Pages

Tuesday, April 8, 2025

वनामकृविच्या तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विकासासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ठोस भूमिका

 संरक्षण भिंत, औषधी बाग, ऍग्रो टुरिझम प्रकल्प, संग्रहालय यासाठी मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूरला दिनांक ७ एप्रिल रोजी दिलेल्या भेटीदरम्यान केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विविध विभाग व स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने हे केंद्र भविष्यात उत्कृष्ट विकास साधेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्वप्रथम केंद्राच्या संरक्षण भिंतीची पाहणी करून तिच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. पश्चिमेकडून शहरातील येणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून समांतर चर खोदण्याचे निर्देश दिले. याच दरम्यान विद्यापीठ अभियंता श्री. दीपक काशाळकर यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून संरक्षण भिंतीसह भव्य प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.

प्रक्षेत्रातील गोडाऊन व शेतकरी निवासाच्या अर्धवट कामांचे पूर्णत्व आठ ते दहा दिवसांत सुनिश्चित करण्यास सांगितले. तसेच, न वापरात असलेल्या भंगार वस्तूंचा लिलाव करून केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यावरही भर दिला. झाडांच्या तोडपरवान्यांसाठी तुळजापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. अजिंक्य रणदिवे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान कार्यालयात झालेल्या बैठकीत माननीय कुलगुरूंनी कृषि विज्ञान केंद्राचा परिसर ऍग्रो टुरिझम हब म्हणून विकसित करून लवकरात लवकर त्याची नोंदणी करण्यात यावी, परिसराचे सौंदर्यीकरण करणे अत्यावश्यक असून जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने निधीची मागणी करावी, परिसरात औषधी वनस्पतींची बाग (Medicinal Garden) उभारण्याचे नियोजन करावे, तेलबिया पिकांचे संग्रहालय स्थापन करून शेतकरी व पर्यटकांना आकर्षित करावे, आणि कृषि विज्ञान केंद्रासाठी २०२५-२६ या वर्षात विद्यापीठ महसूलातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधावा, या महत्त्वाच्या बाबी सुचवून त्यावर मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, शास्त्रज्ञ श्रीमती वर्षा मरवाळीकर, डॉ. विजयकुमार जाधव, श्रीमती अपेक्षा कसबे तसेच डॉ. श्रीकृष्ण झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या यशस्वी भेटीसाठी कृषि विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री. सखाराम मस्के, जगदेव हिवराळे, बालाजी कदम, शिवराज रुपनर, शब्बीर शेख आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून केला.










Saturday, April 5, 2025

माननीय नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांच्या सत्कार सोहळ्यास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची मुख्य उपस्थिती

 

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री पदी वर्णी लागल्याबद्दल पालकमंत्री माननीय नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांचा भव्य सत्कार दिनांक ५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आला.

हा भव्य सत्कार महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते.

कार्यक्रमात माननीय नामदार सौ. मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांचे माननीय कुलगुरू यांनी मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी वीज तांत्रिक कामगारांच्या भूमिकेचे आणि सेवेचे महत्व अधोरेखित केले.

यावेळी महापारेषण कंपनीचे प्रकल्प संचालक श्री. अविनाश निंबाळकर, वीज तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस श्री. हाजी सय्यद जहिरोद्दिन, उप सरचिटणीस श्री. नानासाहेब चट्टे, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. राजाराम माने, छत्रपती संभाजीनगरचे श्री. सय्यद नसीर कादरी, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापक श्री. अनंत कोंत आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून वीज तांत्रिक कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जैविक खत व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचा ४० वा भाग दिनांक ४ एप्रिल रोजी संपन्न झाला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जैविक शेतीतील खत व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्गदर्शन करताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी जैविक घटकांच्या वापरामुळे खत खर्चात होणारी बचत आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला.

कार्यक्रमात जैविक शेती विषयक तांत्रिक मार्गदर्शन करताना डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शाश्वत शेतीसाठी मातीची उपयुक्तता, खत व्यवस्थापनाचे शास्त्रीय महत्त्व आणि जैविक घटकांच्या प्रभावी वापराविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मातीचे नियमित  प्रथःकरण, जैविक घटकांचा वापर आणि सूक्ष्मजीवांद्वारे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणे या पद्धती रासायनिक खतांवरचा अवलंब कमी करून जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत करतात.

जसे मानवासाठी अन्न हेच औषध आहे, तसेच माती हेच पिकासाठी सर्वोत्तम खत आहे,” असे सांगत त्यांनी जमिनीच्या पोषणासाठी माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अनावश्यक रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढतो, यामुळे शेतकऱ्यांना अधिक कीडनाशकांचा वापर करावा लागतो आणि खर्च वाढतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील हवामानाचा अंदाज देत शेतकऱ्यांना योग्य शेती उपाय सुचवले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे मोलाचे योगदान लाभले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह इतर भागांतील शेतकऱ्यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभाग घेतला. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. या कार्यक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे शेतकऱ्यांनी अशा उपयुक्त उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी मागणी केली.


परंपरागत शेतीपासून आधुनिक शेतीकडे : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विशेष संवाद कार्यक्रम

 रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर करावा ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत परंपरागत शेतीपासून आधुनिक शेतीकडेचा प्रवास” या विषयावर एक विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ एप्रिल रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून गो-सेवा गतिविधीचे अखिल भारतीय मुख्य प्रशिक्षक श्री. के. ई. एन. राघवनजी हे उपस्थित होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय शेतीचा वैभवशाली इतिहास सांगून प्राचीन काळात ऋषीमुनींनी विज्ञानाचा आधार घेतला आणि शेती संशोधने विकसित केले, असे सांगितले. याबरोबरच त्यांनी अयोध्येत नुकत्याच पार पडलेल्या कुलगुरू परिषदेमध्ये ‘कृषि पराशर’ आधारित शेती पद्धतीवर झालेल्या विचारमंथनाचा उल्लेख केला. तसेच रासायनिक व सेंद्रिय घटकांचा संतुलित वापर, गो-आधारित शेती, सूक्ष्मजैविक घटकांचा उपयोग, कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की, शास्त्रज्ञांनी काळानुसार समाजहिताची संशोधने केली. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून आपत्कालीन परिस्थितीत जगालाही मदत करू शकतो. परंतु पंजाबसारख्या राज्यात रसायनांचा अतिरेक आणि पाण्याचा अतिवापर यामुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून शिकण्याची गरज आहे.

श्री. के. ई. एन. राघवनजी यांनी आपल्या मार्गदर्शनातून वेदाधिष्ठित शेती ज्ञान, जमिनीचे प्रकार, जलप्रकार, औषधी गुणधर्म असलेले अन्न, आणि सूक्ष्मजैविक घटकांचे महत्त्व, तसेच पारंपरिक शेती पद्धती आणि सेंद्रिय शेतीतील शास्त्रीय दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शेती हा व्यवसाय नसून एक शास्त्र आहे”, हे वेदांमधून स्पष्ट होते. त्यांनी प्राचीन शेतीत वापरल्या जाणाऱ्या २४ बैलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या १२ नांगरांच्या पद्धती, तसेच नैसर्गिक किड नियंत्रणाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. त्यांनी आधुनिक काळात हरितक्रांतीसाठी अवलंबलेल्या रासायनिक घटकांमुळे झालेले परिणामाची आणि चुकीच्या अवलंबन पद्धतीची माहिती दिली. आधुनिक शेतीमध्ये निसर्गातील जीवसृष्टीवरील रासायनिक घटकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी गाईच्या शेणाचे आणि मूत्राचे महत्त्व पटवून दिले तसेच जमिनीत असलेल्या सूक्ष्म जैविक घटकांचेही महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमात पारंपरिक शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती, तंत्रज्ञानाचा वापर, तसेच शाश्वत शेतीसाठी नव्या उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आधुनिक कृषिविज्ञानाची जाण करून देण्याचा मुख्य उद्देश या सत्रामागे होता.

कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम  समन्वयक डॉ. आर. पी. कदम आणि डॉ. पी. आर. देशमुख  यांनी संयोजनाची भूमिका पार पाडली. तसेच मुख्य मार्गदर्शक श्री. के. ई. एन. राघवनजी यांचा परिचय डॉ. प्रशांत देशमुख यांनी करून दिला

कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राहुल रामटेके, डॉ. राजेश क्षिरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे यांचाही सहभाग होता.

यावेळी कृषि शिक्षण व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांची तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी यांचा सहभागही लक्षणीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी मानले.

दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुण्यांनी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशु शक्तींचा योग्य वापर योजना आणि संकरित गो पैदास प्रकल्प या संशोधन केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, मुख्य अन्वेषक डॉ. अनिल गोरे, मृदा शास्त्रज्ञ  डॉ. पपीता गौरखेडे आदींची उपस्थिती होती.


शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

मुख्य प्रशिक्षक श्री. के. ई. एन. राघवनजी 

विद्यार्थी यांचा लक्षणीय सहभाग

दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुण्यांनी संशोधन केंद्रांना भेटी दिल्या



Thursday, April 3, 2025

वनामकृविच्या नांदेड कापूस संशोधन केंद्राला ‘सर्वोत्कृष्ट एआयसीआरपी केंद्र’ पुरस्कार


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) - कापूस अंतर्गत सर्वोत्कृष्ट एआयसीआरपी केंद्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR), नागपूर यांच्याद्वारे या गौरवप्राप्त केंद्राला "उत्कृष्टता प्रमाणपत्र" प्रदान करण्यात आले आहे.

२०१८ ते २०२३ या कालावधीत कापूस संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी पंचवार्षिक पुनरावलोकन समिती (QRT) ने मूल्यमापन करून हा पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केली होती. नांदेड कापूस संशोधन केंद्राने या काळात उच्च दर्जाचे संशोधन व कृषी क्षेत्रात नव्याने योगदान दिल्याचे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे नांदेड केंद्राच्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केंद्रातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या केंद्रास माननीय कुलगुरूंचे नियमित मार्गदर्शन, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे सक्षम नेतृत्व आणि विद्यापीठातील सर्व अधिकारी, संशोधक व संपूर्ण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिवाराचे योगदान याबद्दल कापूस संशोधन केंद्राच्या वतीने विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने भविष्यातील कापूस संशोधन व उत्पादन क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. या यशामुळे शेतकरी व संशोधन क्षेत्राच्या विकासासठी नवे द्वार खुले झाले आहे. यामुळे विद्यापीठामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण संशोधन चमूचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Wednesday, April 2, 2025

ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पाला मान्यवरांची भेट : सौर ऊर्जा आणि शेतीच्या नवसंशोधनाला नवी दिशा!

 शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञानाचा उपयोग माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठद्वारा मानवत येथे कार्यान्वित असलेल्या ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पास २ एप्रिल रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत पंजाब ऊर्जा विकास अभिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नीलिमा, पंजाब कृषि विश्वविद्यालयाच्या संशोधन संचालक डॉ. अजमेर सिंग धाट आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतीतील जोखीम व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल, यावर भर दिला.

सदर प्रकल्प मागील दोन वर्षांपासून अत्याधुनिक संशोधन करीत असून, त्याचे कार्य भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक ठरत आहे. भविष्यातील सौर ऊर्जा व शेतीतील संशोधन अधिक अद्ययावत करण्यासाठी अनेक संस्था या प्रकल्पास सहकार्य करण्यास इच्छुक आहेत.

या संशोधन प्रकल्पाचे कार्य संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जाते. भेटी दरम्यान प्रकल्पाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. नवनवीन पिकांवर होणारे संशोधन हे शेतीसाठी क्रांतिकारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी प्रकल्पातील तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती होती. यामध्ये इंजिनीयर शरद शर्मा, डॉ. विश्वजीत हंस, डॉ. गुरु मित सिंग, श्री. विवेक सराफ, इंजि. अभिषेक शास्त्री, दीपिका सक्सेना, डॉ. कलालबंडी आणि डॉ. सुनिता पवार यांचा समावेश होता.

ही भेट सौर ऊर्जा आणि शेतीतील संशोधनाला नवी दिशा देणारी ठरली असून, भविष्यातील नवकल्पना आणि संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देणारी आहे.






सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिका – शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनावर भर

 सुदृढ माती असेल तर सुदृढ पिकेही निर्माण होतात... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिका" या उपक्रमांतर्गत शाश्वत शेतीसाठी जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मंगळवारी (दि. १ एप्रिल) ऑनलाईन पद्धतीने विशेष कार्यशाळा संपन्न झाली. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख आयोजक म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ आणि माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सेंद्रिय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे आणि डॉ. पपिता गौरखेडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन याचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, सुदृढ माती असेल तर सुदृढ पिकेही निर्माण होतात. शाश्वत उत्पादनासाठी जमिनीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी परड्यू विद्यापीठ (अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांच्यामार्फत कोरडवाहू शेतीसाठी यांत्रिकीकरण व खर्च बचतीच्या तंत्रज्ञानावर सविस्तर माहिती दिली.

प्रमुख वक्ते डॉ. विलास पाटील यांनी आपल्या तांत्रिक मार्गदर्शनात सांगितले की, समृद्ध मातीमुळे समृद्ध समाजाची उभारणी होते. सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर माती, पाणी, पशुधन आणि अन्नसुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण कृषी व्यवस्थेसाठी ६ इंच मातीचा थर तयार होण्यास १३०० कोटी वर्षे लागतात, त्यामुळे तिचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.

मराठवाड्यातील जमिनीच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, येथील तापमान आणि कृषीयोग्य जमिनीचे अकृषीकरण होणे ही मोठी समस्या आहे. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे शेतीच्या टिकाऊतेसाठी योग्य धोरणे आखणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, शेतातील माती, पाणी, काडीकचरा आणि शेतकरी स्वतः शेतात कार्यरत राहिल्यास उत्पादनवाढ शक्य आहे.

कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत हे अमेरिका येथून ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी बैलचलित पेरणी यंत्र विकसित करण्यासंबंधी माहिती देताना सांगितले की, हे यंत्र कोरडवाहू क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य खोलीवर आणि ओलावा असलेल्या ठिकाणी बियाण्यांची योग्य पेरणी होण्यासाठी याचा प्रभावी उपयोग होईल. तसेच, त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी यंत्रांची निर्मिती आणि वापर यावरही सखोल मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता सोलंकी यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होवून प्राध्यापक डॉ.धर्मेद्र सारस्वत आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली.

या दोन तासांच्या विशेष संवाद सत्रात शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतीतील तंत्रज्ञान व समस्या यावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सखोल चर्चा झाली. कार्यक्रमात उपस्थित शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधानकारक उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी तसेच शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. झूम मिटिंग, यूट्यूब आणि फेसबुक या माध्यमांतून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शाश्वत शेती आणि मृदा आरोग्य व्यवस्थापन यावर भर देणारा हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ आवश्यक – डॉ.जया बंगाळे

 शेंद्रा  येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिराची सांगता


आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आजची मुलगी हीच उद्याची माता होणार असल्याने जन्मापासूनच त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर असल्याचे मत सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी शेंद्रा (ता. जिल्हा परभणी) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिराची सांगता समारंभात व्यक्त केले. मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी दिल्यास त्या स्वतः बरोबरच कुटुंबाचीही उत्कृष्ठपणे प्रगती करू शकत असल्याने त्यांच्या विवाहाची घाई करणे टाळावे. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक गावात गावकऱ्यांनी व्यापक सामाजिक चळवळ उभारावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या विशेष शिबिराच्या सांगता समारंभास सरपंच श्रीमती आशामती ढगे, उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जोंधळे यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी विषय प्रमुख डॉ.शंकर पुरी यांनी सामाज माध्यमाचा वापर शेती आणि घरातील कामासाठी करण्यासाठी महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय द्वारे विकसित "महिला शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान" आणि "आरोग्यज्ञान" या दोन मोबाईल अॕपची उपयुक्तता आणि हाताळणी सांगून याचा वापर करण्याचे आवाहन केले.  

कार्यक्रम अधिकारी डॉ.विद्यानंद मनवर यांनी यावेळी उपस्थितांना प्रसार माध्यमे, सामाज माध्यमे तसेच कृत्रिम बुद्द्धीमत्ता या माध्यमांचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम याबाबत माहिती सांगून समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून या माध्यमांचा युवकांनी डोळसपणे वापर करावा तसेच या माध्यमाद्वारे सामाजिक तेढ निर्माण करणारी वा प्रसारित झालेली चुकीची माहिती वेळीच पडताळून त्यावर प्रतिबंध घालावा असे नमूद केले.

डॉ.अश्विनी बिडवे यांनी संतुलित आहाराचे महत्व सांगून विविध ऋतूनुसार आहारात बदल करणे, आहारात विविध पालेभाज्या,फळ-भाज्या, कडधान्ये तृणधान्ये यांचा संतुलित वापर तसेच वयोमानानुसार व कामाच्या स्वरुपानुसार आहार घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

प्रा.ज्योती मुंडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शारीरिक श्रम व वेळ बचत करण्याबाबत अ.भा.स.सं.प्रकल्प सामुदायिक विज्ञान महाविद्यालय निर्मित केलेल्या  शेतकरी महिलांचे  शारीरिक व मानसिक ताण कमी करणाऱ्या  विविध तंत्रज्ञानाची  सविस्तर माहिती दिली.

डॉ. संपदा ढगे यांनी आरोग्य विषयक माहिती देतांना आरोग्य हीच संपत्ती असल्यामुळे स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक राहून आरोग्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे विषद केले. याबरोबरच किशोरवयीन मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, मानसिक स्वास्थ्याची जपणूक, सुदृढ स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्व याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व उपस्थित महिला वर्गाचे शंका निरसन केले.

सहशिक्षिका श्रीमती रुपाली ढगे यांनी ‘व्यक्तिमत्व विकासात संवाद-कौशल्याचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री. उत्तमराव जोंधळे यांनी लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी संविधानिक मूल्यांचे जतन करीत एक सुजान नागरिक म्हणून कर्तव्ये पार पडण्याबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले. ग्रामसेवक श्री अतिश वायकोस यांनी यावेळी गावाच्या विकास योजना विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी योग कार्यशाळा, वृक्ष व जल संवर्धन  जनजागृती रॕली, स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावातील स्वच्छता असे विविध उपक्रम राबविले. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावाच्या सरपंच श्रीमती आशामती ढगे, उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्वाती ढगे यांच्या समवेत सुधाकर ढगे,कामाजी जोंधळे, दिनाभाऊ ढगे,मुरली शिंदे, गोविंद रनेर, शेख गौस यांनी  प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अपूर्वा लांडगे यांनी केले. विशेष शिबिरांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमास गावातील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.












वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा क्रिकेट संघ महाराष्ट्र कुलगुरू चषक स्पर्धेसाठी नागपूरकडे रवाना

 

नागपूर येथे दिनांक ३ ते ८ एप्रिल २०२५ दरम्यान महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित "महाराष्ट्र कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धा-२०२५" मध्ये सहभागासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा क्रिकेट संघ नागपूरकडे दिनांक २ एप्रिल रोजी रवाना झाला आहे.

संघाच्या या महत्त्वपूर्ण सहभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रविण निर्मळ, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांनी संघास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

गेल्या वर्षी गोंडवाना विद्यापीठात आयोजित या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संघाने उत्तम कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात संघ अधिक जोमाने खेळून विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या स्पर्धेसाठी संघातील खेळाडू सज्ज असून उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचे संघ या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असतात, त्यामुळे या स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या संपूर्ण परिवारातर्फे संघाला यशासाठी शुभेच्छा!