Pages

Saturday, April 6, 2013

हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेच्‍या शास्त्रज्ञांचा मराठवाडा विभागातील दुष्‍काळ भागाचा पाहणी दौरा


नवी दिल्‍ली ये‍‍थील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या महासंचालक मा डॉ एस अय्यप्पन यांच्‍या सूचनेनूसार मराठवाडा विभागातील कमी पाउस झाल्‍यामुळे दुष्‍काळी परिस्थितीचा पाहणी करून त्‍यावर दिर्घकालीन व लघुकालीन उपाय योजनेचा अभ्‍यासाकरीता तज्ञ मंडळीचा समावेश असलेल्‍या पथकांनी दि 02 ते 5 एप्रिल दरम्‍यान जालना, औरंगाबाद व बीड दौरा केला. या पाहणी पथकात हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍था, बारामती येथील राष्ट्रिय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍था, वासद (गुजरात) येथील केंद्रिय जल व मृद संधारण संस्‍था व मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ तसेच कृषि विभागातील अधिकारी वर्ग यांचा समावेश होता. सदरील शास्‍त्रज्ञाच्‍या चमुची मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दि 05 एप्रिल रोजी बैठक संपन्‍न झाली यात दुष्‍काळी सद्य परिस्थितीच्‍या व भविष्‍यात करावयाच्‍या दिर्घकालीन उपाय योजनांबददल सविस्‍तर चर्चा झाली. या बैठकीस विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाहणीसाठी तीन चमु करण्‍यात आले होते त्‍याच्‍या दौ-यातील निर्दशनास आलेल्‍या बाबींवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. बीड, औरंगाबाद जिल्‍हातील पैठण, औरंगाबाद तालुके, जालना जिल्‍हातील अंबड, घनसावंगी आदी तालुक्‍यातील बहुतांश फळबागा पाण्‍या अभावी वाळल्‍या आहेत. तसेच भुगर्भातील पाण्‍याची पातळी सर्वसाधारण क्षमतेपेक्षा 2.5 ते 5 मीटर खोलीपर्यत खोल गेली असुन बहुतांशी विहीरी व तलाव कोरडे पडलेले आहेत. या भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची व जनावरांसाठी पाण्‍याची तीव्र टंचाइ निमार्ण झाली आहे असे पाहणीत प्रकर्षाने निर्दशनास आले. ज्‍या भागात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेली आहेत व पावसाच्‍या पाण्‍याचे साठवण व पुर्नवापर, विहीर पुर्नभरण अशा प्रकारची कामे झालेली आहेत अश्‍या भागात दुष्‍काळाची तीव्रता कमी जाणवत आहे म्‍हणजेच पाणलोट क्षेत्र विकासाची कामे विस्‍तृत प्रमाणात आणि शास्‍त्रीय पध्‍दतीने केल्‍यास दुष्‍काळावर काही प्रमाणात मात करता येते. ज्‍या भागात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली नाहीत त्‍या भागात दुष्‍काळाची तीव्रता जास्‍त होती. या दुष्‍काळी परीस्थितीमुळे मृद व जल संधारणाच्‍या कामाची गरज पुन्‍हा एकदा अधोरेखित झाली आहे असे मत शास्‍त्रज्ञानी चर्चे दरम्‍यान व्‍यक्‍त केले. तसेच मराठवाडा विभागातील फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाने शिफारस केल्‍याप्रमाणे ठिंबक सिंचन पध्‍दतीचा अवलंब, सेंद्रिय व प्‍लॉस्‍टीक आच्‍छादनांचा वापर, पाणी धरून ठेवणा-या हायड्राजेल वापर, झाडांच्‍या फांद्या कमी करणे, 6 टक्‍के द्रावणाचा केओलीनचा वापर आदी बाबींचा उपयोग होतो. तसेच पिक पध्‍दतीमध्‍ये बदल करून जनावरांसाठी चारा उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्टिने ज्‍वार पिक आधारीत पिक पध्‍दतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. भविष्‍यात फळबाग लागवडीसाठी जमिनीची खोलीचा विचार करूनच फळबागांची लागवड करण्‍याचा सल्‍ला दिला. कमी खोलीच्‍या जमिनीमध्‍ये तुलनेने पाण्‍याची कमी गरज असलेल्‍या डाळींब व सिताफळ यांचा मोंसबीला भविष्‍यात चांगला पर्याय ठरू शकेल असे मत शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केले. मा कुलगुरू यांनी आपल्‍या मार्गदर्शनात सांगितले की, हवामान बदलाचा विचार करून दीर्घकालीन उपाय योजनेवर भर देणे गरजेचे असुन लहान शेतक-यांनी कृषि संलग्‍न जोडधंद्ये करणे गरजेचे आहे. नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा -हास होत आहे, पाणी व माती या नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा योग्‍य वापर करणे गरजेचे आहे. हवामान बदलातही शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पिकांच्‍या जाती विकसित करण्‍यावर संशोधनात भर दयावा. एकात्मिक शेती पध्‍दतीचा शेतक-यांनी अवलंब करावा असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
      सदरील दुष्‍काळी भागाची पाहणी करणा-या पथकामध्‍ये हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे डॉ मोहमद उस्‍मान, डॉ एस देसाइ, डॉ सामी रेडडी, डॉ मनोरंजन कुमार, डॉ एस एस बलोली, डॉ व्‍ही के राव, डॉ डी बी व्हि रमना, डॉ पी के पंकज, डॉ आर व्‍ही अडके, तसेच बारामती येथील राष्ट्रिय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे डॉ एन पी सिंग, डॉ जगदीश राना, डॉ एस के बल आणि वासद (गुजरात) येथील केंद्रिय जल व मृद संधारण संस्‍थेचे डॉ आर एस कुरोठे, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे अखिल भारतीय कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ वा नी नारखेडे, कृषि अभियंता डॉ मदन पेंडके, वनस्‍पती पैदासकार डॉ एस बी चौलवार तसेच कृषि विभागातील विभागीय कृषि अधिकारी श्री एस आर सरदार, बीड, औरंगाबाद व जालना येथील जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री यु आर घाटगे, श्री व्हि बी जोशी, कृषि विज्ञान केंद्राचे समन्‍वयक डॉ राकेश अहिरे (औरंगाबाद), श्री यु एन फाटक (खामगांव), श्री सोनवणे (खरपुडी), विस्‍तार विस्‍तार कृषिविद्यावेत्‍ता श्री ए व्‍ही गुटटे, डॉ एस बी पवार आदीचा या पाहणी पथकात समावेश होता.