिलासाठी उपयुक्‍त तंत्रज्ञान निर्मिती कार्याची माहिती दिली.  कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते शेतीभाती मासिक, विद्यापीठ कृषि दिनदर्क्षिका व कोरोना काळातील विद्यापीठाचे कार्य या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.

मेळाव्‍यात तांत्रिक सत्रात महिलांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी सुधारीत शेती अवजारे यावर डॉ जयश्री रोडगे, शेतकरी महिलांकरिता विविध व्‍यवसायाच्‍या संधी यावर श्रीमती वर्षा मारवाळीकर, कोरोना काळातील बालकांची घ्‍यावयाची काळजी यावर डॉ जया बंगाळे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. मेधा उमरीकर यांनी मानले. ऑनलाईन मेळाव्‍यात मराठवाडयातील शेतकरी महिला व शेतकरी बांधवानी मोठा सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता नाहेप प्रकल्‍प, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, मराठवाडयातील विविध कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग आदींचे सहकार्य लाभेल. 

Friday, January 1, 2021

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता झुम मिटिंगच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन लातुर येथील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्‍या मा. श्रीमती आशाताई भिसे या प्रमुख अथिती म्‍हणुन उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यात महिलांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी सुधारीत शेती अवजारे यावर डॉ जयश्री रोडगे, शेतकरी महिलांकरिता विविध व्‍यवसायाच्‍या संधी यावर श्रीमती वर्षा मारवाळीकर, कोरोना काळातील बालकांची घ्‍यावयाची काळजी यावर डॉ जया बंगाळे मार्गदर्शन करणार आहेत. तरी ऑनलाईन मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त शेतकरी महिला व शेतकरी बांधवानी सहभाग घ्‍यावा, असे आवाहन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी केले आहे. ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्‍याकरिता झुम मिटिंग आयडी ९५३३९३३३६३ व पॉसवर्ड १२३४५ याचा वापर करावा. सदरिल मेळाव्‍याचे थेट प्रसारण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर करण्‍यात येणार आहे.