Pages

Monday, August 29, 2022

बौध्‍दीक संपदा अधिकार क्षेत्रात विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या अनेक संधी ....... डॉ भारत सुर्यवंशी

वनामकृविच्‍या वतीने बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट या विषयावर एक दिवसीय आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळा संपन्न 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि नागपुर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी बौध्‍दीक संपदा अधिकार आणि पेटेंट यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आभासी माध्‍यमातुन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणी हे होते तर कार्यशाळेत प्रमुख वक्ते राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्थचे सहाय्यक नियंत्रक डॉ. भारत सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नाहेप प्रकल्प मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, कार्यक्रम समन्‍वयक डॉ गोदावरी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. भारत सुर्यवंशी यांनी बौध्दीक संपदा अधिकार क्षेत्रात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्‍यांनी बौध्‍दीक संपदा अधिकार आणि पेटेंट विषयी अनेक अभ्‍यासक्रम आणि प्रशिक्षण आयोजित करण्‍यात येते. विद्यार्थ्‍यांनी याचे ज्ञान अवगत करावे. कोणत्याही उत्पादन विकास कंपनी, रुग्णालये, संशोधन लॅब, स्टार्ट-अपमध्ये आपण काम करू शकता किंवा तुमची स्वतःची बौध्‍दीक संपदा कंपनी सुरू करू शकता. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये बौध्‍दीक संपदा एजंट म्हणून नोकरी करून शकता. कृषि क्षेत्रातील अनेक संशोधनात्‍मक बाबींचे बौध्‍दीक संपदा अधिकार प्राप्‍त करू शकतो. यावेळी त्‍यांनी बौध्दीक संपदा व अधिकार यांचा कृषी क्षेत्रातील वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात वेगवेगळया विषयांवर संशोधन केले जाते. त्या संशोधनाला पेंटेट मध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा शिक्षण, संशोधन व समाजातील सर्वस्तरातील घटकांना घेता येवु शकतो. यांचा फायदा विद्यापीठाचे मानांकन उंचविण्यासाठी होतो.

कार्यशाळेचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. प्रकल्प मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रम समन्वयक डॉ. गोदावरी पवार यांनी कार्यक्रमाची पार्श्वभुमी सांगितली. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. मेघा जगताप यांनी करुन दिला. सुत्रसंचालन इंजी. अपुर्वा वाईकर यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी. श्रध्दा मुळे, डॉ. अनिकेत वाईकर, फारुखी अब्दुल बारी, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. संजीवनी कानवटे, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी पौर्णिमा राठोड,  श्री. रामदास शिंपले, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने आदीं सहकार्य केले. कार्यशाळेत कृषि संशोधक, प्राध्‍यापक, पदवी व पदव्युत्तर ‍विद्यार्थी आदी सुमारे ३५० हून अधिक प्रशिक्षणार्थीनी नोंदणी केली.

Sunday, August 28, 2022

युध्‍द तंत्रज्ञानात भारताची आत्‍मनिर्भरतेच्‍या दिशेने वाटचाल ....... डीआरडीओचे माजी शास्‍त्रज्ञ मा श्री. काशिनाथ देवधर

परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी व नाहेप प्रकल्‍प यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात प्रतिपादन

नौदल, भुदल आणि वायू दलाचे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती करण्यात भारत अग्रेसर असुन याक्षेत्रात भारत आत्‍मनिर्भरतेच्‍या दिशेने वाटचाल करित आहे. युध्‍द तंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे, हा संदेश जगात पोहोचत आहे, असे प्रतिपादन डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ मा श्री. काशिनाथ देवधर यांनी केले. परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍प यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑगस्‍ट रोजी डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ मा श्री काशिनाथ देवधर यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, यावेळी मार्गदर्शनात ते बोलत होते.

आभासी माध्‍यमातुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदमपुणे येथील सांस्‍कृतिक वार्तापत्राच्‍या व्‍यवस्‍थापिका श्रीमती सुनिता पेंढारकर, परभणी अॅस्‍ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईकनाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष पी आर पाटील, चिव सुधीर सोनूनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा श्री. काशिनाथ देवधर पुढे म्हणाले, जे खगोलीय ज्ञान जगाला अशात अवगत झाले, ते ज्ञान भारतात पुर्वजांना अनेक वर्षापासुनच मांडले आहे. भारताला भास्‍कराचार्य, आर्यभट सारख्‍या शास्‍त्रज्ञांची पार्श्‍वभुमी आहे. देशाला शस्‍त्र अस्‍त्र आयात करावी लागत होती, आज देश स्‍वयंपुर्णते वाटचाल करित आहे. देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र असलेला देश ताकदवान समजला जातो. ज्याकडे अशी ताकद असते, त्याच्या मागे जग उभे राहते. तत्‍वज्ञानाला शक्‍तीची जोड पाहिजे, तरच संपुर्ण जग तुमचा आवाज जग ऐकेल. जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र भारताने विकसित केली. माननीय एपीजी अब्‍दुल कलाम यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाने स्‍वरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर, आकाश हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्राद्वारे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करता येतो. आज अग्नी-६ आपण विकसित करतो आहोत. ब्रह्योस हे क्षपणास्त्र भारताने रशियाच्या मदतीने विकसित केले. शत्रूपक्षाला मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रावर मारा करून ते उडवून टाकण्याची ताकद रुद्रममध्ये आहे. पोखरणला अणू स्फोट करून माजी पंतप्रधान स्‍व. अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसन याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी आभासी माध्‍यमातुन उपस्थितांशी संवाद साधला तर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी विद्यापीठाच्‍या कार्याची माहिती दिली. मा. श्री. देवधर यांनी ध्वनी चित्रफिताद्वारे भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री दिपक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद वाघमारे यांनी केले आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ रणजित लाड, श्री ओम तलरेजा, प्रा नितीन लाहोट, अशोक लाड, प्रसन्‍न भावसार, दिपक शिंदे, डॉ अनंत लाड, डॉ रवि शिंदे, डॉ विजयकिरण नरवाडे, वेदप्रकाश आर्य आदीसह नाहेप प्रकल्‍प आणि पास संस्‍थेच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Wednesday, August 24, 2022

वनामकृवित बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट यावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेेेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व नागपूर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्था, मालमत्ता व्यवस्थापन (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट” यावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यशाळेच्‍या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुय मा डॉ. इन्‍द्र मणि राहणार आहे. राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्थेतील  पेटंटस आणि डिझाईन विभागाचे सहाय्यक नियंत्रक डॉ. भारत एन. सुर्यवंशी हे प्रमुख वक्ता म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत कृषि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आदी सहभाग घेवु शकतात. अधिक माहितीसाठी https://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणीकृत सहभागी यांना ई-प्रमाणपत्र कार्यक्रमा दरम्यान दिली जाईल. सदरील कार्यक्रम निशुल्क असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे व कार्यक्रम समन्‍वयक डॉ. गोदावरी पवार यांनी केले.

Link for registration

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpVxZJEdTbwSF8KmUJ5FLZTiWlwynzh5wvj4_tCP6f92NhmA/formResponse?pli=1

पर्यावरण पुरक झायगोग्रामा भुंग्‍याव्‍दारे गाजर गवताचे समुळपणे नायनाट होऊ शकतो ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र म‍णि

वनामकृवि येथे गाजर गवत निर्मुलन जागृती सप्ताह संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गाजर गवत निर्मुलन जागृकता सप्ताह निमित्त दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ज्वार संशोधन केंद्राच्‍या परिसरात गाजर गवतावर उपजीवीका करणारे झायगोग्रामा भुंगे (मेक्सिकन बिटल) गाजर गवतावर सोडण्‍यात आले.

कार्यक्रमास संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, कृषि कीटकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ पुरूषोत्‍तम नेहरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, झायगोग्रामा भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो, या भुंग्याची संख्या मोठया प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे वाढत राहते. विद्यापीठात उपलब्ध झायगोग्रामा भुंगे शेतकरी बांधवाच्‍या शेतात तसेच गाव परिसरात सोडुन शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शनात करावे.

झायगोग्रामा भुंग्यांचा वापर करुन गाजर गवताचे जैविक पध्दतीने निर्मुलन बाबत माहिती परोपजीवी कीटक संशोधन योजनच्‍या प्रभारी अधिकारी डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी माहिती दिली. सदरिल झायगोग्रामा भुंग्याचे विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजनेतील प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर गुणन केले जाते. शेतकऱ्यांना नाममात्र दरात ते उपलब्ध करून देण्याचे काम मागील बऱ्याच वर्षापासून सुरु आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ह्या भुंग्याला मोठया प्रमाणात मागणी होत आहे. यास शेतकऱ्यांचा दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असतो. या वर्षी सुध्दा जास्तीत जास्त शेतक-यांनी याचा लाभ घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.  

दिनांक १६ ऑगस्‍ट ते २२ ऑगस्‍ट दरम्‍यान विद्यापीठातील विविध महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातुन गाजर गवत निर्मुलन जागरूकता सप्‍ताहा साजरा करून जगजागृती करण्‍यात आली. कार्यक्रमास सहाय्यक परोपजीवी शास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ.एस.एस.गोसलवाड, डॉ. मो. ईलीयास, डॉ. पी.एच. वैद्य, डॉ. गजानन गडदे, डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ. डिगांबर पटाईत, डॉ. के.डी. नवघरे, डॉ. फारिया खान, श्री. गणेश खरात, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन, डॉ. योगेश म्हात्रे, श्री. धनंजय मोहड, श्री. अनुराग खंडारे, श्री.मधुकर मांडगे श्री. बालाजी कोकणे, श्री. दिपक लाड, श्री. योगेश विश्वांभरे आदीसह कीटकशास्त्र विभागातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

वेळीच लक्ष देऊन करा हळदीवरील कंद माशीचे व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

महाराष्ट्रातील हळद उत्पादक जिल्ह्यांमध्ये कंदमाशी ही कीड मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही कीड हळदीमध्ये अत्यंत घातक व नुकसानकारक आहे. ही कीड कंदकुज होण्यास मुख्यत: कारणीभूत आहे. त्याकरिता कंदकुज आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कंदमाशीचे व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत, डॉ जी डी गडदे, श्री एम बी मांडगे यांनी केले आहे.

कंदमाशी

कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. या किडीच्या अळ्या उघड्या कंदामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा कंदामध्ये नंतर बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. अशा झाडांची पाने पिवळी पडतात आणि खोड व कंद मऊ होतात आणि त्यांना पाणी सुटून ते कुजतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. सततचा पाऊस आणि जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

कसे कराल कंदमाशीचे व्यवस्थापन

ऑगस्ट ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे.

जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

अशाप्रकारे वेळीच लक्ष देऊन उपाय योजना केल्‍यास हळद पिकातील कंद माशीच्या प्रादुर्भाव कमी करू शकतो, असा सल्‍ला शास्‍त्रज्ञांनी दिला. हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

अधिक माहिती करिता विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक ०२५४२ २२९०००





संदर्भ

कसबे डिग्रज (जि. सांगली) सांगली हळद संशोधन केंद्राच्‍या शिफारशी

वनामकृवि संदेश क्रमांक- ०६/२०२२ (२३ ऑगस्ट २०२२)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

Monday, August 22, 2022

वनामकृविचे सोयाबीन पैदासकर डॉ शिवाजी म्‍हेत्रे वसंतराव नाईक कृषी पुरस्‍काराने सन्‍माननीत

वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठान पुसदच्‍या वतीने राज्‍यातील प्रयोगशील शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञांना देण्‍यात येणारे प्रतिष्‍ठीत वसंतराव नाईक कृषी पुरस्‍कार वितरण समारंभ माजी मुख्‍यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्‍या ४३ व्‍या स्‍मृतिदिन १८ ऑगस्‍ट पुसद येथे संपन्‍न झाला. या कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांना उत्‍कृष्‍ट कृषी शास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगे, मा. आमदार श्री इंद्रनील नाईक साहेब, माजी मंत्री मा.डॉ. एन पी हिराणी साहेब, हळद पीक विशेषज्ञ डॉ जितेंद्र कदम, हवामान विशेषज्ञ श्री पंजाबराव डख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभुषण मा. श्री. दीपकजी आसेगावकर, डॉ. उत्तमजी रुद्रवार, सौ. वृषालीताई नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सद्या डॉ म्‍हेत्रे अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी असुन त्‍यांचे कृषि संशोधन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्‍यांना हा पुरस्‍कारा करिता निवड करण्‍यात आली आहे. त्‍यांचा विविध खरीप ज्‍वारीरब्‍बी ज्‍वारीकरडई आणि सोयाबीन पिकांचे वाण विकसित करण्‍यात मोलाचा वाटा आहेयात एमएयुएस ६१२एमएयुएस ७२५एमएयुएस ७३१ आदी वाणाचा विशेष उल्‍लेख करावा लागेल. त्‍यांना यापुर्वी आदर्श शिक्षक पुरस्‍कार आणि राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले आहे. आजपर्यंत त्‍यांनी १५ पदव्‍युत्‍तर आणि ५ आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना संशोधक मार्गदर्शक म्‍हणुन कार्य केले आहे. त्‍याचे आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संशोधन नियतकालिकेत मध्‍ये ७० पेक्षा जास्‍त संशोधनात्‍मक लेख प्रसिध्‍द झाले आहेत. पुरस्‍काराबाबत डॉ म्‍हेत्रे यांचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि संशोधन  संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी अभिनंदन केले.

कृषिमंत्री व कृषि सचिव यांच्या दौ-या दरम्यान वनामकृवि शास्त्रज्ञांची विविध गावांना प्रक्षेत्र भेटी

राज्‍याचे माननीय कृषिमंत्री ना. श्री. अब्दुल सत्तार यांनी नांदेड येथे दिनांक २१ ऑगस्‍ट रोजी कृषि विभागाची विभागीय आढावा बैठक घेतली व प्रक्षेत्र भेटी दिल्या तसेच लातुर जिल्हयामधील औसा तालूक्यातील करजगाव, येरंडी, सारोळा, जयनगर तर लातुर तालूक्यातील पेठ, वासणगाव तसेच उस्मानाबाद जिल्हयामधील उमरगा तालुक्यातील कवठा या गावातील शंखी गोगलगाय व सोयाबीन पिकांतील पिवळा मोझॅक रोगाने प्रादुर्भावग्रस्त प्रक्षेत्राची पाहणी केली. नांदेड दौरा दरम्‍यान कृषिमंत्री मा ना. श्री अब्दुल सत्तारकृषि सचिव श्री एकनाथ डवले यांच्या नांदेडचे माननीय खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मुख्‍यमंत्री श्री अशोकराव चव्‍हाण, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्‍हयातील माननीय आमदार उपस्थित होते तर लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, औसा, उमरगा, उदगीर मतदार संघाचे माननीय आमदार, लातुर व उस्मानाबाद जिल्हयाचे माननीय जिल्हाधिकारी, कृषि विभागातील अधिकारी हे उपस्थित होते.

दौ-या दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमुने शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव तसेच पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव हा अधिक वाढु नये, याबाबत उपाययोजना सुचवल्या. सदर प्रादुर्भावग्रस्त भागात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी या अगोदर ही चार ते पाच वेळा भेटी देऊन शेतक-यांना किड व रोग व्यवस्थापना बाबत मार्गदर्शन केले होते. व्यवस्थापनाच्या उपाययोजना केलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव मर्यादित स्वरूपात दिसून आला. याबाबत माननीय मंत्री महोदय व माननीय सचिव महोदयांनी समाधान व्यक्त केले.

विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्या सुचनेनुसार व संचालक विस्तार शिक्षण डॉ देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ पथकात नांदेड येथे किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवर, डॉ संजीव बंटेवाड, डॉ आर व्‍ही चव्‍हाण तसेच लातूर येथे कृषि किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. अरुण गुट्टे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, क्रॉपसॅप प्रकल्‍प समन्‍वय अधिकारी डॉ. अनंत लाड, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. विजय भांबरे, पिक रोग शास्‍त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबडकर, पिक रोग शास्‍त्रज्ञ डॉ. पी. जी. मुळेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश म्हात्रे आदींचा समावेश होता. 







Sunday, August 21, 2022

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक २० ऑगस्‍ट रोजी माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांची जयंतीदिनी सद्भावना दिन साजरा करण्‍यात आला. प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी स्‍व. राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस अभिवादन करून सामुदा‍यिक सदभावना प्रतिज्ञेचे वाचन करण्‍यात आले. सरकारच्या निर्देशानुसार २० ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीच ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करावे अशी प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. तसेच कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करून संविधानिक मार्गाचा अवलंब करून विविध प्रश्न सोडवू असेही प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, मंचक डोंबे, सुनिता तळेकर, नारायण राऊत, शुभांगी महाजन, अरुण ताटे, स्वयंसेविका गायत्री वाणी, जानवी  चव्हाण, मयूर राऊत, अक्षय कोटरंगे, प्रतीक्षा जोंधळे, श्रेयस वाजे, साक्षी दवणे आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, August 20, 2022

दिसताच डोमकळी, कपाशीमध्ये लावा कामगंध सापळे, होईल कमी गुलाबी बोंडअळी

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल. कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठीचे हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावीत़. मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी दोन ते तीन या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे. तसेच ५ टक्के निंबोळी अर्क अथवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशी युक्त कीटकनाशकाची ८०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा एक अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास पुढीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

एकरी प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम किंवा प्रोफेनोफोस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली या किटकनाशकांची फवारणी आलटून पालटून करावी. सदरिल कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.

अश्‍या प्रकारे उपाय योजना केल्‍यास कपाशीतील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करून शकतो, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे, श्री.एम.बी.मांडगे आदींनी दिला आहे. अधिक माहितीकरिता कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍य दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क करावा.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक- ०५/२०२२ (१८ ऑगस्ट २०२२)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी



वेळीच करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

वनामकृवितील कृषि किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञ आणि लातुर कृषि विभागातील अधिकारी दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी यांनी लातुर जिल्‍हयातील औसा आणि निलंगा तालुक्‍यातील येरंडी, सारोळा, करजगांव, चिंचोली, ननद आणि जाऊ यां गावांतील शेतकरी बांधवाच्‍या किड प्रादुर्भावाग्रस्‍त सोयाबीन प्रक्षेत्रांना भेटी दिल्‍या. या भागात गोगलगाई मोठया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला असुन खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. ज्‍या शेतकरी बांधवांनी गोगलगाई नियंत्रणाकरिता कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाच्‍या शिफारसी प्रमाणे उपाययोजना अमलात आणल्‍या त्‍या शेतात मर्यादीत स्‍वरूपात प्रादुर्भाव दिसुन आला. मराठवाडया यावर्षी ब-याच ठिकाणी पावसाच्या उशीराच्या आगमनाने सोयाबीन पेरणीस उशीर झाला होता. तसेच जुलै महिन्यातील व ऑगस्‍टच्या पहिल्या आठवडयात होणारा सततचा रिमझीम पाऊस, आणि  ढगाळ वातावरणामुळे सोयाबिन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. खोडमाशीमुळे जवळपास सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुनी वेळीच जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागातील तज्ञांनी दिला आहे.  

कसा ओळखाल खोडमाशीचा प्रादुभार्व

खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची दाट शक्यता असते. अळी पान पोखरुन शिरेपर्यंत पोहचून शिरेतुन पानाच्या देठामध्ये शिरते व शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार, मागच्या बाजूने गोलाकार व पाय नसलेली अळी जमिनीच्या बाजूने डोके करुन म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लवकर लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. ब-याचदा झाड शेवटपर्यंत हिरवे राहते परंतु शेंगा भरत नाहीत. वेळीच उपाययोजना न केल्यास ५० टक्के पर्यंत उत्पादनात घट येउ शकते. 

कसे कराले खोडमाशीचे व्यवस्थापन 

सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात.प्रतिबंधात्‍मक उपाया म्‍हणुन ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली  १०  लिटर पाण्यातून फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी करावी किटकनाशकांची फवारणी 

शेतातील साधारणत: १० ते १५ टक्के झाडे खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त झाल्‍यास किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजुन पुढील रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावा. प्रति दहा लिटर पाण्‍यात २.५ मिली थायमिथोक्झाम १२. अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन . झेडसी किंवा ३ मिली क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८. एससी किंवा ३० मिली ईथीऑन ५० ईसी किंवा ७ मिली इंडोक्झाकार्ब १५.८० ईसी किंवा ६ मिली लॅमडा साहॅलोथ्रीन ४.९ सीएस यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकांची फवारणी करावी. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. फवारणी साठी शुद्ध पाणी वापरावे. शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करतानाव फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा जेणे करुन विषबाधा होणार नाही. 

अशा प्रकारे खोडमाशीच्या व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. ए.जी. लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे आदींनी केले आहे.